मुंबई : टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी बीसीसीआयकडून मुलाखती घेण्यात येत आहेत. टीम इंडियाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाळ लवकरच संपणार असून त्यांच्या जागी कुणाची वर्णी लागणार याकडे क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे येत्या काही दिवसात टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी कोण याबाबत स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी दिग्गजांच्या मुलाखती घेण्यात येत आहेत. या दिग्गजांपैकीच एकाची निवड प्रशिक्षकपदी होणार आहे. येत्या काही दिवसांत बीसीसीआय याबाबत घोषणा करण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे टीम इंडियाचा माजी सलामीवीर गौतम गंभीर याच्या नावाबाबत जोरदार चर्चा सुरू असल्याचे समोर आले आहे.
आयपीएल २०२४ मोसमात विजेता ठरलेल्या कोलकाता नाईट रायडर्स संघाचा मेंटॉर म्हणून गौतम गंभीरने आपली जबाबदारी पार पाडली आहे. कोलकाताने मिळविलेल्या विजयानंतर गंभीरने टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाची भूमिका बजावी, अशी क्रिकेट वर्तुळात चर्चा रंगली होती.
टीम इंडियाचा सुपर ८ मध्ये प्रवेश
युएसए व वेस्ट इंडिज संयुक्तपणे टी-२० वर्ल्डकप २०२४ यजमानपद भूषवित असून सुपर ८ चे सामने वेस्ट इंडिजमध्ये खेळविण्यात येणार आहेत. दरम्यान, टीम इंडियाचा सुपर ८ मध्ये पहिला सामना दि. २० जून रोजी केनिंग्टन ओवल, बार्बाडोस येथे अफगाणिस्तान विरुध्द होणार आहे. दुसरा सामना २२ जून रोजी बांग्लादेश विरुध्द तर तिसरा सामना २४ जून रोजी ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहे. सुपर ८ अंतर्गत ग्रुप २ मध्ये दक्षिण आफ्रिका, युएसए, वेस्ट इंडिज व इंग्लंड तर ग्रुप १ मध्ये भारतासह अफगाणिस्तान, बांग्लादेश आणि ऑस्ट्रेलिया या संघाचा समावेश आहे.