नवी दिल्ली : ब्रिटनमधील संसदीय निवडणुकीत काश्मीरच्या मुद्द्यावरून मतं मागितली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काश्मीरच्या स्वातंत्र्याबाबत आवाज उठविण्याचा प्रयत्न कंझर्व्हेटिव्ह पक्षाकडून करण्यात येत आहे. विशेष म्हणजे पक्षाच्या नेत्याने हिंदू द्वेष, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा द्वेष व भारतविरोधी प्रचाराद्वारे आपल्या भागातील मुस्लिमांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, ब्रिटनमधील कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते मार्को लाँगी या नेत्याने काश्मीरच्या “स्वातंत्र्याचा” मुद्दा ब्रिटीश संसदेत मांडण्यासाठी इस्लामवाद्यांकडे मते मागत आहे. माध्यमांच्या माहितीनुसार, डुडले शहरात ब्रिटिश पाकिस्तानी व काश्मिरी समुदायाच्या लोकांना संबोधित करताना नेते मार्को लाँगी यांनी बकर ईदच्या शुभेच्छादेखील दिल्या आहेत.
नेते लाँगी यांनी भारतविरोधी अपप्रचार करण्यास सुरुवात केली. या भाषणात ते म्हणाले, पंतप्रधान मोदींनी नुकतेच स्पष्टपणे सांगितले की, ते काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देणार आहेत, याचा अर्थ काश्मिरींचा सार्वभौमत्वाचा अधिकार आणि विशेष दर्जा काढून घेतला जाईल. मार्को लाँगी यांनी सांगितले की, २०१९ मध्ये जेव्हा ते खासदार झाले तेव्हा ते सरकारकडून काश्मिरींवर होत असलेल्या अत्याचारांबद्दल बोलले होते.