'माझ्यावरील हल्ल्याबाबत चर्चा करणार का?', इंडी आघाडीला नवं चॅलेंज!

18 Jun 2024 16:45:23
indi alliance challenge


नवी दिल्ली :     आम आदमी पक्षाच्या (आप) राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांनी काँग्रेसप्रणित इंडी आघाडीच्या नेत्यांना पत्र लिहून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे सहकारी विभव कुमार याने त्यांच्यावर केलेल्या हल्ल्याबाबत चर्चा करण्यासाठी वेळ मागितला आहे.

काँग्रेस खासदार राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) अध्यक्ष शरद पवार आदी नेत्यांना खासदार स्वाती मालीवाल यांनी पत्र लिहिले आहे. आपल्यावर हल्ला करणाऱ्या विभव कुमारविरोधात पोलिस तक्रार केल्यानंतर आपद्वारे आपल्याविरोधात चारित्र्यहननाची मोहिम चालविण्यात आली. आपल्याला पाठिंबा देण्याऐवजी सातत्याने चारित्र्यावर हल्ले करण्यात आले.




दरम्यान, धक्कादायक म्हणजे स्वपक्षाचेच नेते आणि कार्यकर्त्यांकडून त्रास सहन करावा लागत असल्याचे मालीवाल यांनी पत्रात म्हटले आहे. आपण गेली १८ वर्षे सार्वजनिक जीवनात कार्यरत असल्याचे मालीवाल यांनी पत्रात सांगितले आहे. त्याचप्रमाणे महिला आयोग अध्यक्षपदाच्या ९ वर्षांमध्ये १.७ लाख खटल्यांची सुनावणी केली आहे. कोणाचेही भय न बाळगता आणि दबावासमोर न झुकता महिला आयोगात काम करून आयोगास नवी उंची प्राप्त करून दिली आहे.

मात्र, मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आपल्याला बेदम मारहाण करण्यात आली हे अतिशय दु:खदायक आहे. या प्रकाराची चर्चा करण्यासाठीच इंडी आघाडीच्या बड्या नेत्यांना आपण पत्र लिहून भेटीची वेळ मागितली असल्याचे मालीवाल यांनी पत्रात लिहिले आहे.







Powered By Sangraha 9.0