कंचनजंगा एक्सप्रेस अपघात : मृतांना १० लाख तर जखमींना २.५ लाखांची मदत जाहीर!

    17-Jun-2024
Total Views |
kanchanjungha express accident


नवी दिल्ली :      पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग जिल्ह्यात कंचनजंगा एक्सप्रेस आणि मालगाडी अपघातात काही प्रवाशांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतांमध्ये लोको पायलट व गार्ड यांचाही समावेश आहे. दरम्यान, सियालदहहून आगरतळाकडे जाणारी कांचनजंगा एक्सप्रेस (१३१७४) रंगपानी स्थानकाजवळ उभी असताना सकाळी ९ वाजता हा अपघात झाला आहे.
 
दरम्यान, अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांना वाढीव अनुग्रह भरपाई दिली जाईल.तसेच, मृतांना १० लाख रुपये तर गंभीर जखमी झालेल्यांना २.५ लाख रुपये व किरकोळ जखमींना ५० हजार रुपये देण्यात येतील, असे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी 'एक्स' पोस्टच्या माध्यमातून सांगितले आहे.
 
दरम्यान, न्यू जलपाईगुडी स्टेशनजीक निजाबारी स्टेशनजवळ मालगाडी व एक्सप्रेस अपघातात आतापर्यंत ०८ जणांचा मृत्यू झाला असून २५ जण जखमी झाले आहेत. या अपघातानंतर दार्जिलिंग जिल्ह्यातील फणसिडवा रेल्वेमार्गावरील ०९ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. अपघातात एक्स्प्रेसचे तीन डबे रुळावरून घसरून मोठे नुकसान झाले असून घटनास्थळी मदत व बचावकार्य करण्यात येत आहे.


अपघात नेमका झाला कसा?

माध्यमांच्या माहितीनुसार, अपघात सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास झाला असून जबलदहहून अगरतळाच्या दिशेने जाणारी कांचनजंगा एक्सप्रेस (१३१७४) रंगपानी स्टेशनजवळ उभी असताना अपघात झाला. दरम्यान, मागून भरधाव वेगात येणाऱ्या मालगाडीने एक्सप्रेसला धडक दिली. यात एक्स्प्रेसचे तीन डबे रुळावरून घसरून मोठे नुकसान झाले.