खड्डेमुक्त आणि वाहतूकयोग्य रस्त्यांसाठी महापालिकेचे सूक्ष्म नियोजन!

17 Jun 2024 19:20:01
Pothole-free roads bmc news

मुंबई (प्रतिनिधी) :
मुंबईतील नागरिकांना पावसाळ्यात कोणत्याही गैरसोयींना सामोरे जावे लागू नये म्हणून खड्डेमुक्त रस्त्यांचे उद्दिष्ट ठेवून महापालिका प्रशासन अविरत कार्यरत आहे. पालिकेच्या अखत्यारितील सर्व रस्ते वाहतूकयोग्य आणि सुरक्षित स्थितीत ठेवण्यासाठी बारकाईने नियोजन करण्यात आले आहे. रस्ते डागडुजी, खड्डे भरण्याची कामे प्रगतिपथावर आहेत.

मुंबई महापालिका क्षेत्रातील एकूण २२७ वॉर्डसाठी प्रत्येकी एक याप्रमाणे दुय्यम अभियंते नियुक्त करण्यात आले आहेत. ज्यात नेमून दिलेल्या विभागात दररोज रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी करून खड्डे आढळल्यास ते तात्काळ बुजवण्यासाठी निर्देश देण्यात येणार आहेत. एवढेच नव्हे तर, सिमेंट कॉंक्रिट रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी जिओ-पॉलिमर तंत्रज्ञानाचा प्रायोगिक तत्त्वावर वापर केला जात आहे. या पद्धतीने खड्डे भरल्यानंतर अवघ्या २ तासात रस्ता वाहतुकीसाठी खुला करता येवू शकतो. तर, डांबरी रस्त्याच्या पृष्ठभागांवर आवरण टाकून रस्त्याचे मजबुतीकरण करण्यासाठी 'मायक्रो-सर्फेसिंग' या नवीन तंत्रज्ञानाचा ही वापर केला जाणार आहे. तसेच महापालिका हद्दीतील रस्त्यांची सुरु असलेली कामे दि. १० जून २०२४ पर्यंत पुर्ण करण्यासह वाहतुक योग्य सुरक्षित स्थितीत आणण्याचे निर्देश पालिकेने याआधीच आढावा घेत दिले होते. त्याचबरोबर कंत्राटदारांकडून रस्ते विषयक कामे करण्यास विलंब झाल्यास निविदेच्या अटी व शर्तीनुसार कंत्राटदारांवर कारवाई करण्यात येणार आहे.



Powered By Sangraha 9.0