नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार, दि. १७ जून २०२४ संध्याकाळी मनिपूरमधील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए पुन्हा सत्तेत आल्यानंतर केंद्र सरकारची ही पहिलीच उच्चस्तरीय बैठक आहे. या बैठकीला केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला, गुप्तचर विभागाचे प्रमुख तपन डेका, लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे, लष्करप्रमुख (पदयुक्त) लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी, थ्री कॉर्प्सचे जीओसी एचएस साही, मणिपूर सुरक्षा सल्लागार कुलदीप सिंग, मणिपूरचे मुख्य सचिव विनीत सिंह उपस्थित होते.
गेल्या वर्षी दि. ३ मे पासून मणिपूरमध्ये कुकी आणि मेतई या दोन समुदायांमध्ये संघर्ष सुरू आहे, ज्यामध्ये किमान २२५ लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे आणि सुमारे ५०,००० लोक बेघर झाले आहेत. बेघर लोकांना अजूनही मदत केंद्रांमध्ये आसरा घ्यावा लागत आहे. ईशान्येकडील राज्यात गेल्या काही आठवड्यांत हिंसाचाराच्या अनेक ताज्या घटना घडल्या आहेत. गेल्या आठवड्यात, सशस्त्र अतिरेक्यांनी कांगपोकपी जिल्ह्यात मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांच्या सुरक्षा दलाच्या ताफ्यावर हल्ला केला होता, त्यात एक नागरी चालक आणि एक सुरक्षा अधिकारी जखमी झाला होता.
यापूर्वी, शाह यांनी गेल्या महिन्यात मणिपूरला भेट दिली होती आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी मेतई आणि कुकी या दोन्ही समुदायांच्या प्रतिनिधींसोबत नऊ शांतता बैठका घेतल्या होत्या. या बैठकांच्या माध्यमातून मणिपूरमध्ये सुरू असलेला हिंसाचार कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण, अद्याप मणिपूरमध्ये पूर्णपणे शांतता प्रस्थापित झाली नाही.