मुंबई : विधान परिषदेच्या जागावाटपावरून उद्धव ठाकरे यांचा जाहीर उपमर्द करणार्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेला दांडी मारल्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आले आहे. काँग्रेस मविआत मोठा भाऊ असल्याचे विधान केल्यानंतर त्यांनी ठाकरेंसह शरद पवारांचीही नाराजी ओढवून घेतली होती. त्यांच्याऐवजी बाळासाहेब थोरात आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या पत्रकार परिषदेला हजेरी लावली.लोकसभेत मिळालेल्या यशानंतर महाविकासआघाडीच्या तिन्ही प्रमुख पक्षांनी शनिवार, दि.15 जून रोजी पहिल्यांदाच संयुक्त पत्रकार परिषद बोलावली.
त्याला शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या वतीने प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उपस्थित राहणे अपेक्षित होते. मात्र, पटोलेंनी मतदारसंघातील दौर्याचे कारण पुढे करीत अनुपस्थिती दर्शवली. उद्धव ठाकरेंवर जाहीर टीका केल्यामुळे हायकमांडने अलीकडेच त्यांचे कान टोचले होते. त्यामुळे नाराज झालेल्या पटोलेंनी उद्धव ठाकरेंसोबत पत्रकार परिषदेला उपस्थित राहणे टाळल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी आगामी विधानसभा निवडणूक एकत्रितरित्या लढविण्याची घोषणा केली. मात्र, नाना पटोले यांनी त्याआधीच स्वबळाचा नारा देऊन टाकला.
भंडारा- गोंदिया मतदारसंघात पाहणी दौर्यावर आले असता, राज्यातील काँग्रेसच्या तयारीबाबत आणि पुढील राजकीय वाटचालीबाबत माध्यमांनी त्यांना विचारणा केली. त्यावर ते म्हणाले की, ”महाराष्ट्रात आम्ही सगळीकडे तयारी चालू केली आहे. मी इथला आमदार आहे. मला इथे कामांची पाहणी यावे लागते.” परंतु, राज्यातील 288 मतदारसंघात काँग्रेसची विधानसभेची तयारी सुरू झाली आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
वडेट्टीवारांना निमंत्रणच नाही
विधानसभेतील विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनाही मविआच्या संयुक्त पत्रकार परिषदेचे निमंत्रण देण्यात आले नाही. त्याबाबत त्यांनी नाराजी बोलून दाखवली. त्यामुळे काँग्रेसमध्ये विदर्भातील नेत्यांना बाजूला करून, पश्चिम महाराष्ट्रातील नेते पुन्हा वरचढ होऊ लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
मविआत एकी नाही - दरेकर
उद्धव ठाकरे मुसलमान किंवा मुस्लिम धर्मियांना सोडायला तयार नाहीत. एकगठ्ठा मतदानामुळे ते खुशीत आहेत. मात्र, ठाकरेंनी हे लक्षात घेतले पाहिजे की, आपल्या अशा वागण्याने मराठी आणि हिंदू माणूस दुखावला गेला आहे. तो तुमचा वचपा काढल्याशिवाय राहणार नाही. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकत्र आहोत, असे दाखविण्याचा प्रयत्न करीत आहेत. तथापि, महाविकास आघाडीचे नेते, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले जाणीवपूर्वक पत्रकार परिषदेला उपस्थित राहिले नाहीत. दुसर्या बाजूला त्यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. त्यामुळे त्यांच्यात एकी दिसत नाही.
- आ. प्रवीण दरेकर, विधान परिषदेतील गटनेते, भाजप