‘मुंज्या’तील चेटुकवाडीची खासियत आदित्य सरपोतदारांनी केली रिव्हिल

15 Jun 2024 14:54:02

Munjya 
 
 
 
 
रसिका शिंदे-पॉल
 
मुंबई : आदित्य सरपोतदार दिग्दर्शित ‘मुंज्या’ हा हिंदी चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घालत आहे. ७ जून २०२४ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने आत्तापर्यंत ३० कोटींच्या पुढे यशस्वी कमाई केली आहे. मुंज्या चित्रपटातील चेटुकवाडीबद्दल आदित्य सरपोतदार यांनी ‘दै. मुंबई तरुण भारत’शी बोलताना महत्वाची माहिती दिली आहे.
 
‘मुंज्या’ची चेटुकवाडी व्हि.एफ.एक्सने उभी केली
 
मुंज्या चित्रपटाच्या चित्रिकरणाची एक खासियत सांगताना आदित्य म्हणाले की, “मुंज्या चित्रपटात जी चेटुकवाडी, किल्ला, पायवाट हे सारं काही दाखवलं हे सारं काही व्हि.एफ.एक्सच्या मदतीने उभं केलं आहे. मुंज्या ज्या पिंपळाच्या झाडावर राहतो ते झाड आणि जंगल याचा आम्ही मुंबईच्या फिल्मसिटीत एका बंद स्टुडिओमध्ये तो सेट उभारला होता. आणि बाकी सगळं चेटुकवाडीचं जग आम्ही व्हि.एफ.एक्सने उभारलं होतं. कथेच्या मागणीनुसार रात्री आम्ही शुट करत होतो आणि दिग्दर्शन म्हणून मला हवं तसं लोकेशन मिळत नसल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला होता”.
 
आदित्य सरपोतदार यांचे आगामी हिंदी चित्रपट लवकरच येणार असून त्यापैकी एका चित्रपटाबद्दल माहिती देताना ते म्हणाले की, “अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा यांच्यासोबत काकूडा हा चित्रपट मी दिग्दर्शित केला असून ओटीटीवर लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. काकूडा हा चित्रपटही हॉरर-कॉमेडी असून ही कथा मथुरेतील एका गावाची आहे. त्या गावात एक भूत आहे ज्याला काकूडा म्हटलं जातं. तर ती कथा या चित्रपटातून मांडण्याचा प्रयत्न करणार आहे”.
 
दरम्यान, ‘मुंज्या’ या चित्रपटात अभय वर्मा, शर्वरी वाघ, सुहास जोशी, भाग्यश्री लिमये, मोना सिंग, अजय पुरकर यांच्या महत्वपुर्ण भूमिका आहेत. कोकणातील चेटुकवाडीतील ही काल्पनिक कथा ‘मुंज्या’ या चित्रपटातून फार उत्तमरित्या मांडली आहे.
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0