मुंबई : उद्धव ठाकरेंच्या वागण्यामुळे मराठी, हिंदु माणूस दुखावला गेलाय. त्यामुळे तो तुमचा वचपा काढल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा भाजप आमदार प्रविण दरेकर यांनी दिला आहे. यावेळी त्यांनी शरद पवारांवरही निशाणा साधला. पवारांनी देशात जातीपातीच्या भींती उभ्या केल्याचे त्यांनी म्हटले आहे.
प्रविण दरेकर म्हणाले की, "उद्धव ठाकरे मुस्लिम धर्मियांपासून मागे हटायला तयार नाहीत. त्यांना एकगठ्ठा मतदान झाल्याने ते खुशीत आहेत. ठाकरेंनी हेही लक्षात घेतले पाहिजे की, आपल्या अशा वागण्याने आणि मिळालेल्या विजयाने मराठी, हिंदू माणूस दुखावला गेला आहे. त्यामुळे तोही तुमचा वचपा काढल्याशिवाय राहणार नाही," असा इशारा त्यांनी ठाकरेंना दिला आहे.
हे वाचलंत का? - "महाविकास आघाडीत मोठा भाऊ...;" काँग्रेस नेत्यांचं विधान
यावेळी त्यांनी शरद पवारांवरही टीका केली. ते म्हणाले की, "शरद पवार यांनी कशा प्रकारे राजकारण केले हे महाराष्ट्र पाहतोय. शरद पवारांनी देशात आणि महाराष्ट्रात जातीपातीच्या भिंती उभ्या केल्यात. सत्तेत असताना सुडाचे राजकारण केले. त्यांना सल्ला देण्याचा नैतिक अधिकार नाही," असे ते म्हणाले.
शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाटांनी केलेल्या वक्तव्यावर बोलताना ते म्हणाले की, "महायूतीत विसंवाद आणि वितुष्ट निर्माण होईल, असा दावा कुणीही जाहीरप्रणे प्रसारमाध्यमातून करु नये. पक्षाचे शीर्षस्थ नेतृत्व बसून कुणाला किती जागा द्यायच्या हा विषय सोडवतील. अन्यथा महाविकास आघाडीसारखंच मोठा भाऊ, छोटा भाऊ करत आपल्यात वादविवाद होतील. हे कृपया सर्वांनी टाळावे आणि प्रवक्तेव व प्रमुख नेत्यांनी याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे."