मुंबई : या निवडणूकीमध्ये महाविकास आघाडीत मोठा भाऊ, छोटा भाऊ वगैरे काही चालणार नाही, असं वक्तव्य काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे. शनिवार, १५ जून रोजी महाविकास आघाडीची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे आणि शरद पवारांसह मविआतील नेते उपस्थित होते.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, "या निवडणूकीमध्ये मोठा भाऊ, छोटा भाऊ वगैरे काही चालणार नाही. प्रत्येक मतदारसंघात सर्वात चांगला उमेदवार कुठल्या पक्षाकडे आहे आणि मागच्या निवडणूकीचा संदर्भ घेऊन जागावाटपाचा निर्णय घेऊ. तो निर्णय लवकरात लवकर होईल. ज्याप्रमाणे आम्ही लोकसभेची निवडणूक लढवली त्याच पद्धतीने आता विधानसभेचीही निवडणूक आम्ही एकत्र लढवणार आहोत," असे ते म्हणाले.
हे वाचलंत का? - "मविआची अवस्था म्हणजे घराला नाही कौल आणि..."; चित्राताईंचा खोचक टोला
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, "आमचा गुजरातबद्दल काही राग नाही. इंडी आघाडीचं सरकार आल्यावर आम्ही त्यांना त्यांच्या हक्काचं देऊ. पण यासाठी मोदी आणि अमित शाह गुजरात आणि संपूर्ण देश यांच्यामध्ये जी भिंत उभी करत आहेत, ती अत्यंत घातक आहे. आमची प्राथमिक बैठक झालेली आहे. आम्ही तीन पक्ष सोबत आहोतच पण इतर घटक पक्ष आणि सामाजिक संघटनांना सोबत घेऊनच आम्ही लढणार आहोत," असे ते म्हणाले.