( फोटो क्रेडिट : अमित चक्रवर्ती)
मुंबई : म्हाडा आणि मुंबई महानगरपालिकेने संयुक्त कारवाईत करत जुहू येथील शुभ जीवन सहकारी गृहनिर्माण संस्थेतील एक अनाधिकृत होर्डिंग हटवले आहे. घाटकोपरच्या घटनेनंतर पालिका प्रशासनाने मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार अनाधिकृत होर्डिंग हटवण्यासाठी विशेष मोहिम हाती घेतली आहे.
म्हाडाचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी म्हाडाच्या मालमत्तांवरील होर्डिंगचा आढावा घेऊन आणि सर्वेक्षण केले. दरम्यान सर्वेक्षणानंतर ६२ पैकी ६० होर्डिग म्हाडाकडून आवश्यक एनओसी न घेता लावण्यात आल्याचे निदर्शनास आले. ते ६० होर्डिंग पालिकेच्या परवानगीने बसवण्यात आले होते,परंतु म्हाडाकडून एनओसी घेण्यात आली नव्हती.
याप्रकरणी संजय जयस्वाल म्हणाले की, "नागरिकांच्या सुरक्षेसाठी आम्ही सर्वेापरी प्रयत्न करणार असून नियमांचे पालन करून अनाधिकृत होर्डिंग हटवण्यात येतील. जुहू येथील कारवाई सार्वजनिक सुरक्षेसाठी आमचे समर्पण अधोरेखित करते."
गेल्या दोन महिन्यात म्हाडाने अनधिकृत होर्डिंग्जच्या मालकांना नोटिसा जारी केली आहे. ज्यात त्यांनी एका ठराविक वेळेत म्हाडाची एनओसी सादर करण्यास सांगितले आहे. असे केले नाही तर, जाहिरातदारांचे परमिट रद्द केले जाईल आणि मुंबई नगर अधिनियम १८८८ अंतर्गत कायदेशीर कारवाई केली जाईल.