अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेतर्फे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान
मुंबई : दरवर्षीप्रमाणे यंदाही नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांच्या स्मृतिदिनाप्रीत्यर्थ १४ जून २०२४ रोजी पुरस्कार वितरण करण्यात आले. यावेळी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे महाराष्ट्र भूषण अशोक सराफ आणि ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना जीवनगौरव पुरस्कार करण्यात आला. तसेच, या सोहळ्याच्या निमित्ताने यशवंतराव चव्हाण नाटय संकुलाच्या नूतनीकरणानंतर यशवंत नाट्य मंदिर रसिकार्पण सोहळा देखील संपन्न झाला.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर आपले मनोगत व्यक्त करताना अशोक सराफ म्हणाले की, “"ज्या ठिकाणी वाढलो आणि माझी कला सादर केली तिथे प्रेक्षकांनी मला दाद देत मी करत असलेलं काम चांगलं आहे आणि ते सुरु ठेवावं हे प्रोत्साहन दिलं त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. मुळात नाटक, चित्रपट करणं सोप्पं नाही आहे. त्यातून मिळणारी प्रसिद्धी, पैसा मिळवणं कठीण तर आहेच पण त्याहूनही ते टिकवून ठेवणं ही फार मोठी गोष्ट आहे. भविष्यात तुम्ही कसे असाल याचा विचार वर्तमानात करणं फार गरजेचं असतं आणि मी कायम तेच केलं. प्रेक्षकांचे विशेष आभार कारण त्यांनी चेहरा न पाहता केवळ कला पाहिली आणि त्याचंच फळ म्हणजे आज मिळालेला जीवन गौरव पुरस्कार".
तर रोहिणी हट्टंगडी म्हणाल्या की, “बाहेर कितीही चांगलं काम करुन आलो तरी घरी आल्यानंतर घरच्यांची शाबासकी काही वेगळीच असते. १९७४ साली नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा मधून शिक्षण पूर्ण झाल्यावर तिथेच नोकरीची संधी आली होती पण परत जाऊन महाराष्ट्रातच काम करायचं आहे हे ठरलेलं असल्यामुळे नोकरी काही स्वीकारली नाही. आणि त्या निर्णयाला ५० वर्ष पूर्ण झाली. आजवर वेगळ्या भूमिका आणि शैलींमधून कामं केली. यातून एक समजलं की मला खुप काही मिळालं पण प्रेक्षकांना अजूनही बरचं काही द्यायचं आहे हे देखील जाणवलं. जो पर्यंत हातपाय चालत आहेत तोपर्यंत मी अभिनय करत राहणारच. तसेच असा एखादा सोहळा व्हावा जिथे जगभरातील विविध भाषिक नाटकं सादर व्हावीत अशी मनोभावे इच्छा आहे".
“यशवंत नाट्यगृह संकुलाच्या नव्या रुपात उभ्या राहिलेल्या वास्तुचे उद्घाघटन आज झाले असून आता राज्यातील इतर नाट्यगृहांची अवस्था देखील लवकरच सुधारु”, अशी ग्वाही अ.भा.मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी दिली. तसेच, उदियोगमंत्री उदय सामंत यांनी यावेळी वृद्ध कलाकारांच्या आश्रमाबद्दल माहिती देत मुंबईजवळ २ एकर जागा राखीव करण्यात आली असून या उपक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २५ कोटींचा निधी जाहीर केला असल्याची माहिती सामंत यांनी दिली.