नवी दिल्ली : कुवैत येथील कामगार असलेल्या इमारत आग दुर्घटनेत ४५ भारतीयांचा दुर्देवी मृत्यू झाला. मृतदेहांना कुवैतहून भारतात आणण्यात आले असून मृतांमध्ये केरळचे रहिवासी असल्याचे समोर आले आहे. कुवैतहून मृतदेहांना घेऊन निघालेले भारतीय हवाई दलाचे विशेष विमान कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले. या विमानाद्वारे मृत कामगारांचे पार्थिव आणण्यात आले असून त्यानंतर पार्थिव कुटुंबीयांकडे सोपविण्यात येईल.
दरम्यान, कुवैतमधील मंगफ येथे एका इमारतीला लागलेल्या आगीत अनेकांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये भारतीय लोकांचा समावेश असून ४५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, दक्षिण मंगफमधील आग दुर्घटनेत मृत पावलेले भारतीय केरळचे असल्याचे समोर आले. तर दुर्घटनेत ५० हून अधिक भारतीय जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अथक प्रयत्नानंतर इमारतीला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
आग दुर्घटनेत मृत पावलेल्यांमध्ये केरळमधील २३, तामिळनाडूतील ७, आंध्र प्रदेश आणि उत्तर प्रदेशमधील ३, ओडिशातील २ आणि बिहार, पंजाब, कर्नाटक, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, झारखंड आणि हरियाणामधील एका व्यक्तीचा समावेश आहे, असे भारतीय दूतावासाने सांगितले आहे.