"ज्यांच्यासाठी हिंदुहृदयसम्राटचं जनाब बाळासाहेब ठाकरे केलं त्यांनी..."; फडणवीसांचा टोला

14 Jun 2024 12:13:57
 
Fadanvis
 
मुंबई : ज्यांच्यासाठी हिंदुहृदयसम्राटऐवजी जनाब बाळासाहेब ठाकरे केलं त्यांनीच उद्धव ठाकरेंना मुंबईत मतदान केलं आहे, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. गुरुवारी मुंबई पदवीधर निवडणूकीचे भाजपचे उमेदवार किरण शेलार यांच्या प्रचारार्थ वांद्रे येथे विजय संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.
 
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "मुंबईत महाविकास आघाडीपेक्षा महायूतीला २ लाख मतं जास्त मिळाली आहेत. त्यांच्या ४ जागा आल्या आणि आपल्या २ जागा निवडून आल्यात. पण त्यांच्या चार जागा कुठून आल्या हे नीट बघितलं तर आपल्या लक्षात येईल की, आम मुंबईकरांनी आणि मराठी माणसांनी त्यांना मतदान केलेलं नाही. गेले चार महिने ते ज्यांचे पाय पकडत होते, ज्यांच्याखातर त्यांनी हिंदु बांधवांनो, भगिनिंनो म्हणणं सोडलं होतं आणि ज्यांच्याकरिता त्यांनी हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे वरुन जनाब बाळासाहेब ठाकरे केलं होतं त्यांच्याच मतांवर त्यांनी विजय मिळवला आहे. पण हे अरिथमॅटिक विधानसभा, महानगरपालिका आणि विधानपरिषदेतही चालणार नाही.
 
"महायुतीची लढाई ही एकट्या इंडी आघाडी सोबत नसून खोट्या अपप्रचारासोबत होती. पण हा अपप्रचार सतत चालणार नाही 'We Will Bounce Back'. आम्ही महाराष्ट्रात पुन्हा ताकदीने विधानसभा आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीत विजय मिळवून पालिकेवर भगवा झेंडा नक्कीच फडकवणार," असे ते म्हणाले.
 
ते पुढे म्हणाले की, "भाजपाला किरण शेलार यांच्यासारखा तरुण, तडफदार, संघर्षातून उभा राहिलेला युवा उमेदवार मिळाला आहे. मुंबईच्या बीडीडी चाळीत जन्मलेल्या किरण शेलार यांना सामान्य मुंबईकरांच्या दुःखाची आणि त्यांच्या संवेदनांची जाणीव आहे. त्यांच्या विचारांची मांडणी ही अतिशय पक्की आहे. खऱ्या अर्थाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राष्ट्रवादाच्या विचारातून त्यांची जडणघडण झाली आहे. विविध जबाबदाऱ्या सांभाळत पत्रकारिता क्षेत्रात आपले विचार त्यांनी निर्भीडपणे शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवले आहेत. किरण शेलार यांच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला भाजपा कार्यकर्ते नक्कीच पाठींबा देतील," असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
 
 
 
Powered By Sangraha 9.0