क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाची निविदा प्रक्रिया तातडीने राबवा : उपमुख्यमंत्री अजित पवार

14 Jun 2024 16:24:54
 
Ajit Pawar
 
पुणे : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाची निविदा प्रक्रिया तातडीने राबवा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिले आहेत. शुक्रवारी विधानभवन येथे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
 
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, " महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेली भिडेवाडा येथील पहिली मुलींची शाळा येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे राष्ट्रीय स्मारक उभारण्याच्यादृष्टीने आवश्यक ती प्रक्रिया करुन गतीने निविदा प्रक्रिया राबवावी. हे स्मारक पार्किंग तसेच तळमजला अधिक तीन असे चार मजल्यांचे करण्याचा बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. यात तळ मजल्यावर महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा पुतळा, त्यांचा जीवनपट दर्शविणारे म्युरल्स किंवा चित्रमय व्यवस्था करण्यात येईल. त्यानंतर वरच्या मजल्यावर त्यांच्या जीवनातील प्रसंग आणि कार्याची माहिती स्क्रीनवर दृकश्राव्य स्वरुपात दर्शविण्याची यंत्रणा तसेच त्यांचे लेखन साहित्य आणि वरील मजल्यावर मुली, महिलांच्या कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण संस्था अशी व्यवस्था करण्यात यावी," असे निर्देश त्यांनी दिले.
 
हे वाचलंत का?  - प्रतिभा धानोरकरांचा गंभीर आरोप, म्हणाल्या, "मला तिकीट न मिळण्यासाठी..."
 
फुलेवाडा येथील महात्मा फुले यांच्या स्मारकाच्या विस्ताराचाही आढावाही या बैठकीत घेण्यात आला. गंजपेठ येथील महात्मा फुले वाडा व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या स्मारकांच्या विस्तारासाठी आगामी अर्थसंकल्पात २०० कोटींची तरतुद करणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी सांगितले. तसेच जुलै अखेरीस या कामाचे भूमिपूजन करायचे असल्याने स्मारकाचे अंदाजपत्रक तयार करुन निविदा प्रक्रिया राबविण्याच्या दृष्टीने गतीने कार्यवाही करण्याच्या सूचना यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या.
 
 
 
Powered By Sangraha 9.0