कळव्यात इमारतीचा स्लॅब कोसळला - तिघे रहिवाशी जखमी

13 Jun 2024 18:30:26

स्लाब
 
ठाणे : कळव्यातील भुसारआळी मधील ओम कृष्णा इमारतीतील तिसऱ्या मजल्यावरील घराचा स्लॅब दुसऱ्या मजल्यावर कोसळून तिघे जण जखमी झाल्याची घटना बुधवार (ता १२ जून ) मध्यरात्री १२ वा.च्या सुमारास घडली. ही ३० ते ३५ वर्ष जुनी धोकादायक इमारत ठाणे महापालिकेने रिकामी केली असून इमारतीतील रहिवाश्यांची नातेवाईकाकडे राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.दरम्यान, पावसाळ्याच्या तोंडावर पडझड सुरू झाल्याने धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कळव्यातील भुसारआळी मधील ओम कृष्णा को.ऑप. सोसायटी ही चार मजली ३० ते ३५ वर्ष जुनी इमारत असून या इमारतीमध्ये ३० कुटुंब राहतात.
 
ही इमारत महापालिकेने धोकादायक घोषित केली होती. बुधवारी रात्री बाराच्या सुमारास रूम क्रमांक ३०२ चा स्लॅब अचानक दुसऱ्या मजल्यावरील घरात पडल्याने एकाच कुटुंबातील तिघे जण जखमी झाले. या दुर्घटनेत तिसऱ्या मजल्यावरील घरातील मनोहर दांडेकर (७०) यांच्या डाव्या हाताला दुखापत, मनीषा दांडेकर (६५) यांच्या कमरेला व छातीला दुखापत तर मुलगा मयूर दांडेकर (४०) यांच्या पायाला व पाठीला दुखापत झाली असून सर्व जखमींना आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचारी व अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप बाहेर काढून उपचारासाठी कळव्यातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
 
Powered By Sangraha 9.0