अनधिकृत खोदकामे आढळल्यास पोलिसात तक्रार करा

13 Jun 2024 13:31:31

matunga


मुंबई, दि.१३ :
माटुंगा (पूर्व) परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील पदपथ खोदून अज्ञातांनी केबल चोरून नेल्याची घटना काही दिवसांपूर्वी उघडकीस आली. याबाबत प्रकरणाची मुंबई महानगरपालिकेने गंभीर दाखल घेत अनधिकृत खोदकामे आढळल्यास पोलिसात तक्रार दाखल करण्याचे निर्देश महानगरपालिका प्रशासनाकडून सर्व विभागातील सहायक आयुक्तांना देण्यात आले आहेत.
दरम्यान, मुंबई महानगरपालिकेने दि. १७ मे रोजी पोलिसांत तक्रार केली तर, महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (एमटीएनएल) यांनी माटुंगा पोलिस ठाण्यात दिनांक ३० मे रोजी गुन्हा दाखल केला आहे. या अनधिकृत खोदकामातून बृहन्मुंबई महानगरपालिका आणि महानगर टेलिफोन निगम लिमिटेड यांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. या प्रकरणाची मुंबई महानगरपालिकेने गंभीर दखल घेतली आहे. याच अनुषंगाने मुंबई महानगरातील इतर सर्व प्राधिकरणांनाही महानगरपालिकेने कळविले आहे.

दादर, माटुंगा परिसरातील एमटीएनएल ग्राहकांना सेवा देण्यासाठी एमटीएनएलने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिपत्याखालील पदपथाखालून वाहिनी (केबल) टाकली आहे. एमटीएनएलकडे ग्राहकांच्या दूरध्वनी सेवा खंडित झाल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात प्राप्त होऊ लागल्या तेव्हा शोध घेतला असता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील बस थांब्याजवळ अज्ञातांनी पदपथ खोदून १०३ मीटर लांबीची वाहिनी चोरुन नेल्याचे निदर्शनास आले. या वाहिनीतील ६ लाख ७८ हजार रुपयांचे तांबे अज्ञातांनी चोरून नेले आहे. याबाबत एमटीएनएलने माटुंगा पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. तसेच, दि. ११ जून रोजी पुन्हा याप्रकरणी पोलिसांना पत्र पाठवून माटुंगा परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग व इतर आसपासच्या मार्गांवर रात्री पोलिस गस्त वाढवावी, असे देखील या अर्जात महानगरपालिकेच्या एफ उत्तर विभागाचे सहायक आयुक्त चक्रपाणी अल्ले यांनी नमूद केले आहे.
Powered By Sangraha 9.0