भाजपचे माजी आमदार मधू देवळेकर यांचे निधन

13 Jun 2024 12:34:14

मधू देवळेकर  
 
मुंबई : भाजपचे माजी आमदार मधू देवळेकर यांचे बुधवार, दि. १२ जून रोजी निधन झाले. वयाच्या ९२व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गुरुवार, दि. १३ जून रोजी सांताक्रूज स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. मधू देवळेकर १९४५ मध्ये रा. स्व. संघाशी जोडले गेले. १९५२ मध्ये त्यांनी जनसंघाच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला. मुंबई पदवीधर मतदारसंघाचे त्यांनी दोनवेळा प्रतिनिधित्व केले होते. १९७८ ते १९८८ या काळात त्यांनी विधानपरिषदेचे आमदार म्हणून आपल्या कार्याचा अमिट ठसा उमटवला.
 
मुंबई भाजपचे पहिले सरचिटणीस म्हणूनही त्यांनी कामगिरी बजावली. त्यांच्या निधनाबद्दल अनेक नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले, “भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार मधू देवळेकर यांचे निधन ही अतिशय दुःखद घटना आहे. त्यांच्या निधनाने भाजप परिवारातील एक ज्येष्ठ मार्गदर्शक हरपला आहे. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न येणारी आहे,” अशी प्रतिक्रिया चव्हाण यांनी दिली.
 
रा. स्व. संघ आणि जनसंघासाठी संपूर्ण आयुष्य समर्पित करणार्‍या माजी आमदार मधू देवळेकरजी यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. आयुष्य एका ध्येयाला वाहून देताना विविध जबाबदार्‍या त्यांनी सांभाळल्या. मुंबई भाजपमध्ये विविध जबाबदार्‍या त्यांच्यावर होत्या. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
- देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
 
Powered By Sangraha 9.0