वर्सोव्यात आणखी एक अनधिकृत इमारत जमीनदोस्त

13 Jun 2024 12:47:41



varsova


मुंबई, दि.१३:
वेसावे (वर्सोवा) येथील अनधिकृत बांधकामाविरोधातील मोहीम मुंबई महानगरपालिकेने अधिक तीव्र केली आहे. वेसावे येथील शिव गल्लीमध्ये अनधिकृतपणे बांधकाम सुरू असलेल्या तीन इमारतींचे निष्कासन केल्यानंतर बुधवार, दि.१२ जून रोजी आणखी एका इमारतीवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली. तळमजला आणि त्यावर दोन मजले असे या इमारतीचे स्वरुप होते.

वेसावे भागातील पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या दलदलीच्या प्रदेशावर आणि सागरी किनारा व्यवस्थापन क्षेत्रात (कोस्टल रेग्यूलेशन झोन) उद्भवलेल्या अनधिकृत बांधकामांविरोधात बीएमसी कडून कठोर कारवाई करण्यात येत आहे. वेसावेतील अनधिकृत बांधकामाविरोधात कारवाई करण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने एका विशेष पथकाचीही स्थापना करण्यात आली आहे. वेसावे गावातील शिव गल्ली येथे अनधिकृतपणे बांधण्यात आलेली आठ हजार चौरस फूट क्षेत्रफळ असलेली इमारत बुधवार, दि. १२ जून रोजी या पथकाने निष्कासित केली.


बृहन्मुंबई महानगरपालिकेचे १० अधिकारी, ५० कामगार अशा मनुष्यबळासह दोन पोकलेन संयंत्र, १० इलेक्ट्रिक ब्रेकर्स, तीन गॅस कटर्स आदी संसाधनांच्या साहाय्याने ही कारवाई करण्यात आली. यावेळी पुरेसा पोलिस बंदोबस्त तैनात होता. दरम्यान, वेसावे गाव आणि परिसरामध्ये अशाप्रकारे निर्माण झालेली अनधिकृत बांधकामे निष्कासित करेपर्यंत ही मोहीम सुरूच राहील. या भागात कोणतेही नवीन अनधिकृत बांधकाम निर्माण होणार नाही, याचीही दक्षता घेतली जाईल, असे बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात येत आहे.
Powered By Sangraha 9.0