मुंबई : पाकिस्तानच्या झेंड्यासमोर गहाण ठेवून उद्धव ठाकरेंनी ही निवडणूक लढवली आहे, असा आरोप भाजप आमदार नितेश राणेंनी केला आहे. तसेच ठाकरेंना आणि संजय राऊतांना कोणत्याही गोष्टीत २४ तास राजकारणच दिसत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
नितेश राणे म्हणाले की, "आज जर बाळासाहेब ठाकरे जिवंत असते आणि वैष्णवदेवीला जाणाऱ्या बसवर हल्ला झाला असता तर त्यांनी कुणाचं सरकार आहे हे पाहिलं नसतं. त्यांनी यात राजकारणही केलं नसतं. त्यांनी थेट इशारा दिला असता. मुंबईमध्ये बसून थेट पाकिस्तान हलवण्याची ताकद ज्या बाळासाहेबांमध्ये होती त्यांनी थेट इशारा दिला असता की, तुम्ही जर वैष्णवदेवीला जाणाऱ्या बसवर हल्ला करत असाल तर हजसाठी लोकं मुंबईतून कसे निघतात याबद्दल आम्ही तुम्हाला अद्दल घडवू."
हे वाचलंत का? - "हिंमत असेल तर पटोलेंनी ठाकरेंची मुंबई पदवीधरची जागा मिळवून दाखवावी!"
"परंतू, आताच्या उबाठाचे नेतृत्व आणि त्यांच्या प्रवक्त्यांना २४ तास राजकारणच दिसतं. हिंदु समाजावर जर असे अतिरेकी हल्ले होत असतील तर आम्हीसुद्धा महाराष्ट्रात पाकिस्तानचे झेंडे फडकवणाऱ्यांना अद्दल घडवू, असं बोलण्याची हिंमत संजय राऊतांमध्ये आहे का? कारण आता पाकिस्तान जिंदाबाद बोलणाऱ्यांनीच उद्धव ठाकरेंच्या खासदारांना मतदान केलं आहे. मग संजय राऊत कुठल्या तोंडाने घाणेरडं राजकारण करत आहेत?" असा सवाल त्यांनी केला आहे.
ते पुढे म्हणाले की, "ज्यांनी आमच्या हिंदु समाजावर हल्ला केला त्यांना चोख उत्तर देण्याची ताकद आमच्या नरेंद्र मोदी आणि अमित शाहा साहेबांमध्ये आहे. हे देशाच्या जनतेला चांगलं माहिती आहे. पण पाकिस्तानचे झेंडे फडकवून आपले खासदार निवडून आणणाऱ्या ठाकरे आणि राऊतांनी आतातरी दहशतवादावर आपलं थोबाड उघडू नये. कारण तुम्ही तुमचा इमान आणि स्वाभिमान पाकिस्तानच्या झेंड्यासमोर गहाण ठेवून ही निवडणूक लढवली आहे," असेही ते म्हणाले.