वर्सोव्यातील तीन अनधिकृत इमारतींवर हातोडा

12 Jun 2024 14:46:11

varsova

मुंबई, दि.१२:  वर्सोवा येथे अनधिकृत बांधकामाविरोधात मुंबई महानगरपालिकेकडून कठोर कारवाई सुरू आहे. वेसावे गावातील शिव गल्ली येथे अनधिकृतपणे बांधकाम सुरू असलेल्या तीन इमारती महानगरपालिकेचे इमारत व कारखाने विभाग तसेच मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त पथकाच्या वतीने मंगळवार, दि. ११ जून रोजी जमीनदोस्त केले.
वर्सोवा येथील सागरी किनारा व्यवस्थापन क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा बडगा उभारण्यात आला आहे. त्यादृष्टीने कठोर कारवाई करण्याच्या उद्देशाने मुंबई महानगरपालिकेच्यावतीने विशेष पथकाची स्थापना करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात दि. ३ आणि ४ जून रोजी वेसावे येथे दलदलीचा भाग आणि सागरी किनारा व्यवस्थापन क्षेत्र (कोस्टल रेग्यूलेशन झोन) या ठिकाणची काही अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आली होती. वेसावे गावातील शिव गल्ली येथे अनधिकृतपणे बांधण्यात आलेल्या तीन इमारती उपायुक्त (परिमंडळ-४) विश्वास शंकरवार यांच्या नियंत्रणाखाली आणि सहाय्यक आयुक्त (के पश्चिम विभाग) डॉ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या पुढाकाराने इमारत व कारखाने विभागाकडून मंगळावर दि.११ रोजी निष्कासित करण्यात आल्या. यापैकी पहिल्या इमारतीचे तळमजला आणि त्यावर एक मजला, दुसऱ्या इमारतीचे तळमजला आणि त्यावर तीन मजले तर तिसऱ्या इमारतीचे तळमजला आणि त्यावर तीन मजले असे स्वरुप होते.
बृहन्मुंबई महानगरपालिकेचे १० अधिकारी, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाचे कर्मचारी, ५० कामगार अशा मनुष्यबळासह दोन पोकलेन संयंत्र, दोन इलेक्ट्रिक ब्रेकर्स, तीन गॅस कटर्स आदी संसाधनांच्या सहाय्याने ही कारवाई करण्यात आली. यावेळी पुरेसा पोलिस बंदोबस्त तैनात होता. दरम्यान, पर्यावरणाचे रक्षण करणे आणि महानगराच्या विकासाचे आणि नियमनाचे योग्य नियोजन करणे, हे सदर कारवाईमागील उद्दिष्ट आहे. त्यामुळे, वेसावेसह अन्य कोणत्याही भागातील अनधिकृत बांधकामांना थारा दिला जाणार नाही. त्यांच्यावर तत्काळ निष्कासनाची कारवाई करण्यात येईल, असे महानगरपालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात येत आहे.
Powered By Sangraha 9.0