'हमारे बारह' चित्रपटाच्या अभिनेत्रीला कट्टरपंथीयांकडून 'सर तन से जुदा' करण्याची धमकी

12 Jun 2024 17:49:53
 Hamare 12
 
मुंबई : 'हमारे बारह' हा बॉलिवूड चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात महिलांवरील घरगुती अत्याचार आणि त्यांची सामाजिक स्थिती दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा चित्रपट दि. १४ जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. मात्र, हा चित्रपट बराच काळ वादात अडकला होता, कारण कट्टरपंथीयांनी या चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध केला होता. या चित्रपटात मुख्य भूमिका अन्नू कपूरची आहे, ज्यांच्यासोबत अदिती धीमान त्यांची मुलगी जरीनची भूमिका साकारत आहे. आता आदिती धीमानने खुलासा केला आहे की तिला कट्टरपंथीयांकडून 'सर तन से जुदा', 'बलात्कार' आणि जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत.
 
एका हिंदी वृत्तवाहिनीशी बोलताना आदिती धीमान म्हणाली की, “मला इतक्या बलात्कार आणि जीवे मारण्याच्या धमक्या आल्या की अरे देवा! सध्या सगळे माझ्या मेसेजमध्ये आहेत. ते सोशल मीडियावर खाजगीरित्या संदेश देतात आणि त्यापैकी निम्म्याहून अधिक बनावट आणि चेहरा नसलेली खाती आहेत. म्हणजे एके दिवशी मला अचानक जाग आली आणि मला खूप मेसेज दिसले. वाटलं आपण समाजासाठी काहीतरी चांगलं करू पाहतोय, पण ते आपल्याला मारतील, शिरच्छेद करतील. बलात्कार करणार. असे मेसेज येत आहेत. एक कलाकार म्हणून हे खूप हृदयद्रावक आहे, पण त्याकडे दुर्लक्ष करण्याशिवाय तुमच्याकडे काहीच पर्याय नाही.”
 
हे वाचलंत का? -  चंद्राबाबू नायडू यांनी घेतली चौथ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ; पवन कल्याण यांचीही उपमुख्यमंत्रीपदावर वर्णी
 
'हमारे बारह'मध्ये आदिती धीमान अन्नू कपूरची मुलगी जरीनची भूमिका साकारत आहे. या चित्रपटातील तिची व्यक्तिरेखा एका मुलीची आहे जी बंडखोर आहे, परंतु त्याच वेळी तिच्या पालकांच्या सन्मानाची काळजी घेते. त्यांनाही दुखवायचे नाही. तिचा जन्म अशा कुटुंबात झाला ज्यामध्ये स्त्रियांचे अस्तित्व मानले जात नव्हते. तरीही ती स्वप्न बघायला मागेपुढे पाहत नाही, या सगळ्यात झरीन कशी आपली ओळख निर्माण करते, हा चित्रपटाचा मूळ विचार आहे.
 
‘हमारा बारह’ या चित्रपटावर बंदी घालण्यात आली होती, मात्र ही बंदी उठवण्यात आली आहे. हा चित्रपट दि. १४ जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. कर्नाटकच्या काँग्रेस सरकारनेही या चित्रपटावर बंदी घालण्याची घोषणा केली होती, तर इस्लामिक कट्टरतावादी या चित्रपटाशी संबंधित लोकांना सतत धमक्या देत आहेत.
 
 
Powered By Sangraha 9.0