विजयवाडा : तेलुगु देसम पक्षाचे (टीडीपी) अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांनी बुधवार, दि. १२ जून २०२४ रोजी राज्याचे २४ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. ते चौथ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत. यासह त्यांनी आंध्रमध्ये सर्वाधिक वेळा मुख्यमंत्री बनण्याचा विक्रम केला. नायडूंच्या मंत्रीमंडळात जनसेना प्रमुख आणि अभिनेते पवन कल्याण यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
नायडू यांचा मुलगा नारा लोकेश यांचाही समावेश मंत्रीमंडळात करण्यात आला आहे. नवीन सरकारमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह २४ सदस्य असतील. यामध्ये टीडीपीच्या २०, जनसेनेच्या ३ आणि भाजपच्या एका मंत्र्यांचा समावेश आहे. विजयवाडा येथील केसरपल्ली आयटी पार्कमध्ये राज्यपाल अब्दुल नझीर यांनी मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना शपथ दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि एनडीएचे मंत्री आणि इतर राज्यांचे मुख्यमंत्रीही या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
नायडू यांच्या मंत्रिमंडळात त्यांचे पुत्र आणि टीडीपीचे सरचिटणीस नारा लोकेश, प्रदेशाध्यक्ष के. अचन्नैडू आणि जनसेना पक्षाच्या राजकीय व्यवहार समितीचे अध्यक्ष नदेंदला मनोहरयांच्यासह १७ नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. पवन कल्याण, नदेंदला मनोहर आणि कंदुला दुर्गेश हे जनसेना पक्षाचे तीन मंत्री आहेत. सत्य कुमार यादव हे एकमेव भाजप आमदार आहेत जे मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. मंत्रिमंडळात तीन महिला सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे.