ठाण्यातही होर्डिंगचा धोका...महामार्गालगतचा होर्डींग वाऱ्याने झुलतोय!

    11-Jun-2024
Total Views |
thane hoardings notice
 
 
ठाणे :      घाटकोपर येथील होर्डींग कोसळून बळी गेल्यानंतरही होर्डींगची धोक्याची टांगती तलवार कायम आहे. घाटकोपरच्या दुर्घटनेनंतर ठाणे महापालिकेच्या निर्देशानुसार जाहिरात कंपन्यांनी २६० होर्डींगचे स्थैर्यता प्रमाणपत्र सादर केले. असे असताना यातीलच एक होर्डिंग सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या पावसादरम्यान, पूर्वद्रुतगती महामार्गालगत प्लॉवर व्हॅली, ग्लॅडी अल्वारीस रस्त्यावरील भले मोठे होर्डिंग झुलताना दिसून आले. याबाबतची क्लिप सोशल मीडियावर प्रसारित होताच ठाणे महापालिकेने हे होर्डींग काढण्याबाबत संबंधितांना नोटीस बजावली आहे.

मुंबईतील घाटकोपर भागातील जाहिरात फलक कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेच्या जाहिरात विभागाने शहरातील १४ बेकायदा होर्डींग हटविण्याची कारवाई केली. याशिवाय, ठरवून दिलेल्या आकारांपेक्षा मोठ्या असलेल्या ३२ होर्डींगवरील लोखंडी पत्रे काढून टाकण्याची कारवाई करण्यात आली. त्याचबरोबर जाहिरात कंपन्यांनी २६० फलकांचे स्थैर्यता प्रमाणपत्र पालिकेकडे सादर केले आहेत. असे असले तरी कंपन्यांनी सादर केलेली प्रमाणपत्र योग्य आहेत की नाही, याची खातर करण्याची मागणी नागरिकांकडून होत होती. असे असतानाच, स्थैर्यता प्रमाणपत्र सादर केलेले एक होर्डींग वाऱ्याच्या वेगाने पडून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाल्याचे मंगळवारच्या पावसादरम्यान दिसून आले.

मंगळवारी पावसाला सुरूवात झाल्यानंतर दुपारी वाऱ्यामुळे पूर्वद्रुतगती महामार्गाजवळील ग्लॅरी अल्वारिस परिसरात एक लोखंडी होर्डींग झुलताना आढळून आला. याबाबची माहिती परिसरातील नागरिकांनी पोलीस आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर ठाणे महापालिकेचे उपायुक्त दिनेश तायडे यांच्यासह इतर अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. या जाहिरात फलकांचे स्थैर्यता प्रमाणपत्र संबंधित कंपनीकडे असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली. असे असले तरी खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने जाहिरात फलक आणि जागा मालकाला नोटीस बजावली आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून ठाणे महापालिकेने होर्डींग हटविण्याची सूचना केली आहे.


वाऱ्याने हलणारे ते होर्डिंग तात्काळ काढणार

पूर्वद्रुतगती महामार्गालगतचे वाऱ्याने हलणारे होर्डिंग तत्काळ काढण्यात येणार आहे. मंगळवारी जाहिरात विभाग उपायुक्त दिनेश तायडे, उथळसर प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्यासह महापालिकेच्या अभियंत्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच याबाबत जागामालक आणि मुक्ता अडर्व्हटायझिंग कंपनीला महापालिकेने नोटीस बजावली असुन, या होर्डिंगच्या स्थिरता प्रमाणपत्राची (स्टॅबिलिटी रिपोर्ट) छाननी करण्यात येणार आहे. भविष्यात कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी हे होर्डिंग काढण्यात येणार आहे.असे अतिरिक्त महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांनी स्पष्ट केले.