मोहन चरण माझी ओडिशाचे नवे मुख्यमंत्री!

कनकवर्धन सिंह देव व प्रवती परिदा उपमुख्यमंत्री म्हणून निवड

    11-Jun-2024
Total Views |
mohan majhi odisha


नवी दिल्ली :      मोहन चरण माझी हे ओडिशाचे भाजपचे पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत. बैठकीत माझी यांची ओडिशातील भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली. पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीनंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी हा निर्णय जाहीर केला. कनक वर्धन सिंग देव आणि प्रवती परिदा हे उपमुख्यमंत्री असतील. मुख्यमंत्री माझी आणि दोन उपमुख्यमंत्री आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्री उपस्थित असतील.

लोकसभा निवडणुकीसोबत एकाचवेळी झालेल्या विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळाल्यानंतर भाजप ओडिशामध्ये पहिले सरकार स्थापन करणार आहे. आमदारांच्या बैठकीसाठी पक्षाचे केंद्रीय निरीक्षक म्हणून राजनाथ सिंह आणि केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव राज्याच्या राजधानीत होते. ओडिशा विधानसभेत भाजपने १४७ पैकी ७८ जागा जिंकल्या.

 
कोण आहेत मोहन चरण माझी

मोहन चरण माझी यांचा जन्म ०६ जानेवारी १९७२ रोजी ओडिशातील क्योंझोर येथे झाला. ते वनवासी समुदायाचे आहेत. त्यांनी आपली राजकीय कारकीर्द सरपंच (१९९७-२०००) म्हणून सुरू केली. त्यानंतर २००० साली त्यांनी पहिल्यांदा आमदारकीची निवडणूक लढवली आणि विजयी झाले. भाजपने त्यांना राज्य आदिवासी मोर्चाचे सचिवही केले. याशिवाय २००५ ते २००९ या काळात ते राज्य एसटी मोर्चाचे सरचिटणीस आणि सरकारचे उपमुख्य व्हीपही होते. २०२४ च्या ओडिशा विधानसभा निवडणुकीत त्यांनी बीजू जनता दलाच्या मीना माझी यांचा ११,५७७ मतांच्या फरकाने पराभव केला आहे.


दोन उपमुख्यमंत्री

ओडिशामध्ये दोन उपमुख्यमंत्री असणार आहेत. त्यासाठी पटनागढचे आमदार कनकवर्धन सिंह देव आणि निमापाडाच्या आमदार प्रवती परिदा यांची उपमुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली आहे. कनक वर्धन सिंगदेव हे 1995 ते 2014 पर्यंत सलग पाच वेळा पटनागढ विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. 2024 च्या निवडणुकीत केव्ही सिंगदेव पुन्हा विजयी झाले आहेत. केव्ही सिंगदेव हे ओडिशातील बीजेडी-भाजप सरकारमध्ये उद्योग आणि शहरी विकास यासारख्या महत्त्वाच्या खात्यांचे मंत्री होते. त्याचप्रमाणे नीमपाडा मतदारसंघातून निवडणूक जिंकून पहिल्यांदाच विधानसभेत पोहोचलेल्या प्रवती परीदा यांना उपमुख्यमंत्री करण्यात आले आहे.