श्रीमद् जगद्गुरू शंकराचार्य आशीर्वचन: अध्यात्म नीतीमुल्य प्रेरणेची दिशा

    11-Jun-2024
Total Views |
Shrimad Jagatguru Shankaracharya

महाराष्ट्र एका ऐतिहासिक घटनेचा साक्षीदार ठरला. जेव्हा पहिल्यांदाच श्रीमद् जगद्गुरू शंकराचार्य कूडली शृंगेरी महासंस्थान दक्षिणाम्नाय श्री शारदा पीठाचे ७२वे पीठाधिपती श्री श्री अभिनव शंकर भारती महास्वामीजी वाडा दौर्‍यावर आले, त्यावेळी आमच्या एकतारा गुरूकुलामध्येही त्यांचे आशीर्वचन लाभले. त्यांच्या दौर्‍याचा आढावा या लेखात घेतला आहे.

महाराष्ट्रात जगद्गुरू शंकराचार्यांचा हा पहिला दौरा होता. या महत्त्वपूर्ण कार्यक्रमात पालघर क्षेत्राच्या कल्याणासाठी विविध धार्मिक आणि सांस्कृतिक विधींचा समावेश होता. या ऐतिहासिक कार्यक्रमाने वाडा येथील हिंदू समाजाला एकतेत बांधले. विविध संप्रदाय आणि सांस्कृतिक गटांचे प्रतिनिधित्व हे कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण होते. वंदनीय श्री शंकराचार्यांचे आशीर्वचन जीवन बदलवणारे ठरले. कार्यक्रमाचे आयोजन एकतारा गुरूकूल वाडा आणि स्थानिक हिंदू समाजाने केले होते. दि. ७ जून रोजी वाडा येथील खंडेश्वरी शिवमंदिरापासून मुख्यमार्गाने एक भव्य शोभायात्रा स्वामी विवेकानंद शाळेपर्यंत पोहोचली, जिथे स्थानिक सर्व हिंदू धार्मिक संघटनांचे प्रतिनिधी आणि भक्तगणांनी एकत्र येऊन समाजाला एक महत्त्वपूर्ण संदेश दिला. शोभायात्रेत जगद्गुरू शंकराचार्यांचा सुंदर रथ, सांस्कृतिक कलाकारांची टोली आणि आदिवासी संस्कृतीचे प्रदर्शन मुख्य आकर्षण होते.

शोभायात्रेनंतर जगद्गुरू शंकराचार्य यांचा प्रकट कार्यक्रम झाला, ज्यामध्ये पादुकापूजन, सांस्कृतिक कार्यक्रम, आशीर्वचन, दर्शन आणि महाप्रसाद यांचा समावेश होता. दि. ८ जून रोजी स्थानिक नवीन पिढी आणि विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी एकतारा गुरूकुलमध्ये चंद्रमौलेश्वरपूजन पार पडले. कार्यक्रमाचा समारोप तिल्सेस्वर शिवमंदिरात पूजा करून झाला.शंकराचार्य यांचे आशीर्वचन कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण होते. त्यांनी दैनिक जीवनात आध्यात्मिकतेचे महत्त्व आणि व्यक्तिगत आणि सामूहिक विकासासाठी सर्वांगीण दृष्टिकोनाची गरज यावर जोर दिला. शंकराचार्य यांचा संदेश स्पष्ट होता; समाज मजबूत करण्यासाठी सर्वप्रथम विविध प्रकारचे ऋण फेडणे आवश्यक आहे. भौतिक साधनांवर आधारित जगात आध्यात्मिक मूल्ये आणि प्रथांचे संतुलन राखणे आवश्यक आहे. पालघर हे आपल्या समृद्ध सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशासाठी ओळखले जाते. असे मानले जाते की, भगवान श्रीराम, श्रीकृष्ण, पांडव आणि असंख्य ऋषी-मुनींनी येथे दौरा केला होता. परंतु, अलीकडील काळात, प्रमुख आध्यात्मिक प्रतिनिधींची उपस्थिती दुर्मीळ झाली आहे. त्यामुळे हा कार्यक्रम अत्यंत महत्त्वपूर्ण ठरला. या कार्यक्रमामुळे समाजमाध्ये आपल्या प्राचीन आध्यात्मिक मूल्यांची प्रखरतेने जाणीव झाली.

या समृद्ध जाणिवेने समाजाची सांस्कृतिक संपन्नता आणखीन तेजोमय झाली. कार्यक्रमाची सुरुवात खंडेश्वरी नाका येथील शिवमंदिरातून झाली आणि समारोप तिल्सेस्वर मंदिरात झाला, जे दोन्ही पांडवकालीन मानले जातात. या मंदिरांच्या ऐतिहासिक आणि आध्यात्मिक महत्त्वामुळे या कार्यक्रमाचे महात्म्य आणखीनच वाढले असे म्हणू शकतो. असो वाडा येथील नागरिकांनी शंकराचार्य यांचे अभूतपूर्व उत्साह आणि आदराने स्वागत केले. छोट्या मुलांपासून वृद्धांपर्यंत लोक रस्त्यांवर उभे राहून शंकराचार्यांचे दर्शन आणि आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी जमले होते. एकता आणि सामूहिक श्रद्धेची भावना स्पष्टपणे जाणवली, ज्यामुळे वातावरणात आध्यात्मिक ऊर्जा निर्माण झाली. सर्व मंदिरांचे प्रमुख आणि कार्यकर्ते, सर्व कल्याणकारी समाज सेवक, विद्वान, वाडा क्षेत्रातील सर्व प्रमुख कार्यकर्ते तसेच सहयोगी सर्व नागरिकांनी अनुष्ठानाला ऐतिहासिक बनवले. मला असे वाटते की, पालघर क्षेत्रातील प्रत्येक संघटना आमच्या समाजाच्या विकासासाठी निरंतर काम करत आहे, परंतु आम्हाला आणखी सर्वांगीण दिशेची आवश्यकता आहे. जगद्गुरू शंकराचार्य ती दिशा आम्हाला प्रदान करू शकतात. त्यांच्या या दौर्‍याने ती दिशा आम्हाला गवसली आहे.आकाश बिश्वास