शिवकालीन शस्त्र प्रशिक्षण वर्ग

    11-Jun-2024
Total Views |
Shivkalin Shastra
 
‘शिवशंभू विचार मंच’ आयोजित शिवकालीन शस्त्र प्रशिक्षण वर्ग मुलुंड व भांडुप येथे दि. १ जून ते दि. ८ जून रोजी आयोजित करण्यात आला होता. त्याचा समारोप दि. ८ जून रोजी मुलुंड येथे पार पडला. या वर्गामध्ये ’छत्रपती शिवराय समजून घेताना’ या पुस्तकाचे प्रकाशनही संपन्न झाले. प्रशिक्षण वर्गासंदर्भात या लेखात घेतलेला मागावा

'शिवशंभू विचार मंच’ या संस्थेने शिवकालीन शस्त्र प्रशिक्षण वर्ग या कार्यक्रमाचे आयोजन मुलुंड पूर्व येथील शिव गणेश मंदिर, नाने पाडा या ठिकाणी दि. ८ जून रोजी आयोजित केले होते. म्लेंच्छ निर्दालक छत्रपती शिवराय आणि धर्मवीर संभाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्य स्थापनेचा विचार आणि कार्य जनमानसापुढे आणण्याचे काम ही संस्था करीत आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सात दिवसांचे शिवकालीन शस्त्र प्रशिक्षणाचे आयोजन, युवकांशी धर्मचर्चा आणि पुस्तक प्रकाशनाच्या माध्यमातून शिवप्रेमींशी संवाद, समाजात या शिवविचारांनी प्रेरणा घेऊन करत असलेल्या व्यक्तींचा, संस्थांचा गौरव आणि ऋणनिर्देश, तसेच मुलुंड भांडुप परिसरातील वारकरी संप्रदाय यांच्याबरोबर संवाद, प्रशिक्षणार्थींना सन्मानपत्र असा संपूर्ण दिवसांचा आखीवरेखीव कार्यक्रम होता. वारकरी संप्रदाय यांच्याबरोबर संवाद, प्रश्न-उत्तरांचा कार्यक्रमसुद्धा मुलुंड येथे पार पडला.शस्त्र प्रशिक्षण वर्ग हा मुलुंड व भांडुप या दोन ठिकाणी झाला. या वर्गात सौम्या जाधव (वय सात) ते शोभाताई आठवले (वय ७२) मिळून समाजातील ३० जणांचा यात सहभाग होता, हे विशेष उल्लेखनीय होते.

प्रमोद काटे, हिंदवी व अवनीश काटे आणि त्यांचे सर्व सहकारी, रा. स्व. संघाचे कार्यकर्ते अमित जाधव, यांच्या परिश्रमाने हा वर्ग संपन्न झाला. या कार्यक्रमास जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे ११वे वंशज हभप शिरिष महाराज मोरे (शिवशंभू विचार मंच, पश्चिम महाराष्ट्र संयोजक), प्रमुख अतिथी व अभय राजे जगताप (शिवशंभू विचार मंच, कोकणप्रांत संयोजक) हे उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये हभप शिरिष महाराज मोरे लिखित ‘छत्रपती शिवराय समजून घेताना....’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. या पुस्तकाच्या निमित्ताने शिवराज्याभिषेकाला यावर्षी ३५० वर्षे पूर्ण झाली. त्यामुळे गेल्या वर्षभरात अनेक शिवभक्तांनी, शिवसंस्थांनी हे शिवचरित्र, ही शिवगाथा समाजात सर्वदूर पोहोचावी, म्हणून अनेक उपक्रम, लेख, पुस्तके, समाज माध्यमांतून आपली शिवभक्ती प्रकट केली आहे. ‘छत्रपती शिवराय समजून घेताना’ पुस्तकाच्या अंतरंगात शिवरायांचे जीवनचरित्र हे हिंदुंच्या पुनरुत्थानाचीच महती सांगणारे आहे, हे अधोरेखित झाले. थोडक्यात आणि संदर्भासहित त्याचा आढावा यात घेतला आहे. या पुस्तकात शिवराय हे कथा स्वरुपात जरी आले नसले, तरी त्यांच्या जीवनचरित्रातील घडलेल्या अनेक घटनांच्या मागे त्याला असलेली ऐतिहासिक पार्श्वभूमी काय होती आणि या घटना घडत असताना त्यांची त्यावेळी असलेली भूमिका सहजतेने उलगडून दाखवली आहे. या पुस्तकात १५८ संख्येची संदर्भसूची दिली आहे.

अभ्यासपूर्ण आणि सत्यकथन करताना शिवरायांच्या जीवनचरित्रातील खोटेनाटे कथानक पसरवणार्‍या महाभागांना ‘नाठाळांचे माथी हाणू काठी’ या उक्तीला सार्थ करणारी, फार पाल्हाळ न लावता मार्मिक आणि संदर्भ जोडून खोडून काढणारी भाषा ही या पुस्तकाची जमेची बाजू आहेच, पण या पुस्तकात नवयुवकांना समोर ठेवून शिवचरित्रातील घटनांचा घेतलेला मागोवा फारच प्रभावीपणे समोर आला आहे. या कार्यक्रमात ज्यांनी सात दिवस प्रशिक्षण घेतले, त्यांनी शिवकालीन शस्त्रांचे प्रात्यक्षिक लोकांना दाखविले. यावेळी परिसरातील सज्जन शक्ती, मातृशक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होती. जगद्गुरू आणि भागवत संप्रदायाचे शिरोमणी असलेले संत तुकाराम महाराज यांच्या वंशजांनी शिवरायांवर लिहिलेल्या एका पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने तुकोबांनी छत्रपती शिवरायांना त्यांच्या क्षात्रतेजाची महती सांगताना


‘गर्भाचे आवडी मातेचा डोहाळा।
जेथीचा जिव्हाळा तेथे बिंबे॥’

असे सांगून मोठ्या आदराने ‘शिवबा तुझ्याठायी असलेले आणि तू करत असलेले क्षात्रकर्तव्य किती श्रेष्ठ आहे,’ हे निवेदन शिवरायांसमोर प्रकट केले होते. अशा जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे ११वे वंशज हभप शिरिष महाराज यांनी लिहिलेल्या ‘छत्रपती शिवराय समजून घेताना’ या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने हा दिवस विशेष स्मरणदायी ठरला. ‘शिवशंभू विचार मंचा’चे कोकणप्रांत संयोजक अभयराजे जगताप यांनी संपूर्ण कार्यक्रमाची संकल्पना आणि एकंदर या वर्गासंदर्भात भूमिका मांडली. मंचाने आयोजित केलेल्या या वर्गाला लोकसहभाग लाभला. तसेच, हभप शिरिष महाराजांनी केलेले उद्बोधन हे या कार्यक्रमाच्या सांगतेचे आकर्षण ठरले. जय शिवराय!

संतोष कुलकर्णी