मराठी पाऊल पडते पुढे...

    11-Jun-2024
Total Views |
 Sachin Narwade


‘सचिन’ हे नाव उच्चारताच उत्तुंगता आपसुकच येते. अशाच एका सचिनने कष्टाने आणि ध्येयवेडेपणाने अनेक स्वप्ने पाहिली आणि साकारदेखील केली. अशाच दूरदर्शी उद्योजक सचिन नरवडे यांच्याविषयी...
 
...तर ही गोष्ट आहे सचिन यांची. पण, हा सचिन ‘तेंडुलकर’ही नाही किंवा ‘पिळगांवकर’ देखील नाही. ही कथा आहे एका सामान्य मराठी कुटुंबात जन्मलेल्या सचिन नरवडे यांची. मुळत: जालना गावचे असलेले नरवडे कुटुंब, अर्थार्जनासाठी सचिन यांच्या जन्माआधीच अहिल्यानगरमध्ये आले. तिथेच सचिन यांचा जन्म झाला. सचिन यांचे वडील एका कंपनीत चालक म्हणून कार्यरत होते, तर आई गृहिणी. सचिन यांना दोन मोठ्या बहिणी. घरची आर्थिक स्थिती तशी बेताचीच. पण, स्वाभिमान आणि स्वावलंबन हे सचिन यांच्या स्वभावाचे उपजत असे विशेष गुण. सचिन लहान असल्यापासूनच गावातील उत्सव, जत्रांमध्ये ओटीचे साहित्य विकून, पेपर टाकून स्वत:चा खर्च भागवत होते. नगरमध्ये बारावी झाल्यानंतर, आत्ता पुढील शिक्षणासाठी सचिन यांनी पुण्याची वाट धरली. पुण्याचे वातावरण आणि नगरमधील गावाकडचे वातावरण यात असलेला फरक सचिन यांना जाणवू लागला. २०११ साली शिक्षणाच्या उद्देशाने पुण्यात दाखल झालेल्या सचिन यांनी पुण्यातील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पैशाअभावी ते शक्य झाले नाही. मग ते एका कॉल सेंटरमध्ये रूजू झाले. या नोकरीमुळे लोकांशी बोलण्याचा आत्मविश्वास वाढीस लागल्याचे ते सांगतात. मात्र, काही दिवसांतच त्यांनी दुसर्‍या एका ठिकाणी ‘सेल्समन’ म्हणून नोकरी स्वीकारली. यावेळी कंपनीचे काम, व्यवस्थापन याचा त्यांनी जवळून अभ्यास केला.

लहानपणापासून स्वत:चे काही करण्याची आवड असलेल्या सचिन यांना आवश्यक ते सगळे अनुभव प्रत्यक्ष मिळाले आणि त्यातून ते बरेच काही शिकलेही. आता मात्र शिकण्यासाठी नोकरी न करता, अर्थार्जन करण्याच्या हेतूने त्यांनी एका गाडीच्या शोरूममध्ये ‘सेल्समन’ पदासाठी मुलाखत दिली. आधीच्या नोकरीत संपादित केलेली कौशल्ये आणि अनुभव असल्याने त्यांना लगोलग नोकरीही मिळाली. यावेळी हाताशी चांगला पैसादेखील येत होता. त्यामुळे आतापर्यंत पुण्यात एकट्या राहणार्‍या सचिन यांनी आपल्या पूर्ण कुटुंबाला आता पुण्यात बोलावून घेतले. मग पाठिशी कुटुंब होते आणि आता गाठीशी पैसादेखील होता. त्यातून सचिन यांच्या कल्पनेला धुमारे फुटत गेले. आपल्या मित्राच्या मदतीने त्यांनी एका हॉटेल व्यवसायाला सुरुवात केली. पण, या क्षेत्राचा काहीच अनुभव गाठीशी नसल्याने, त्यात तोटा दिसू लागला. त्यामुळे अधिक वाट न बघता, अवघ्या सहा महिन्यांतच हा व्यवसाय बंद करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. अत्यंत कठीण असा तो काळ असल्याचे सचिन सांगतात. “जेव्हा तुम्ही अपयशी होता, त्यावेळी आधार देणांर्‍यापेक्षा हसणारेच अधिक असतात,” अशी खंत सचिन व्यक्त करतात. मात्र, या काळात गाठीशी एक रक्कम होती आणि हीच सचिन यांच्यासाठी जमेची बाजू ठरली. आता मैदानात पूर्ण अभ्यास करुनच उतरायचे, असे ठरवून सचिन यांनी फुटवेअरचे दुकान सुरु केले.

कमी नफा आणि जास्त विक्री हे सूत्र अवलंबल्याने, व्यवसाय वाढू लागला. व्यवसायात जम बसल्यावर सचिन यांनी फुटवेअरबरोबर स्पोर्ट्सवेअर विक्री सुरु केली आणि हळूहळू ते कपडे विक्रीकडेही वळले. पुढे आलेल्या काही वाईट अनुभवांमुळे सचिन घाऊक विक्रीच्या व्यवसायात उतरले. यासाठी लागणारे मार्गदर्शन आणि सर्व सहकार्य त्यांचे व्यवसायगुरु नितीन टकले यांनी केल्याचे सचिन सांगतात. समाजमाध्यमावर त्यांनी स्वत:च्या उत्पादनांची जाहिरात सुरु केली. त्यामुळे त्यांचे उत्पादन अधिकाधिक लोकांपर्यंत जलदगतीने पोहोचले आणि मागणीदेखील वाढली. त्यानंतर सचिन यांनी ’मॅक्स’ नावाचा कपड्यांचा स्वत:चा ब्रॅण्ड सुरु केला. त्यासाठी कारखानाही उभारला. आज त्यांच्या कारखान्यात ८० मशीन एकाच वेळी काम करत आहेत. त्यांच्या कंपनीचे मुख्य कार्यालय हडपसर येथे असून, ४०० जणांनी त्यांनी रोजगार दिला आहे. आज राज्यभर ८४ शाखांच्या माध्यमातून ’मॅक्स’चा व्यवसाय विस्तार सचिन यांनी केला असून, दहा हजारांपेक्षा जास्त दुकानांमध्ये त्यांचा माल विक्रीसाठी जातो. सर्व प्रकारचे कपडे ग्राहकांना एकाच छताखाली मिळावे, अशी सचिन यांनी दुकानाची रचना केली.आजमितीला सुरतचे काही व्यापारीदेखील, सचिन यांच्याकडून नियमित खरेदी करतात.


केवळ आवड म्हणून सचिन यांनी स्वत:ची एक साऊंड सिस्टमही तयार केली असून, आज पुण्यातील अग्रगण्यांपैकी ती एक आहे. प्रत्येकाने स्वत:चा एखादा तरी लहानसा व्यवसाय सुरु करावा, यासाठी सचिन आवर्जून मार्गदर्शन करतात. पैशांअभावी ज्या महाविद्यालयात प्रवेश घेता आला नाही, त्याच महाविद्यालयाने देखील त्यांचे व्याख्यान आयोजिक केले होते. सचिन यांना त्यांच्या उद्योग क्षेत्रातील यशस्वी वाटचालीसाठी अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यापैकी बंगळुरु येथे संपन्न झालेल्या एका सोहळ्यात महाराष्ट्रातून फक्त दोघांनाच सन्मानित करण्यात आले. त्यापैकी एक सचिन होते. आज सचिन आपल्या व्यवसायातील दहा टक्के नफ्यातून, दरवर्षी अनाथाश्रमातील मुलींचे विवाह लावून सामाजिक बांधिलकीदेखील जपत आहेत. भविष्यात ‘साखर सम्राट’ म्हणून नाव कमावण्याचे माझे स्वप्न आहे, असे सचिन आवर्जून नमूद करतात. पाय जमिनीवर ठेवून, आकाशाला गवसणी घालण्याचे जे स्वप्न सचिन यांनी पाहिले, ते पूर्णत्वास येवो, याच दै. ‘मुंबई तरुण भारत’ कडून त्यांना शुभेच्छा!



- कौस्तुभ वीरकर