अमृतपाल सिंगच्या सुटकेसाठी अमेरिकेत मोहिम! भारतावर दबाव टाका; खालिस्तान्यांची कमला हॅरिसकडे मागणी

    11-Jun-2024
Total Views |
 Khalistan
 
वॉशिंग्टन डी.सी : पंजाबमधील अपक्ष खासदार आणि तुरुंगात बंद असलेला खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंगची सुटका करण्यासाठी अमेरिकेत मोहीम सुरू झाली आहे. याची सुरुवात अमेरिकेत राहणारे वकील सरदार जसप्रीत सिंगने केली आहे. या मोहिमेअंतर्गत त्याने अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांची भेट घेतली. या बैठकीत अमृतपालच्या सुटकेसाठी भारताच्या कारवाईत अमेरिकेच्या हस्तक्षेपाची मागणी करण्यात आली. जसप्रीत सिंगने सोमवार, दि. १० जून २०२४ या बैठकीचा दावा केला आहे.
 
जसप्रीत सिंहने सोमवारी त्याच्या इन्स्टाग्राम हँडलवर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये तो अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिससोबत दिसत आहे. हॅरिस यांच्या भेटीचा उद्देश अमृतपाल सिंगची सुटका होता. जसप्रीतने आपल्या पोस्टमध्ये अमृतपालला 'भाई' या शब्दाने संबोधित केले आहे.
 
या भेटीनंतर जसप्रीत सिंहने त्याच्या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्याने सांगितले की अमृतपाल अपक्ष उमेदवार म्हणून विजयी झाला आहे. जसप्रीतच्या म्हणण्यानुसार, त्याला अमेरिकेतील सर्व गुरुद्वारांचे प्रतिनिधी, अमेरिकेत उपस्थित शीख समुदायातील लोकांनी अमृतपालच्या सुटकेचा मुद्दा उपस्थित करण्यास सांगितले आहे. अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांच्याशी चांगले संबंध असल्याचे सांगताना जसप्रीत सिंगने दावा केला की, तो त्यांना दोनदा भेटला आहे.
 
जसप्रीत सिंहने पुढे सांगितले की, अमृतपाल सिंगच्या मुद्द्यावर बोलण्यासाठी त्याने मंगळवार, दि. ११ जून २०२४ अमेरिकेच्या उपराष्ट्रपतीला वेळ मागितला होता. अमेरिकन सरकार या प्रकरणात नक्कीच हस्तक्षेप करेल, अशी आशा जसप्रीतने व्यक्त केली आहे. दरम्यान, अमृतपालच्या याच मुद्द्यावर वकील जसप्रीत सिंगने दि. ७ जून रोजी कोरी ब्रूकर यांची न्यू जर्सी येथे भेट घेतली होती. जसप्रीत सिंगने अनेक अमेरिकन सिनेटर्स आणि नेत्यांना भेटल्याचा दावाही केला आहे. अमृतपालच्या सुटकेसाठी सर्वांनी मदतीचे आश्वासन दिले, असल्याचा दावा त्याने केला आहे.