"चीन-पाकिस्तानला आमच्याशी संबंध सुधारायचे असतील तर..."; पदभार स्वीकारताच जयशंकर यांनी मांडली स्पष्ट भूमिका

    11-Jun-2024
Total Views |
 jaishankar
 
नवी दिल्ली : डॉ. एस. जयशंकर यांनी परराष्ट्र मंत्री म्हणून मंगळवार, दि. ११ जून २०२४ पदभार स्वीकारला आहे. पदभार स्वीकारताना एस. जयशंकर म्हणाले की, "आम्हा सर्वांना पूर्ण विश्वास आहे की हे आम्हाला 'विश्व बंधू' म्हणून स्थापित करेल, एक देश जो अतिशय अशांत जगात आहे, एक अतिशय विभाजित जग आहे, संघर्ष आणि तणावाच्या जगात आहे."
 
त्याचबरोबर शेजारी देश पाकिस्तान आणि चीनसोबतच्या संबंधांवरही जयशंकर यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, पाकिस्तान आणि चीनशी भारताचे संबंध वेगवेगळे आहेत. आणि दोन्ही देशातील समस्याही वेगळ्या आहेत. जयशंकर पुढे म्हणाले की, चीनसोबतच्या सीमावादावर तोडगा काढण्यावर सरकारचा भर आहे. त्याचबरोबर पाकिस्तानबाबत भारताचे धोरण अगदी स्पष्ट आहे. जोपर्यंत पाकिस्तान भारताविरुद्ध दहशतवादाचा वापर करत आहे, तोपर्यंत दोन्ही देशांतील संबंध चांगले होऊ शकत नाहीत.
 
एस जयशंकर पुढे म्हणाले, "पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली देश 'राष्ट्र प्रथम' या धोरणावर पुढे जात आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली हे मंत्रालय लोककेंद्रित मंत्रालय बनले आहे." २०१९ मध्ये परराष्ट्र मंत्री होण्यापूर्वी, जयशंकर यांनी २०१५ ते २०१८ पर्यंत भारताचे परराष्ट्र सचिव म्हणूनही काम केले. परराष्ट्र मंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारणारे ते पहिले परराष्ट्र सचिव आहेत.
  
रशिया-युक्रेन संघर्ष, इस्रायल-हमास युद्ध आणि कोविड महामारी असो, एस. जयशंकर यांच्या कार्यकाळात अनेक मोठ्या जागतिक घटना घडल्या आहेत. अशा परिस्थितीतही त्यांनी आक्रमकपणे भारताची बाजू मांडली आहे. एस. जयशंकर हे स्वातंत्र्य भारतातील पहिले परराष्ट्र मंत्री आहेत. ज्यांना दुसऱ्यांदा कार्यकाळ मिळालेला आहे.