फणसाडमधील गिधाडांचे उपहारगृह पुन्हा सुरू; आता प्रतिक्षा गिधाडांची

    10-Jun-2024
Total Views |
vulture restaurant


मुंबई (विशेष प्रतिनिधी):  फणसाड वन्यजीव अभयारण्यातील गिधाडांचे उपहारगृह पुन्हा एकदा कार्यान्वित करण्यात आले आहे (phansad vulture restaurant). शनिवार दि. ८ जून रोजी उपहारगृहात बैलाचे कलेवर (शव) टाकण्यात आले असून आता प्रतिक्षा आहे ती गिधाडांची (phansad vulture restaurant). सुधागड तालुक्यातील वऱ्हाड – जांभूळपाडा या गावातून बैलाचे कलेवर पाठवण्यात आले असून वन विभागाने 'ग्रीन वर्क ट्रस्ट'च्या सहकार्याने 'काॅन्झर्विंग जटायू' या प्रकल्पाअंतर्गत गिधाड उपहारगृह सुरू केले आहे. (phansad vulture restaurant)

रायगड जिल्ह्यातील फणसाड वन्यजीव अभयारण्य हे पक्षी जैवविविधतेसाठी ओळखले जाते. अनेक दुर्मीळ पक्षी अभयारण्यात आढळून येतात. पूर्वी अभयारण्यात संकटग्रस्त गिधाडांचा मोठ्या संख्येने वावर होता. मात्र, एकंदरीत राज्यातील गिधाडांची संख्या रोडावल्यावर अभयारण्यातही गिधाडे दिसेनाशी झाली. याठिकाणी पूर्वी गिधाडांसाठी बांधण्यात आलेल्या उपहारगृहात मृत जनावरांचे कलेवर टाकल्यावर ते खाण्यासाठी गिधाडे उतरत असत. मात्र, कालांतराने गिधाडे कलेवरावर उतरण्यास बंद झाली. त्यामुळे उपहारगृह बंद पडलेल्या अवस्थेत होते. ग्रीन वर्क्स ट्रस्टने वन विभागाच्या मदतीने हे उपहारगृह पुन्हा एकदा सुरू केले आहे. 'काॅन्झर्विंग जटायू' या प्रकल्पाअंतर्गत अभयारण्यात गिधाड संवर्धनाला सुरुवात करण्यात आली आहे. या प्रकल्पाला 'एसबीआय फाऊंडेशन'ने आर्थिक सहाय्य पुरविले आहे.


सद्यस्थितीमध्ये अभरण्यात गिधाडांचे प्रजनन होत नसले, तरी रायगड जिल्ह्यातील म्हसाळा आणि श्रीवर्धन तालुक्यात गिधाडांचा कायमस्वरुपी अधिवास आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सुरू करण्यात आलेल्या उपहारगृहात गिधाडे उतरतील अशी आशा आहे. या गिधाड संवर्धनासाठी रायगड जिल्ह्यातील सर्व गावांना मृत जनावरे आढळल्यास किंवा पाळीव गुरांचा मृत्यू झाल्यास त्याची माहिती कळविण्याचे आवाहन केले आहे. यासाठी एक हेल्पलाईन तयार करण्यात आली असून ९०९६२९७०५९ /८७७९४०९४६० या क्रमांकावर स्थानिकांना संपर्क करता येणार आहे. ८ जून रोजी उपहारगृहात टाकण्यात आलेल्या कलेवर गिधाडे उतरत आहेत का, हे तपासण्यासाठी त्याठिकाणी 'कॅमेरा ट्रॅप' लावण्यात आले आहेत. २०२२ साली याठिकाणी इजिप्शियन गिधाडाचे नवजात आढळून आले होते.
“ग्रीन वर्क्स ट्रस्ट आणि वनविभाग यांच्या माध्यमातून पुन्हा सुरू केलेल्या या प्रकल्पाला यश मिळून गिधाडांची संख्या पुनरूज्जीवीत व्हावी असंच वाटतंय. रायगडमधील सर्व गावांना ही मृत जनावरांसाठी पुन्हा एकदा आवाहन करतो जेणेकरून गिधाड संवर्धन शक्य होईल.”

- निखील भोपळे संस्थापक, ग्रीन वर्क्स ट्रस्ट