खेळाडूंची सुरक्षा वाऱ्यावर!, सामन्यादरम्यान घडला धक्कादायक प्रकार!
10 Jun 2024 15:39:01
नवी दिल्ली : न्यूयॉर्क येथे झालेल्या भारत विरुध्द पाकिस्तान टी-२० विश्वचषक सामन्यात एक विचित्र प्रकार घडल्याचे पाहायला मिळाले आहे. भारत-पाक सामन्याआधी राष्ट्रगीत सुरू असताना आकाशातून जाणाऱ्या विमानाकडे साऱ्यांचे लक्ष जाताच नवे वादळ निर्माण झाले. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचे नाव पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. या सर्वप्रकारामुळे पुन्हा एकदा खेळाडूंच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
दरम्यान, सामन्यासाठी नासो काउंटी स्टेडियम चाहत्यांनी पुर्णपणे भरलेले होते. त्यातच भारत-पाक सामना म्हणजे हायव्होल्टेजच असतो त्यामुळे अशात अनोख्या संधीचा फायदा लक्ष वेधून घेऊ शकतो. विशेष म्हणजे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची तुरुंगातून सुटका करण्याचा संदेश घेऊन स्टेडियमवर विमान उडवणाऱ्या काही पाकिस्तानी चाहत्यांनी असेच काहीसे केल्याचे समोर आले आहे.
०९ जून रोजी नासाऊ काऊंटी आंतरराष्ट्रीय स्टेडियम येथे खेळविण्यात आलेल्या भारत-पाक सामन्यात भारताने ०६ धावांनी विजय मिळविला. पावसाच्या शक्यतेमुळे क्रिकेटप्रेमींच्या नजरा आकाशाकडे लागल्याचे पाहायला मिळाले. अशातच पावसाशिवाय स्टेडियमवर अचानक घोंघावलेल्या एका विमानानेही सर्वांचे लक्ष वेधून घेतले. याचे कारण म्हणजे विमानाच्या मागे हवेत झळकणारा एक खास बॅनर ज्यामध्ये इम्रान खान यांना सोडण्याचे आवाहन करण्यात आले होते.