आरोग्यदायी पावसाळा...

    10-Jun-2024
Total Views |
health rainy season‘नभ उतरु आलं’ म्हणत मोसमी वार्‍यांनी बहुतांश महाराष्ट्राला आपल्या कवेत घेतले आहे. हळूहळू हा मान्सून राज्यभरात चांगलाच जोरही पकडेल. असा हा वर्षा ऋतू आला की काही आजारही डोके वर काढतात. म्हणूनच हा पावसाळा आजारपणात नव्हे, तर आरोग्यदायी जावा म्हणून नेमकी काय काळजी घ्यायला हवी, याविषयी मार्गदर्शन करणारा हा लेख....

अस्सल मृदगंधाच्या सेंटची कितीही जाहिरात करो बापडे, पण पहिल्या पावसाचा तो मातीचा गंध तसाच्या तसा कुपीत साठवणे केवळ अशक्यच! ढगांच्या प्रेमाचा वर्षाव तप्त धरणीमातेवर होऊ लागतो आणि पाऊस गरजायला, बरसायला लागतो, तसे विविध आजारही डोके वर काढू लागतात. दि. १५ जून ते १५ ऑगस्टपर्यंत काळ हा वर्षा ऋतूचा. आषाढ, श्रावण हे मराठी महिने या काळात मोडतात. तापणारा ग्रीष्म ऋतू, कोरड्या हवामानामुळे शरीरात रुक्षता वाढलेली असते. अचानक थंडावा निर्माण झाल्याने, ढगांनी आभाळ अंधारून येत असल्याने वातदोष परमोच्च स्तरावर पोहोचलेला असतो. वर्षभरातला हा सर्वात अनारोग्याचा काळ आहे, असेही म्हटले जाते. शेतकरी, बेडूक आणि डॉक्टर या ऋतूची आस लावून बसलेले असतात, अशा अर्थाची एक म्हण आहे. पावसाळ्यात प्रथम अग्नी मंद होतो. त्यामुळे पचनशक्तीसंबंधित तक्रारी निर्माण होतात.

अजीर्ण, पोटफुगी, गॅसेसचा त्रास वाढणे, आमांश असे विकार डोके वर काढतात. त्यातच पाणी गढूळ, दूषित असल्याने उलटी, जुलाब, ताप असेही रोग बरोबर येतात. फरशी, भिंती थंड झाल्याने वातावरणात गारवा वाढल्याने व त्यातही एसी व वेगाने फिरणार्‍या फॅनची जर युती झाली, तर कंबरदुखी, मानदुखी, आमवात असे वेदनादायी आजार बळावतात. कफ साठून राहिल्याने व वातावरणातील दमटपणामुळे सर्दी, दमा, डोकेदुखी, सायनेसची सूज या व्याधी होतात. ओलेपणा वाढल्याने भिंतीवर जशी बुरशी वाढते, तसेच शरीरावरील फंगसमुळे होणारे आजार जसे खाज येणे, लालसर पुरळ येणे, स्राव वाढवणारे त्वचारोगही उद्भवतात. त्यातच ओले कपडे अंगावर तसेच ठेवण्याची अथवा नीट न सुकलेले कपडे घालण्याची सवय असेल, तर मग बघायलाच नको. शरीरात होणारे हे बदल लक्षात घेऊन वात व कफदोष वाढणार नाही, असा आहार घेणे आवश्यक असते. भूकही मंदावणार नाही, याची काळजी घ्यावी लागते. हे सर्व लक्षात घेता, वर्षा ऋतूत आहार-विहार कसा असावा, ते आपण पाहणार आहोत.

वर्षा ऋतूत ताजे, हलके, गरम अग्निदीप्ती करणार्‍या अशा आहाराचे सेवन केले पाहिजे. यांची सम स्थिती ठेवणारा आहार-विहार म्हणजेच जेवणात आंबट, खारट व किंचित गोड पदार्थ घ्यावेत. या तीन चवींचे पदार्थ हे वाताचे नियमन करतात. स्निग्ध पदार्थ जसे तेल व तूप वाताचे शमन करतात. म्हणून, भातावर, पोळीवर, फोडणीसाठी या स्निग्ध पदार्थांचा वापर करावा. वर्षा ऋतूचे दोन महिने तिळाचे तेल स्वयंपाकासाठी वापरावे.

वर्षा ऋतूत नेहमी एक वर्ष जुना तांदूळ वापरावा. शक्य झाल्यास उकडे तांदूळ वापरावेत. ते उपलब्ध नसल्यास प्रथम तांदूळ कढईत भाजून घ्यावेत आणि भरून ठेवावेत. कुकरमध्ये न शिजवता भात बाहेरच करावा. या काळात कोकणामध्ये पेज पिण्याची पद्धत आहे. जी पचण्यास हलकी, भूक वाढवणारी, लघवी व शौचास साफ करणारी, शक्तिदायक आहे. अशी पेज गरमागरम, साजूक तूप व सुंठ किंवा मिरीपूड घालून घ्यावी. पावसाळ्यात भाताचे वेगवेगळे प्रकार करावेत. मिरी, लवंग, दालचिनी, जिरे, धणे, कढीपत्ता इत्यादी मसाल्याचे पदार्थ घालून पुलाव किंवा मसालेभात करावा. शक्यतो, मैद्यापासून बनवले जाणारे पदार्थ... जसे पाव, ब्रेड, पेस्ट्री, केक इत्यादी पदार्थ खाऊ नयेत. त्याने अजीर्णासारखे पोटाचे आजार होतात. गव्हाची चपाती, फुलके साजूक तूप लावून खावेत. गव्हाच्या रव्याचा दलिया करावा. हा तिखट, फोडणी दिलेला, कोथिंबीर, लसूण घातलेला दलिया उत्तम शक्तिवर्धक व अग्निवर्धक आहे. ज्वारी, बाजरीची भाकरी करावी.

नाचणीही थंड असल्यामुळे पचायला जड असल्याने शक्यतो टाळावी. कडधान्यांमध्ये मूग पचण्यासाठी हलके असतात. सहसा कडधान्य मोड न आणता खावीत. त्यासाठी ती आठ तास भिजत घालणे योग्य ठरते. मुगाचे सूप किंवा पातळ आमटी करून खावी. मसूर हे सुद्धा पचण्यास हलके, शौचास बांधून आणणारे असतात. या काळात होणारे जुलाब किंवा आव याच्यावर मसुराचे कढण उपयोगी पडते. चणे, वाटाणे, छोले, राजमा, ही कडधान्ये वात वाढवणारी, मलावरोध करणारी, पचायला जड असतात, त्यामुळे या काळात टाळावी. बेसनचा उपयोगसुद्धा कमी करावा. उडिदाचे पीठ आंबवून केलेले इडली, डोसा हे सुद्धा या काळात खाऊ नयेत. ते पचायला अत्यंत जड व आम्लपित्त करणारे असतात.

कुळिथाचे पिठले किंवा पातळ सार लसूण घालून घ्यावे. हे वर्षा ऋतूमध्ये होणार्‍या कफाच्या आजारांसाठी उत्तम उपयोगी पडते.आम्लपित्त असणार्‍या रुग्णांनी याचा वापर मात्र जपून करावा. पावसाळ्यात पाणी दूषित असल्याने कच्च्या भाज्या शक्यतो खाऊ नयेत. पालेभाज्या खाणे टाळावे. खायच्या असल्या तर दोन -तीन वेळा धुवून घ्याव्यात. मिठाच्या पाण्यात थोडा वेळ बुडवून मग, बारीक चिरून घ्यावे. माठाची तांबडी भाजी, हिरवी भाजी चांगली धुऊन चिरून त्यात तेल, हिंग, मोहरी, लसूण, मिरची, कांदा घालून, फोडणी घालून करावी.पालेभाजी खात असताना लसूण आणि तेलाचा जास्त वापर करणे आवश्यक आहे. वर्षा ऋतूत येणार्‍या फोडशी, शेवग्याचा पाला, भारंगी अशा भाज्या जरूर खाव्यात. पालक, शिमला मिरची, कोबी, कांदा, टोमॅटो, गाजर इत्यादी भाज्यांचे सूप करून, त्यात मिरपूड व तूप घालून गरमगरम प्यावे. त्याने शौचास साफ होते व पचन चांगले होते. दोडका, घोसाळी, दुधी भोपळा, तोंडली, नवलकोल, कोबी, वांगी या भाज्या खाव्यात.

पाऊस सुरू झाल्यावर आंबे आणि फणस खाणे थांबवावे. डाळिंब, पपई, अननस ही फळे आणि सुकामेवा यांचे सेवन हितकारक असते. दुग्धजन्य पदार्थांत दही पचायला जड असल्याने या काळात टाळावे. ताक मात्र वातशामक आणि कफाचा नाश करणारे असल्याने संग्रहणी, आव पडणे, आतड्यांचे विकार, मूळव्याधीसारख्या विकारांमध्ये पथ्यकर आहे. मीठ, जिरे, हिंग यांची फोडणी घालून घ्यावी. हिंग, लसणाची फोडणी घातलेली कढीसुद्धा या काळात उपयोगी आहे. तूप, लोण्याचा वापरदेखील जरूर करावा. परंतु, पनीर, श्रीखंड, पेढे, बर्फी इत्यादी मिठाया पचायला जड असल्याने टाळलेल्या बर्‍या. फोडणीचे, मसाल्याचे पदार्थ ही औषधेच आहेत. दालचिनी, लवंग, मिरे, ओवा, जिरे, धणे, मोहरी, लसूण, हिंग, कढीपत्ता, दगडफुल, तिरफळे अशा मसाल्याच्या पदार्थांचा वापर या काळात मुक्तहस्ताने करावा. या सगळ्या चव आणणार्‍या गोष्टी शरीरातील वातकफनाशक आहेत.

पावसाळ्यातील पहिल्या एकादशीला ‘निर्जला एकादशी’ म्हटले जाते. उन्हाळ्याच्या काळात भरपूर लागणारे पाणी हे पावसाळ्यामध्ये कमी करायचे असते, असा संदेश ‘निर्जला’ या शब्दातून दिलेला आहे, तो आपण जरूर पाळावा. पावसात भिजल्यानंतर डोके कोरडे करावे व शरीरामध्ये कफाचे आजार वाढू नयेत, म्हणून गरम पाण्याबरोबर सुंठ पावडर घ्यावी. अंघोळीआधी शरीराला तेलाने मालिश करणे, हे उत्तम वातशामक आहे. तिळाच्या तेलाचा वापर यासाठी करावा. यानंतर कापूर, हळद नागरमोथा, चंदन अशा औषधांनी तयार केलेले उटणे गरम पाण्यात कालवून अंगाला लावावे आणि उष्ण पाण्याने अंघोळ करावी. दुपारची झोप शक्यतो टाळावी. थंड वारा, एसी वर्ज्य करावे, व्यायामही भरपूर प्रमाणात करू नये. कारण, या काळात शरीराचे बल कमी झालेले असते. योगासने, नाडीशुद्धी, प्राणायाम, हलका व्यायाम जरूर करावा. पंचकर्माद्वारे शुद्धी प्रक्रिया हे आयुर्वेदाचे वैशिष्टय आहे. निरोगी व्यक्तींसाठीसुद्धा आयुर्वेदात शुद्धीकरण प्रक्रिया सांगितलेली आहे.

पावसाळ्यात बस्ती चिकित्सा करून घेणे श्रेयस्कर असते. वाताचे प्रमुख स्थानात असल्या मोठ्या आतड्यात वात नियंत्रित केल्यास, शरीरात असलेल्या वाताचे नियमन करता येते. बस्ती चिकित्सेमध्ये गुदमार्गाद्वारे तेल, तूप, औषधी काढे प्रविष्ट केले जातात. सर्व अंगाला मसाज आणि वाफेचा शेक दिला जातो. अशी आठ दिवसांची चिकित्सा, ज्याला ‘योगबस्ती’ असे म्हटले जाते, प्रत्येकाने करून घेणे आवश्यक आहे. त्याने पुढील वर्षभर होणार्‍या वातविकारांना आळा घालता येतो. वैद्याच्या सल्ल्याने ही प्रक्रिया करावी. ‘लशुनादिवटी’ नावाचे औषध घरी ठेवावे. अजीर्ण पोटदुखी, आमांश, जुलाब अशा व्याधींवर हे औषध दोन गोळ्या, दोन वेळा जेवणानंतर गरम पाण्याबरोबर घेतल्यास उपयोगी ठरते. हिंगाष्टक चूर्ण हे देखील असेच एक औषध आहे. हे पचनशक्ती वाढवणारे आणि पोटातले गॅसेस कमी करणारे एक उत्तम औषध आहे. त्याचा वापर तूप भाताबरोबर, भातामध्ये मेतकुटासारखे मिक्स करून जेवणाच्या सुरुवातीला घेण्याची पद्धत आहे.

दशमूलारिष्ट दोन चमचे समभाग पाण्याबरोबर दोन वेळा जेवणानंतर सांधेदुखीच्या तक्रारींसाठी घेत राहावे.

लक्षात घ्या की, आहारव्यवहारावर नियंत्रण ठेवून राहिले म्हणजे पावसाळा निश्चितच आरोग्यदायी होतो.

वैद्य महेश म. ठाकूर
९९३०३०४४९५