आज भासते सारे सुंदर

    10-Jun-2024
Total Views |
beauty psychological approach


मीही सुंदर, तूही सुंदर,
आज भासते सारे सुंदर
जग हे सुंदर, नभ हे सुंदर
जे जे दिसते ते ते सुंदर...
या काव्यपंक्तींनुसार सौंदर्य हे बघणार्‍याच्या नजरेतच वसलेले आहे. अशा या सौंदर्याची परिभाषा देश, व्यक्ती, परिस्थिती परत्वे बदलते. त्यानिमित्ताने सौंदर्य या संकल्पनेचा मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून घेतलेला हा कानोसा...

पण किती वेळा सौंदर्याचा विचार करतो किंवा सुंदर गोष्टींच्या विचारात गुंततो? आपण किती सुंदर आहोत, हे ऐकायला खरं तर सगळ्यांना आवडते. इतरांना सुंदर दिसण्याच्या आपल्या प्रयत्नांभोवती बराच वेळ, ऊर्जा, प्रयत्न आणि चिंता फिरत असतात. पण, ‘सुंदर मी होणार’ अशी अथक इच्छा कशामुळे प्रबळ होते?

समाजाने आपल्याला शारीरिकदृष्ट्या सुंदर मानणे, ही जगाने स्वीकारलेली, प्रिय आणि आनंदी होण्याची गुरुकिल्ली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. सौंदर्य कोणाला नको आहे? परंतु, सौंदर्याचा आपला व्याप बर्‍याचदा कालबाह्य ऑपरेटिंग सिस्टमद्वारे चालविला जातो. आपल्या दिसण्याबद्दल लाज वाटून आणि अपमानित होऊन आपल्यापैकी बरेच जण चांगलेच दुखावलेही गेले असतील. जर तुम्ही लठ्ठ असाल, तर तुम्हाला ‘भोपळा’ वा ‘फॅटी’ म्हटले चिडवले जाते. अंगकाठीने किडकिडीत असाल तर तुमचे नामकरण ‘हाडकुळा’ व ‘सुकडा बोंबील’ असे केले जाईल. पण, काहीही असले तरी कुणालाही असे मोजून-मापून सुंदर होता येणे कठीणच.

मानव सहस्राब्दीपासून सौंदर्याच्या संकल्पनेत गुंतलेला आहे. मानवाने सौंदर्याची व्याख्या परिभाषित करण्याचा प्रयत्न वर्षानुवर्षे केला आहे. प्लेटोला वाटले की, केवळ सौंदर्याचा विचार केल्याने आत्म्याला पंख फुटतात. सौंदर्य मानवी आत्म्याला प्रेरणा आणि उत्थान देते. आपल्या सभोवतालच्या जगात आनंद आणि मुलतत्व शोधण्याचा नेमका अर्थ काय आहे, या

सौंदर्य म्हणजे तुमच्याकडे जे आहे, ते विकसित करणे. फुलपाखरे त्यांचे पंख पाहू शकत नाहीत. परंतु, जगातला इतर प्रत्येकजण पाहू शकतो. लोकही असेच असतात. सौंदर्य कधीही निर्माण करता येत नाही. ते मूलतःच असते. अपूर्णतेतही एक प्रकारचे खास सौंदर्य असते. एकात्मतेदेखील सौंदर्य प्रकट होत असते. सचोटीसुद्धा सौंदर्य प्रकट करते. म्हणजे एकूणच काय तर काहीही सुंदर पाहण्याची संधी कधीही गमावू नका. कारण, सौंदर्य हे देवाचे हस्ताक्षर आहे.

आम्ही सूर्यास्त आणि समुद्रकिनारे, टेनिस, कलाकृती अशा अनेक बाबींच्या प्रेमात पडतो. कुणाला पहाटेचा सूर्योदय सुखावून जातो, तर कुणाला मावळतीचा निरोप देणारा सूर्यास्त मोहवून टाकतो. कधी तुमच्या मुलाने रंगविलेल्या नदीतीराच्या काठच्या घरात किंवा तुमचे मूल पहिल्यांदा शिकत असलेल्या तबल्याच्या सुरात किंवा तुमच्या नवजात मुलाच्या निरागस हास्यामध्ये देखील सौंदर्य प्रतिबिंबित होते. सौंदर्यामध्ये तुम्ही एखाद्या कामात गुंतलेल्या सर्जनशील कृतीचाही समावेश असू शकतो. जसे की, बेघर तरुणांना नवीन संधी देणारा प्रकल्प, माननीय आमटेजींनी राबविलेले महारोग्यांच्या सेवेचा प्रकल्प किंवा तुमच्या कर्मचार्‍यांना आणि त्यांच्या कुटुंबांना चांगल्या प्रकारे आधार व विश्वास देणारी एखादी नवीन प्रणाली.

एखाद्या व्यक्तीची सौंदर्याची व्याख्या ही एक अमूर्त, क्लिष्ट आणि अत्यंत वैयक्तिक संकल्पना आहे, जी आयुष्यभर त्यांच्यासाठी मार्गदर्शक प्रकाश बनते. आपण जे जे सुंदर मानतो, ते ते आपल्याला हवे असते आणि ती लालसा सहजपणे इच्छेमध्ये विकसित होऊ शकते, स्वप्नामध्ये प्रकट होऊ शकते. आपल्यापैकी बर्‍याच जणांसाठी ते सौंदर्य आपल्याला अतुलनीय कृती करण्यास प्रवृत्त करणारे इंधन बनते. सौंदर्यामध्ये आकांक्षा आणि उत्कटता निर्माण करण्याची देखील शक्ती असते. त्यामुळे ती आपली स्वप्ने साध्य करण्यासाठी प्रेरणा बनते. आपण समुद्रकिनार्‍यावर स्वच्छ उन्हाळ्याच्या दिवशी सूर्यास्त पाहण्यासाठी काहीही करू. सायंकाळी सूर्यास्त पाहण्यासाठी तासन्तास उभे राहू शकतो आणि टक लावून आकाशाकडे पाहत राहतो.

क्षितिजावर केशरी रंगाच्या छटा पसरल्यावर मुग्ध राहू शकतो. दरम्यान, सूर्य एखाद्या चित्रकाराप्रमाणे कोणते रंग वापरात असावा, याबद्दल आपले विचारचक्र सुरुच राहते. शेवटी गुलाबी आणि हलक्या पिवळ्या रंगाच्या छटांसह, बुडण्यापूर्वी, शेवटी आश्चर्यकारक शुभ्रतेत आपण हरवून जाऊ शकतो. कोणत्याही प्रकारचे सौंदर्य, त्याच्या सर्वोच्च विकासामध्ये, संवेदनशील आणि प्रामाणिक असते. सुंदर असणे म्हणजे स्वतः असणे. तुम्हाला इतरांनी ‘विशिष्ट’पणे स्वीकारण्याची गरज त्यात नाही. आपण स्वत:ला जसे आहोत, तसे स्वीकारले की आपले सौंदर्य आपोआप प्रकट होऊ लागते. जितक्या जास्त वेळा आपण आपल्या सभोवतालच्या गोष्टी पाहतो - अगदी सुंदर आणि अद्भुत गोष्टी - तितक्या जास्त त्या आपल्यासाठी परिचित होत राहतात. म्हणूनच आपण अनेकदा या जगाचे सौंदर्य गृहीत धरतो - फुले, झाडे, पक्षी, ढग आणि आपल्याला आवडणार्‍या अशा अनेक गोष्टी. आपण या गोष्टी सातत्याने पाहतो, म्हणून त्यांचे सौंदर्य कमी पाहतो.

सौंदर्य हे आपल्या जीवनात इतके महत्त्वाचे का आहे? सौंदर्य अमाप आहे. अवीट आहे. ते थिल्लर नक्कीच नाही. त्यातही निसर्गाचे सौंदर्य ही एक अमूल्य भेट आहे, जी समाधान, प्रशंसा आणि कृतज्ञता वाढवते. सौंदर्य हे पाहणार्‍याच्या हृदयात असते.व्यावसायिक जगात आपण अनेकदा सौंदर्याचा शारीरिक प्रकटीकरण म्हणून व्यवहार करतो. परंतु, सौंदर्य ही भावनात्मक, सर्जनशील आणि खोलवर आध्यात्मिक शक्तीदेखील असू शकते. त्याचे सार बहुरूपी आहे. ते अमर्याद आकार घेऊ शकते, जे जे आपल्यासाठी सर्वात जास्त अर्थपूर्ण वाटते, त्याद्वारे ते परिभाषित होते. जेव्हा जेव्हा आपला आत्मा आनंदित होतो, तृप्त होतो, तेव्हा ते जे काही अस्पष्ट असेल वा स्पष्ट असेल, अव्यक्त असेल वा विशद असेल, ते ते आपल्यासाठी सुंदर आहे.

हेलन केलर यांनी म्हटले आहे की, जगातील सर्वांत सुंदर गोष्टी पाहता येत नाहीत किंवा स्पर्शही करता येत नाहीत. त्या मनापासून अनुभवल्या पाहिजेत...
 
डॉ. शुभांगी पारकर