इस्लामी अतिरेक्यांकडून हिंदू भाविक लक्ष्य!

    10-Jun-2024   
Total Views |
Terror Attack In Jammu

जम्मू-काश्मीर मधील शांतता बिघडविण्याचा प्रयत्न अशा दहशतवादी हल्ल्यांद्वारे केला जात आहे, हे स्पष्ट आहे. पण, सलग तिसर्‍यांदा सत्तेवर आलेले मोदी सरकार इस्लामी अतिरेक्यांचे असे मनसुबे उधळून लावल्याशिवाय राहणार नाही.

जम्मू-काश्मीरला विशेष अधिकार देणारे ‘कलम 370’ निकालात काढण्यात आल्यानंतर, तेथील परिस्थिती चांगल्या प्रकारे सुधारत चालली होती. लोकसभेच्या निवडणुकाही त्या प्रदेशात शांततेने पार पडल्या. इस्लामी अतिरेक्यांना पायबंद बसला होता. हिंदू धर्मीयांना लक्ष्य करून त्यांच्या हत्या करण्याचे जे प्रकार मध्यंतरी घडत होते, तेही थांबले होते. असे असले तरी अजूनही तेथे दहशतवादी डोके वर काढत असल्याचे दिसून येते. रविवारी राजधानी नवी दिल्लीमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या शपथविधी समारंभाची एकीकडे लगबग सुरु असतानाच, जम्मू-काश्मीरच्या रियासी जिल्ह्यात हिंदू भाविकांना घेऊन निघालेल्या बसवर इस्लामी अतिरेक्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. अतिरेकी या बसची प्रतीक्षा करीत होते, असे सकृतदर्शनी आढळून येत असल्याची माहिती रियासीच्या वरिष्ठ पोलीस अधीक्षकांनी दिली. अतिरेक्यांनी केलेल्या गोळीबारामुळे बसचालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस बाजूला असलेल्या दरीमध्ये कोसळली. या घटनेत नऊ यात्रेकरू ठार झाले आणि अन्य 33 जखमी झाले. शिवखोरी गुंफा येथील धार्मिक स्थळाचे दर्शन घेऊन ही 53 आसनी बस कटराकडे निघाली होती. त्याचवेळी संध्याकाळी सहाच्या सुमारास अतिरेक्यांनी या बसला लक्ष्य केले. दाट जंगल आणि पर्वतीय प्रदेशातून ही बस जात असताना, त्यावर गोळीबार करण्यात आला. बसमधील भाविक उत्तर प्रदेशातील असल्याचे सांगण्यात आले.

इस्लामी दहशतवाद्यांनी अगदी योजनापूर्वक या बसवर हल्ला केल्याचे दिसून येते. या हल्ल्यातून वाचलेल्या एका तरुणाने सांगितले की, या बससमोर एक बुरखाधारी व्यक्ती उभी राहिली आणि त्या व्यक्तीने बसवर बेछूट गोळीबार केला. बस दरीत कोसळून गडगडत जात असतानाही गोळीबाराचे आवाज सुरूच होते, असे त्या तरुणाने सांगितले. गोळीबाराची घटना घडलेले स्थान जम्मूच्या वायव्येस सुमारे 100 किमी अंतरावर आहे. विविध सुरक्षा दलांच्या जवानांनी त्वरित या परिसरास वेढले असून, अतिरेक्यांचा शोध घेण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, या घटनेची माहिती कळताच नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांना आवश्यक त्या सूचना केल्या आणि मृत पावलेल्या यात्रेकरूंच्या कुटुंबीयांना आणि जखमींना सर्व ती मदत करण्याचे आदेश दिले आहेत. या अपघातात जखमी झालेल्यांना नजीकच्या इस्पितळात हलविण्यात आले आहे. ज्या रियासी जिल्ह्यामध्ये हा हल्ला झाला, तो भाग तसा दहशतवाद्यांच्यापासून मुक्त होता. पण, आता अतिरेक्यांनी या भागातही प्रवेश केला आहे. पीर पंजाल मार्गाने पाकिस्तानमधून काश्मीरमध्ये घुसखोरी करण्यासाठी अतिरेकी या मार्गाचा अवलंब करीत आले आहेत. सूत्रांच्या नुसार, पाकिस्तानी सैन्यातील माजी कमांडो आणि आता लष्कर-ए-तोयबाचा अतिरेकी बनलेल्या इलियास फौजी आणि अन्य दोघा अतिरेक्यांनी हा हल्ला केला असल्याचे सांगण्यात येते.

पंतप्रधान, केंद्रीय मंत्री राजनाथसिंह, अमित शाह यांनी या घटनेचा निषेध केला आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी यांनीही या घटनेचा निषेध केला. पण, या घटनेचे निमित्त साधून केंद्र सरकारवर टीका करण्याची संधी मल्लिकार्जुन खर्गे यांनी सोडली नाही! राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार शपथ घेणार असताना आणि त्या कार्यक्रमासाठी विविध देशांचे नेते उपस्थित असताना ठरवून हा हल्ला केला असल्याची शक्यता नाकारता येत नाही, असे काही तज्ज्ञांचे मत आहे. जम्मू-काश्मीर मधील शांतता बिघडविण्याचा प्रयत्न अशा हल्ल्यांद्वारे केला जात आहे, हे स्पष्ट आहे. पण, सलग तिसर्‍यांदा सत्तेवर आलेले मोदी सरकार इस्लामी अतिरेक्यांचे असे मनसुबे उधळून लावल्याशिवाय राहणार नाही.

मणिपूरमध्ये सशस्त्र कुकी अतिरेकी सक्रीय

मणिपूरमधील परिस्थिती अजून पूर्वपदावर आली नसल्याचे त्या राज्यातील घडामोडींवरुन दिसून येते. संशयित कुकी अतिरेक्यांनी एका मैतेयी शेतकर्‍याचे अपहरण करून, त्याची हत्या केल्याच्या घटनेनंतर तेथील वातावरण पुन्हा चिघळले. मणिपूरच्या आतापर्यंत शांत असलेल्या जिरीबाम जिल्ह्यामध्ये हा हत्येचा प्रकार नुकताच घडला. मणिपूर राज्यातील जिरीबाम जिल्हा हा आतापर्यंत हिंसाचारमुक्त होता. पण, कुकी अतिरेक्यांनी आता या भागाकडे आपला मोर्चा वळविला आहे. या जिल्ह्यामध्ये मैतेयी, नागा आणि कुकी झो या समाजाची वस्ती आहे. मात्र, कुकी अतिरेक्यांकडून मैतेयी समाजास लक्ष्य केले जात आहे. अनेक हिंदू मैतेयी घरांवर या अतिरेक्यांनी हल्ले केले आहेत. त्यामुळे तेथील मैतेयी अन्यत्र पळून गेले आहेत. या जिल्ह्यातील शेकडो घरे या अतिरेक्यांनी पेटवून दिली आहेत. गेल्या 7 जून रोजी कुकी अतिरेक्यांनी या जिल्ह्यातील लाम्ताई खुनाऊ या नावाचे गाव पूर्णपणे जाळून टाकले. मैतेयी समाजावर होत असलेल्या या हल्ल्यांचा त्या समाजाकडून तीव्र निषेध करण्यात येत आहे. मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह हे जिरीबामला भेट देण्यासाठी उद्या जाणार आहेत. त्यांचा दौरा लक्षात घेऊन सुरक्षा यंत्रणेची पाहणी करण्यासाठी गेलेल्या सुरक्षा तुकडीवर हल्ला होण्याचा प्रकार काल, सोमवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास घडला. त्यामध्ये एक सुरक्षा जवान जखमी झाला. हा हल्ला झाला असला तरी मुख्यमंत्री आपला नियोजित दौरा पार पाडणार आहेत. ईशान्य भारतातील या सीमावर्ती भागात, जी देशविरोधी तत्वे सक्रीय आहेत त्यांचा तातडीने बीमोड झाला, तरच मणिपूरमध्ये कायमस्वरूपी शांतता नांदू शकेल.

कॅनडामध्ये ‘ऑपरेशन ब्ल्यू स्टार’ विरुद्ध निदर्शने!

सुवर्ण मंदिरामध्ये आश्रय घेतलेल्या खलिस्तानी अतिरेक्यांना हुसकावून लावण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या काळात ‘ऑपरेशन ब्ल्यू स्टार’ योजण्यात आले होते. अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात दडलेले जर्नेलसिंग भिंद्रनवाले आणि अन्य अतिरेक्याना तेथून पळवून लावून सुवर्ण मंदिर अतिरेक्यांच्या विळख्यातून मुक्त करण्याच्या हेतूने ही मोहीम हाती घेण्यात आली होती. पण, खलिस्तान समर्थक या घटनेचे निमित्त करून स्वतंत्र खलिस्तानची मागणी रेटण्याचा प्रयत्न करीत आहेत. कॅनडामध्ये असे खलिस्तानचे समर्थक सक्रीय आहेत. कॅनडा या देशास त्यांच्याबद्दल कळवूनही त्या देशाकडून काही कारवाई केली जात नसल्याचे दिसून येते. उलट आमच्या देशांच्या नागरिकाची हत्या करण्याचा प्रकार भारताकडून घडत असल्याचा आरोप खुद्द त्या देशाच्या पंतप्रधानांकडून करण्यात आला आणि अमेरिकेनेही त्यास दुजोरा दिला. गेल्या 6 जून रोजी ‘ऑपरेशन ब्ल्यू स्टार’ला 40 वर्षे पूर्ण झाली. त्या घटनेचा निषेध करण्यासाठी कॅनडामधील खलिस्तान समर्थकांनी व्हॅन्कुव्हर येथील भारतीय दूतावासासमोर निदर्शने केली. ‘ऑपरेशन ब्ल्यू स्टार’ दरम्यान झालेली सुवर्ण मंदिराची हानी चित्राद्वारे तेथे प्रदर्शित करण्यात आली होती. या घटनेस इंदिरा गांधी यांना जबाबदार ठरवून त्यांच्या हत्येचा बदल घेणारे सतवंतसिंग आणि बियंतसिंग यांचे कट आउट वकिलातीसमोर लावण्यात आले होते.


तसेच इंदिरा गांधी यांच्या देहाची गोळ्यांनी चाळण झालेली प्रतिकृतीही त्या ठिकाणी ठेवण्यात आली होती. भारतीय वकिलातीच्या समोर अशी भारतविरोधी निदर्शने होत असताना ती तेथील शासनास दिसली नाहीत का? खलिस्तान समर्थकांना पूर्णपणे मोकळीक द्यायची आणि आपण भारताविरुद्ध आरडाओरड करायची, असे तंत्र कॅनडाने स्वीकारले असल्याचे दिसून येते. कॅनडात मोठ्या प्रमाणात असलेल्या खलिस्तान समर्थकांना हात लावायचा नाही, असे कॅनडाचे धोरण. भारतातही खलिस्तानचा कट्टर समर्थक असलेला अमृतपालसिंग हा तुरुंगात असतानाही लोकसभेची निवडणूक जिंकतो, याला काय म्हणावे? देशविरोधी विचारांची पाळेमुळे किती खोलवर रुजली आहेत, हेच अशा घटनेवरून दिसून येते. विदेशातून अशा देशविरोधी कृत्ये करणार्‍यांना मोठ्या प्रमाणात सर्व प्रकारचे साह्य होत आहे हा त्याचा अर्थ! कॅनडातील खलिस्तान समर्थक उजळ माथ्याने त्या देशात वावरत आहेत, तर अशा खलिस्तान समर्थकांकडून भारतातील खलिस्तानवाद्यांना मदत केली जात आहे. त्या मदतीच्या जोरावरच खलिस्तानवादी अमृतपालसिंग हा तुरुंगात असूनही निवडून येतो. अशा घटनांपासून आम्ही बोध घेणार की नाही?



दत्ता पंचवाघ

एम. ए. (अर्थशास्त्र), पत्रकारिता क्षेत्रात ३३ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. ‘हिंदुस्थान समाचार’ या वृत्तसंस्थेपासून पत्रकारितेस प्रारंभ. राजकारण, समाजकारण, अर्थकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पर्यटन आदी विषयांवर विपुल लेखन. आकाशवाणी मुंबई केंद्रासाठी लेखन.