महायुतीतील नेत्यांनी जाहीर वक्तव्य टाळवीत

भाजपा नेते दरेकरांचा बारणे व पाटलांना सल्ला

    10-Jun-2024
Total Views |
 
शिंदे- पवार
 
मुंबई - मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील यांनी केलेल्या विधानावरून भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी महायुतीतील पक्षाच्या नेत्यांनी, प्रवक्त्यानी आतील गोष्टी जाहीरपणे न बोलता पक्षाच्या पातळीवर बोलाव्यात. जाहीर वक्तव्य करणे टाळवीत, असा सल्ला दरेकरांनी दिला आहे. श्रीरंग बारणे यांनी केलेल्या विधानावर पत्रकारांशी बोलताना दरेकर म्हणाले महायुतीत राहून अशा प्रकारची एकमेकांबाबत नाराजी व्यक्त करणे योग्य आहे असे मला वाटत नाही.
 
श्रीरंग बारणे यांची नाराजी ना पक्षाकरिता, ना अजित पवारांकरिता, ना शिंदेंकरिता. जर बारणे प्रतापराव जाधव यांच्याजागी मंत्री झाले असते तर राज्यमंत्री पदातही समाधान आहे. अशा प्रकारचे वक्तव्य त्यांचे आले असते. परंतु आपण मंत्री झालो नाही मग कुठेतरी आपला संताप, नाराजी व्यक्त व्हायला पाहिजे या भूमिकेतून हे वक्तव्य आले असल्याचे दरेकर म्हणाले. तसेच भाजपाचे 105 आमदार असतानाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले. पाच वर्ष मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले.
 
पुन्हा एक उपमुख्यमंत्री झाला. म्हणजे आमच्या आकड्याला इथे काहीच किंमत नाही का? परंतु आम्ही एका विचारधारेवर, हिंदुत्वाच्या भूमिकेवर शिंदेंसोबत युती केली. त्याचे सुतोवाच श्रीकांत शिंदे यांनीही केले आहे की आम्ही जागांसाठी एकत्रित आलो नाही. तशा प्रकारची भुमिका बारणे किंवा संबंधितांनी घ्यायला पाहिजे. महायुतीतील पक्षाच्या आतील गोष्टी जाहीरपणे न बोलता पक्षाच्या पातळीवर बोलाव्यात अशी नम्र अपेक्षा महायुतीतील सर्व प्रवक्ते, नेत्यांकडून आहे.
 
लोकसभेची निवडणूक संपली आहे म्हणून बारणे बोलायला मोकळे झालेत. त्यांच्यासाठी आमच्या आमदार, कार्यकर्त्यांनी कशा पद्धतीने काम केलेय हे त्यांनाही माहित आहे. परंतु आपल्याला मिळाले नाही बोलले तर काय फरक पडतोय पाच वर्ष मी खासदार आहेना. परंतु ही त्यांची भुमिका योग्य नसल्याचेही दरेकर म्हणाले. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील यांनी केलेल्या जागांबाबतच्या विधानावर बोलताना दरेकर म्हणाले , अनिल पाटील हे जबाबदार व्यक्ति आहेत.
 
त्यांनी अशा प्रकारचे जाहीर वक्तव्य करणे योग्य वाटत नाही. महायुतीत वितुष्ट निर्माण होईल असे कुणी वक्तव्य करू नये अशा सूचना सगळ्या पक्षाच्या नेत्यांनी दिल्या पाहिजेत. छगन भुजबळ, अनिल पाटील म्हणाले त्याप्रमाणे ४० जागांच्या पक्षाला ८० जागा दिल्या तर उद्या शिंदे यांच्या पक्षालाही ८०-९० जागा द्याव्या लागणार. हे सूत्र लावले तर आमच्या १०५ जागा आहेत. मग आम्हाला २१० जागा द्याव्या लागतील. ३७० चे विधिमंडळ नाही २८८ जागा आहेत.
 
प्रॅक्टिकल राजकीय परिस्थिती आणि निवडणूक निकालावर पक्षाच्या चार भिंतीत चर्चा व्हाव्यात. जाहीर वक्तव्य टाळावीत, अशी नम्र विनंती राहील. आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाच्या विधिमंडळ बैठकीत भाजपा कार्यकर्त्यांना सूचना दिल्यात तशीच विरोधकांकडूनही अपेक्षा व्यक्त केली जात आहे.सरकारच्या पहिल्याच दिवशी पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या निर्णयावर बोलताना दरेकर म्हणाले की, तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून बसल्यानंतर मोदींच्या किंवा आमच्या महायुतीच्या मनात काय आहे त्याचे प्रतिबिंब पहिल्याच खुर्चीत बसल्यानंतर दिसलें आहे.
 
केवळ पुतना मावशीचे प्रेम काँग्रेस आणि महाविकास आघाडीला होते त्यांनी आता यावर उत्तर द्यावे. शेतकरी आमच्यावर थोडाफार नाराज होता त्या शेतकऱ्याला विश्वास दिलाय की, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. पंतप्रधान मोदी तन, मन, धन सर्वस्व देशाच्या बळीराजासाठी अर्पण करतील हा संदेश सुरुवातीलाच त्यांनी दिलाय. येणाऱ्या पाच वर्षात बळीराजा संपन्न कसा होईल आणि त्याची काळजी हे सरकार कसे वाहणार आहे हे यातून दिसून आले आहे.
 
नीट परीक्षेच्या संदर्भात बोलताना दरेकर म्हणाले की, यासंदर्भात वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी भुमिका घेतली आहे. सरकार आणि संबंधित यंत्रणा झालेल्या प्रकारात लक्ष घालून दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतील. झालेल्या गोष्टी इतर विद्यार्थ्यांवर अन्याय करणाऱ्या आहेत. सिस्टीमविषयी प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर बोलताना दरेकर म्हणाले की, पंतप्रधान मोदींचे पुन्हा सरकार आले आहे. अशा प्रकारच्या प्रवृत्तीना ठेचून काढून काश्मीर पुन्हा एकदा मुक्त वातावरणात कसे राहील याची काळजी आमचे सरकार घेईल.