मुंबई विमानतळावर विमानांची धडक टळली

एकाच धावपट्टीवर एका विमानाचे उड्डाण, तर दुसर्‍याचे लॅण्डिंग

    10-Jun-2024
Total Views |

विमाने
 मुंबई : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठा अपघात टळला. शनिवार, दि. 8 जून रोजी सकाळी मुंबई विमानतळावरील धावपट्टीवर दोन विमाने एकाच वेळी आल्याने मोठी दुर्घटना घडणार होती. या घटनेत शेकडो प्रवासी थोडक्यात बचावले आहेत. मुंबई विमानतळावर एकाच धावपट्टीवर एकाच वेळी एका विमानाने उड्डाण केले, तर दुसरे विमान त्याचवेळी उतरले.
 
इंडिगोचे विमान छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या 27 क्रमांकाच्या धावपट्टीवर उतरत होते. तर एअर इंडियाचे विमान उड्डाण घेत होते. ही दोन्ही ‘एअरबस ए320’ निओस विमाने होती. इंडिगोचे विमान 5053 देवी अहिल्याबाई होळकर विमानतळावरून टेक ऑफ केल्यानंतर रनवे 27 वर लॅण्डिंग करत होते. तर, एअर इंडियाचे विमान 657 तिरुवनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जात होते.
 
इंडिगोचा खुलासा
दरम्यान, या अपघाताबाबत एअर इंडिया आणि इंडिगोशी संपर्क साधण्यात आला. त्यावर इंडिगोने उत्तर दिले की, शनिवार, दि. 8 जून रोजी इंदोरहून इंडिगो फ्लाइट ‘सिक्स ई 6053’ला मुंबई विमानतळावर एटीसीकडून लॅण्डिंग क्लिअरन्स देण्यात आला होता. पायलट इन कमांडने लॅण्डिंग सुरू ठेवले आणि एटीसीच्या सूचनांचे पालन केले. इंडिगो प्रवाशांसाठी सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची आहे, असे इंडिगोकडून सांगण्यात आले आहे.