ठाण्यात पावसाचे दमदार आगमन

२४ तसात ४०.६० मिमी पावसाची नोंद

    10-Jun-2024
Total Views |
 
Thane
 
ठाणे : गतवर्षीच्या तुलनेत यंदा जून महिन्याच्या सुरुवातीपासुनच बरसलेल्या पावसाने रविवारपासुन जोर धरला. मागील २४ तासात ४०.६० मि.मीटर पावसाची नोंद झाली. या पावसामुळे ठाण्यात झाड आणि झाडाच्या फांद्या पडण्याच्या घटना घडल्या. यात कुणीही जखमी अथवा जीवितहानी झाली नसल्याचे पालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने सांगितले. दरम्यान,१ जून ते १० जून, या कालावधीत तब्बल ९०.३४ मिमी पाऊस पडला.
 
तर मागील वर्षी २०२३ मध्ये याच कालावधीत पाऊस निरंक होता . रविवारी मध्यरात्री ११-३० च्या सुमारास सुरू झालेल्या पावसाने दमदार हजेरी लावत अवघ्या एक तासात तब्बल २५.९० मि.मी. पावसाची नोंद केली. त्यानंतर रात्री सोमवारी पहाटेपासुन हळूहळू पाऊस ओसरत जाऊन रिमझिम पावसांच्या सरी पहाटे ५-३० वाजेपर्यंत सुरूच होत्या. पावसाच्या या रिमझिमि सरीने सोमवारी पहाटेच्या दरम्यान ठाण्यामध्ये पडझडीच्या घटना देखील घडल्या या घटनांमध्ये झाड पडणे, झाडाची फांदी पडणे अशा दोन घटना घडल्याची माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.
 
मागील २४ तासात ठाण्यात तीन झाडे पडली, तर एक झाडाची फांदी पडल्याची घटना घडली. रविवारी सकाळी १०-३० वाजण्याच्या सुमारास श्रीनाथ प्लाझा जवळ, दत्त मंदिरच्या बाजूला, धोबी आळी, चरई, ठाणे (प.) या ठिकाणी झाड पडले. सोमवारी पहाटे ६-५४ वाजता नौपाडा, मढवी हाऊस जवळ, रस्त्यावर झाडाची फांदी पडली. तर सकाळी ७-३० वाजण्याच्या सुमारास बाजारपेठेतील विठ्ठल मंदिर परिसरात, आनंद भोजनच्या बाजूला भले मोठे जांभळाचे झाड मंदिराच्या शेडवर कोसळले. या घटनांमध्ये कुठलीही जीवितहानी झाले नसल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.