पंतप्रधान मोदींच्या शपथविधीनंतर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया, म्हणाले...

    10-Jun-2024
Total Views |

Eknath Shinde 
 
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवार, ९ जून रोजी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांच्यासाठी खास पोस्ट लिहित मोदींचे अभिनंदन केले आहे. तसेच एनडीए सरकार देशाला नव्या उंचीवर नेऊन ठेवेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या पोस्टमध्ये म्हणाले की, "गेले दहा वर्षे व्रतस्थपणे देशाच्या कल्याणासाठी दिवसरात्र झटणारे, जागतिक पातळीवर भारताला मोठा सन्मान मिळवून देणारे आणि अहोरात्र गरिबांच्या कल्याणाचा ध्यास घेतलेले भारताचे भाग्यविधाते, विश्वगुरू नरेंद्र मोदीजी यांनी आज तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. नवा भारत, श्रेष्ठ भारत घडवण्यासाठी त्यांच्या प्रयत्नात आम्ही भक्कम साथ देणार आहोत. भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या स्थानी नेण्याचे उराशी बाळगलेले स्वप्न आता पूर्ण होईल, ही खात्री आहे. गरिबांना, वंचितांना विकासाच्या प्रवाहात आणण्याची इच्छा पूर्ण होऊ शकेल. मोदीजींच्या नेतृत्वातील एनडीए सरकार देशाला नव्या उंचीवर नेऊन ठेवेल," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
 
 
 
रविवारी दिल्ली येथे राष्ट्रपती भवन परिसरात नरेंद्र मोदी यांचा शपथविधीचा सोहळा पार पडला. या सोहळ्याला देशभरातील विविध क्षेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावली, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्याने भाजपाच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला.