"राष्ट्रवादीला आम्ही ऑफर दिली पण..."; उपमुख्यमंत्री फडणवीसांचा खुलासा

    10-Jun-2024
Total Views |
 
Devendra Fadanvis
 
नवी दिल्ली : रविवारी सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. तसेच यावेळी एनडीएमधील विविध पक्षांच्या नेत्यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. परंतू, यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकाही नेत्याने शपथ घेतली नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. मात्र, आता यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार या पदाची ऑफर दिल्याचा खुलासा त्यांनी केला आहे.
 
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "सरकारच्यावतीने राष्ट्रवादी काँग्रेसला एका जागेची ऑफर देण्यात आली होती. राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार ही जागा त्यांना देण्यात आली होती. परंतू, त्यांचा आग्रह होता की, आमच्याकडून प्रफुल पटेल यांचं नाव फायनल आहे. ते आधी मंत्री राहिलेले आहेत. त्यामुळे त्यांना राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार करता येणार नाही."
 
हे वाचलंत का? -  पंतप्रधान मोदींच्या शपथविधीनंतर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया, म्हणाले...
 
"युतीचं सरकार असताना काही निकष तयार करावे लागतात. कारण अनेक पक्ष सोबत असल्यामुळे एका पक्षासाठी तो निकष मोडता येत नाही. पण जेव्हा भविष्यात विस्तार होईल त्यावेळी निश्चितपणे त्यांचा विचार होईल. आमच्याकडून आता मंत्रिमंडळात सामील होण्याची राष्ट्रवादीला ऑफर देण्यात आली होती. पण त्यांनी सांगितलं की, तुम्ही आम्हाला पुढच्या वेळी दिलं तरी चालेल, पण आम्हाला मंत्रिपद द्या," असा खुलासा त्यांनी केला आहे.
 
ते पुढे म्हणाले की, "महाराष्ट्रातून काही अनुभवी आणि काही तरुण खासदारांना पुन्हा एकदा एनडीए सरकारमध्ये संधी मिळाल्याबद्दल त्या सर्वांचं अभिनंदन करतो. विशेषत: आमचे नेते नितीन गडकरी आणि पीयूष गोयल हे पुन्हा एकदा सरकारमध्ये येत आहेत. रामदास आठवलेदेखील पुन्हा सरकारमध्ये सामील होणार आहेत. तसेच रक्षा खडसे आणि मुरलीधर मोहोळ यांच्यासारखे तरुण खासदार मंत्रिमंडळात सामील होत आहेत. प्रतापराव जाधव यांच्यासारखे विदर्भातले अनुभवी नेते हेसुद्धा मंत्रिमंडळात येत आहेत, याचा मला अतिशय आनंद आहे," असेही ते म्हणाले.