आधी ७० घरांना आग... आता मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार!

    10-Jun-2024
Total Views |
CM N Biren Singh news


नवी दिल्ली
: मणिपूरच्या जिरीबाममध्ये झालेल्या हिंसाचारानंतर आता मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांच्या ताफ्यावर हल्ला झालेला आहे. मुख्यमंत्र्यांच्या झेड श्रेणीतील सुरक्षा कर्मचाऱ्यांवर हा हल्ला झालेला आहे. या हल्ल्यात दोन सुरक्षा कर्मचारी जखमी झाले आहेत. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


ही घटना दि. १० जून २०२४ रोजी सकाळी राष्ट्रीय महामार्ग-३७ वरील कांगपोकपी जिल्ह्यातील कोटलेनजवळ टी लैजांग गावात घडली. वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्या मुख्यमंत्री जिरीबामच्या दौऱ्यावर जाणार होते. त्यामुळे सुरक्षा कर्मचारी पाहणीसाठी तिथे गेले होते. यावेळी त्यांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. दरम्यान ताफ्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. ज्यामुळे सुरक्षा कर्मचारी जखमी झाले. हल्ल्यानंतर मणिपूर पोलीस कमांडो आणि आसाम रायफल्सने संयुक्त पथक तयार केले असून गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम राबविली जात आहे.

हे ही वाचा : खेळाडूंची सुरक्षा वाऱ्यावर!, सामन्यादरम्यान घडला धक्कादायक प्रकार!
 
एएनआय या वृत्तसंस्थेने या घटनेसंबधीत काही दृश्ये शेअर केली आहेत. यामध्ये जखमी झालेल्या सुरक्षा जवानांना रुग्णालयात दाखल केले जात असल्याचे पाहायला मिळते. दरम्यान एका अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, “मुख्यमंत्री बिरेन सिंह, जे अद्याप दिल्लीहून इंफाळला पोहोचलेले नाहीत, ते जिरीबामला जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जायचे होते,”

मणिपूरच्या जिरीबाम भागात नुकताच हिंसाचार झाला होता. ६ जून रोजी दहशतवाद्यांनी दोन पोलिस स्टेशन आणि किमान ७० घरे जाळली. ज्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. म्हणूनच मुख्यमंत्री परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी तिथे जाणार होते. पण ताफा पाहणीसाठी गेला असता त्यांच्यावर हल्ला झाला आणि दोन सुरक्षा कर्मचारी जखमी झाले.