भारताच्या विकासाचे लख्ख प्रतिबिंब

    10-Jun-2024
Total Views |
Stock Market Highlights
 
शेअर बाजाराने मोदी सरकारचे स्वागत करत घेतलेली उसळी ही थक्क करणारी आहे. एक्झिट पोल आणि निकाल जाहीर झाल्यानंतर घडलेल्या घडामोडींमध्ये एक दिवस बाजारात घसरण पाहायला मिळाली. तथापि, बुधवारपासून बाजार पुन्हा सावरला असून, शुक्रवारी बंद होताना निर्देशांकाने सर्वकालीन उच्चांक स्थापित केला. मात्र, मोदीद्वेषाची कावीळ झालेल्यांना शेअर बाजाराची झालेली वाढ ही क्षुल्लक घटना वाटते.

देशाचे पंतप्रधान यांनी शेअर बाजारातील घडामोडींवर भाष्य करणे अनावश्यक होते. पंतप्रधान वा केंद्रीय गृहमंत्र्यांनी शेअर बाजारातील उलाढालींची दखल घ्यावी, असे त्यात काही नसते, असे तारे एका दैनिकाने आपल्या ‘संपादकीय’मध्ये तोडले आहेत. त्याचवेळी देशातील ‘डिमॅट’ खातेदारांची संख्या १५ कोटी असून, ती देशाच्या लोकसंख्येच्या तुलनेत जेमतेम सव्वादहा टक्के इतकीच असल्याचा दावाही त्यात केला आहे. देशप्रमुखाने म्हणूनच या सव्वादहा टक्क्यांचे हितसंबंध असलेल्या क्षेत्रावर बोलणे औचित्यभंग ठरते, असाही आरोप त्यांनी केला आहे. तसेच या संपादकीयमध्ये मंगळवारी निकालाच्या दिवशी शेअर बाजार कसा कोसळला आणि काँग्रेसी राहुल गांधी यांनी शेअर बाजार घोटाळ्याचा जो आरोप केला आहे, त्याच्याशीही त्याचा बादरायण संबंध जोडला गेला आहे. ’म्हातारी मेल्याचे दुःख नाही, काळ सोकावतो’ या उक्तीप्रमाणे त्यांच्या या विधानांची दखल घेणे क्रमप्राप्त आहे. ‘शिमग्याचा खेळ, बोंबेचा सुकाळ’ या समर्थ रामदासस्वामी यांच्या वचनाचा दाखला, सदर वृत्तपत्राने दिला आहे. तद्वतच, केंद्रात मोदी सरकार ऐतिहासिक तिसर्‍यांदा सत्तेवर आल्यानंतर, त्यांनी ही बोंब ठोकली आहे, असे म्हणता येते.
 
भारतीय शेअर बाजारात गेल्या आठवडाभरात नेमके काय झाले, हे सर्वप्रथम समजून घेतले पाहिजे. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच नेतृत्वाखालील सरकार स्थापन होणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर, शुक्रवारी शेअर बाजारात निर्देशांकाचा सर्वकालीन उच्चांक नोंदवला गेला. देशात राजकीय स्थिरतेचे मिळालेले संकेत, आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने भारताच्या वाढीचा अंदाज ७.२ टक्के इतका वर्तवल्याने, बाजारात उधाण आल्याचे दिसले. बंद होताना निर्देशांक ७६ हजार ६९३ अंकांवर तर निफ्टी २३ ह्जार २९० वर होता. हा सर्वकालीन उच्चांक. एक्झिट पोलमधून भाजपप्रणित सरकार पुन्हा एकदा सत्तेत येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आल्यानंतर, शेअर बाजाराने त्याचे स्वागत केले होते. तथापि, प्रत्यक्ष निकालाच्या दिवशी अस्थिरतेचे वातावरण असल्याने, मोठी घसरण पाहायला मिळाली. विदेशी गुंतवणूकदार मोठे विक्रेते ठरल्याचे दिसून आले. एक्झिट पोलचा अंदाज, अनपेक्षित निकाल, आणि त्यानंतरच्या घडामोडी यातून समभागांमध्ये झालेली घसरण आणि वाढ, यामुळे विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार शेअर बाजारातील मोठे विक्रेते होते.

जून महिन्यात, विदेशी गुंतवणूकदारांनी रोख बाजारातून १८ हजार १०९ कोटी रुपये काढले, तर देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी जूनमध्ये ६ हजार ८६४ कोटी रुपयांच्या समभागांची निव्वळ खरेदी केली. निकाल जाहीर झाल्यानंतर, निर्देशांक ६ टक्कयांनी कोसळला होता. ४ जून रोजी एका दिवसात विदेशी गुंतवणूकदारांनी १२ हजार ४३६ कोटी रुपये बाजारातून काढून घेतले. ५ जून रोजी निर्देशांक ३.२ टक्कयांनी सावरला. ’रालोआ’तील घटक पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच नेतृत्वाला बिनशर्त पाठिंबा दिल्याने, बाजारात पुन्हा एकदा तेजी आली. त्याचवेळी रिझर्व्ह बँकेने, भारताच्या वाढीच्या वेगाच्या अंदाजात वाढ करत ही वाढ ७.२ टक्के दराने होईल, अशी शक्यता व्यक्त केली. तेजीची भावना कायम राहण्यास त्याची मदत झाली. येत्या काळात, केंद्र सरकारमधील मंत्र्यांचे खातेवाटप, पावसाची कामगिरी, यंदाच्या आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीचे निकाल, जीडीपी वाढीची आकडेवारी, जीएसटी संकलनाची आकडेवारी, तसेच जाहीर होणारा अर्थसंकल्प आणि त्यातील तरतुदी, हे सर्व घटक बाजारावर परिणाम करणारे ठरणार आहेत. या सर्व बाबी बाजारावर परिणाम करणार्‍या ठरतात.

भारतीय बाजारात ज्या घडामोडी घडत आहेत, त्या येणार्‍या काळात भारतीय बाजार नवनवे विक्रम प्रस्थापित करणार आहे, याचेच शुभवर्तमान देणार्‍या आहेत. सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर, गेली दीड महिने शेअर बाजारात फारशा घडामोडी घडल्या नाहीत. म्हणूनच, तुलनेने त्याचा चढउतारही कमी अनुभवायला मिळाला. असे असतानाही, काही दिवसांपूर्वी भारतीय बाजाराचे मूल्य ५ ट्रिलियन डॉलर इतके झाले. चिनी अर्थव्यवस्थेत सुधारणा होत असल्याचे वृत्त आल्यानंतर, विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून निधी काढून घेत, तो चिनी बाजारपेठेत गुंतवला. भारतीय बाजार हा विदेशी गुंतवणूकदारांसाठी आकर्षक असल्याचे, गेल्या काही वर्षांत दिसून आले आहे. तथापि, निवडणुकांमुळे जी एक अनिश्चितता येथे होती, त्याचा परिणाम म्हणून त्यांनी आपला निधी अन्यत्र वर्ग केला, असे मानले जाते. अमेरिकी मध्यवर्ती बँकेने दरवाढ कमी करण्याबाबत अद्यापही निश्चित अशी भूमिका घेतलेली नाही. त्यामुळेही विदेशी गुंतवणूक तुलनेने कमी आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच गृहमंत्री अमित शाह यांनी केलेली काही व्यक्तव्ये प्रसिद्धीस आली. या दोघांनाही शेअर बाजारासंबंधी विचारणा केली असता, ज्यांच्यापाशी गुंतवणूक करण्यासाठी पैसे आहेत, त्यांनी डोळे झाकून भारतीय बाजारात गुंतवणूक करावी, असा सल्ला त्यांनी दिला.

२०१४ मध्ये भाजपचे सरकार केंद्रात आले, तेव्हा निर्देशांक २५ हजारांच्या आसपास होता. आज तो ७५ हजारांवर गेला आहे. ज्या सरकारी कंपन्यांच्या समभागांचा गुंतवणूक करण्यासाठी कोणी विचारही करत नव्हते, अशा कंपन्यांचे समभाग आज कित्येक पटीने वाढलेले आहेत. काही वर्षांपूर्वी विदेशी गुंतवणूकदार भारतीय बाजाराची दिशा आणि दशा ठरवत होते. आज देशांतर्गत गुंतवणूकदार मोठ्या संख्येने वाढले आहेत. सर्वसामान्य गुंतवणूकदार बाजाराला स्थिरता देणारा ठरला आहे. त्यामुळेच, विदेशी गुंतवणूकदारांनी मोठ्या संख्येने भांडवल काढले, तरी बाजारावर त्याचा विपरित परिणाम होत नाही. बाजार स्थिर राहतो. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया केंद्र सरकारला २ लाख १० हजार कोटी रुपयांचा लाभांश देत आहे. भारत सरकार रिझर्व्ह बँकेचा भागधारक आहे. त्याशिवाय, तेल विपणन कंपन्या, सरकारी बँकाही सरकारला भरभरून लाभांश देत आहेत. भारतीय बाजाराचे मूल्य ५ ट्रिलियन डॉलर इतके झाले असून, भारतीय अर्थव्यवस्था याच लक्ष्याकडे वाटचाल करत आहे. पुढील वर्षी भारतीय अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलरची होईल, असे अंदाज अनेकानेक संस्थांनी व्यक्त केला आहे. त्यावेळी ती जगातील तिसर्‍या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून ओळखली जाईल. भारतीय बाजाराने केलेली प्रगती ही कौतुकास्पद अशीच आहे. अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग आणि आरोग्य, यांचे प्रतिबिंब निर्देशांकात उमटते असे म्हटले जाते. भारतीय बाजाराने गेल्या १० वर्षांत जो उच्चांक गाठला आहे, तो भारताच्या विकासाचेच निदर्शक आहे असे म्हटले तर चुकीचे ठरू नये.


- संजीव ओक