गोनीदांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या लेखाकारकिर्दीचं घेतलेला आढावा

    01-Jun-2024   
Total Views |

gonida 
 
लेखक? छे! हा तर मस्त फकीर! आयुष्याच्या कणाकणाचा रसास्वाद घेणारं बहुरंगी बहुढंगी व्यक्तिमत्व. बालवयातच घर सोडून स्वातंत्र्यसंग्रामात भाग घेण्याच्या इर्षेने घर सोडलं आणि हा देश पाहण्याच्या ओढीने महाराष्ट्रभर भ्रमण केलं. तळकोकण आणि सह्याद्रीचे सौंदर्य त्यांच्या नसानसात भिनलं आहे. सह्याद्रीचा रांगडेपणा आणि कोकणातील हिरवीकंच नव्हाळी त्यांच्या शब्दाशब्दातून जाणवत असते. त्यांचा जन्म विदर्भातला. एका शाळा शिक्षकाच्या घरात परतवाडा येथे ते जन्मले. वयाच्या १२ व्या वर्षी सातवीतून शाळा सोडून संत गाडगेबाबांच्या सानिध्यात आले. त्यांच्याच उपदेशाने गावोगाव भटकंती केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक झाले आणि त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. ज्ञानेश्वरी, वेदांचा अभ्यास करून भारत स्वतंत्र झाला तेव्हा लेखन करून त्यावर उदरनिर्वाह करण्यास त्यांनी प्रारंभ केला. प्रसंगी, ५ घरचं मागून, वार लावून ते जेवले. झाडाखाली, दगड उशाला घेऊन आकाश निरखत झोपले. परिक्रमा केली, दुर्गभ्रमंती केली आणि संसारही केला!
- अनुभव विश्व् आणि लेखन
कुमारसाहित्य, ललित गद्य, चरित्र, कादंबरी, आत्मचरित्र, प्रवासवर्णन, धार्मिक, पौराणिक अशा अनेक साहित्यप्रकारात त्यांनी विपुल लेखन केले. गोनीदांचं लिखाण अस्सल आहे. समाजात घडणाऱ्या घडामोडींवरची प्रतिक्रिया नाहीय. अनुभवसंपन्न आयुष्याचा मांडलेला लेखाजोखा आहे. त्यांची वेदनाही अस्सल आणि आणि विचारही नवा आहे. त्यांची पुस्तकं वाचणं म्हणजे केवळ मनोरंजनासाठी पानं उलटणं नव्हे तर यत्नपूर्वक समजून घेण्याचा विषय असतो. जन्मजात मिळालेल्या प्रतिभेमुळे हाती घेतील तो विषय उत्कृष्टपणे मांडण्याची सिद्धहस्त कला त्यांच्याकडे आहे.
 
- कोकण आणि पडघवली
विदर्भातला जन्म असूनही गोनिदांना ओढ लागली ती कोकणाची! एखाद्या भागाचे देशाचे वर्णन करताना ते त्याची ओळख पहिले निसर्गसौंदर्याने करतात. त्या भूभागाशी आपण समरस होतो न होतो त्याचवेळी ते इतर भौगोलिक परिस्थितीची माहिती देतात, बागा, तळी, नदी, शेतं, यातून तिथला माणूस किती समृद्ध आहे याची आपल्याला कल्पना येते. पुढे सुरु होते तिथल्या माणसांची ओळख. त्यांची स्वभाववैशिष्ट्ये, त्यांचे गुण दोष, स्थानिकांच्या अडचणी, आणि मग त्यांची मानसिकता. यातून आपण त्या पात्राशी स्वतःला जोडून घेतो. मग पुस्तकांचा आणि आपला प्रवास एकत्र सुरु राहतो. कोकणाचं वर्णन करणारी त्यांची अनेक पुस्तके आहेत, त्यातच शितू आणि पडघवली ही दोन कायम लक्षात राहण्यासारखी. यात ते केवळ वर्णनात्मक न लिहिता तेथील समाजव्यवस्थेचा एकेक पापुद्रा उलगडून दाखवतात. ग्रामीण स्त्रीच्या आयुष्यावर लिहिताना त्यांनी तिच्या तनामनाच्या क्षुधातृष्णांचा विचार केला आहे. तीच सामर्थ्य आणि वृत्ती मांडताना त्यांचा मानसशास्त्राबद्दलचा अभ्यासही दिसून येतो. ‘पडघवली’ सर्व मरगळ आलेल्या खेड्यांची प्रतिनिधी आहे, असं ते स्वतः म्हणतात. एका विकासोत्सुक पण मर्म हरवत जाणाऱ्या खेड्याची ही कथा. आज ओस पडणारी खेडी, ढासळत चाललेली समाजव्यवस्था, मूल्यांचा होणारा ऱ्हास, उध्वस्त होत चाललेली ग्रामसंस्कृती पाहिली, की पडघवली हटकून आठवते. आपल्या डोळ्यासमोर भारत गेलेलं खेड आणि त्यानंतर शहरीकरणाच्या बरोबरीने येऊ पाहणारं स्वार्थी मनोवृत्तीचं आक्रमण पाहून आपण व्यथित होतो. १९५५ साली लिहिलेली ही कादंबरी काळाच्या पुढचं पाहणारी आहे.
 
- इतिहास भ्रमंती (दुर्गभ्रमणगाथा)
चित्रपाषाणांचा त्यांचा संग्रह होता. त्यातूनच त्यांची सौंदर्यासक्ती दिसून येते. रंगीबेरंगी दगड, स्फटिकासारखे असंख्य पैलू असणारे शुभ्र आणि पारदर्शक दगड, गुलाबी-जांभळी छटा असणारे दगड त्यांनी जमवले होते. सह्याद्रीत दुर्गभ्रमंती करताना जमवलेला हा खजिना आणि पाहिलेलं दृष्टिवैभव मूर्त रूपाने साकारलंय ते दुर्गभ्रमणगाथेत. उणेपुरे १७-१८ किल्ले यात आहेत. त्यातही राजगडाविषयीच जास्त लिहिलंय. किल्ले लिहिताना ते त्या त्या किल्ल्यावरची वनसंपदा, वृक्षवल्ली, किल्ल्याचा इतिहास आणि भूगोल सुद्धा ते सांगतात. किल्ल्यावर वस्ती असेल तर त्या माणसांविषयी ते न चुकता लिहितात. हा किल्ला कोणत्या काळात कसा कसा बदलत गेला हे सांगताना त्याचे वास्तुरचनाशास्त्र, राजकीयदॄष्ट्या, संरक्षणदॄष्ट्या त्याचे महत्त्व अशा अनेक मुद्द्यांचा सखोल अभ्यासपूर्व लेख ते लिहितात. किल्ल्यावर बसून घालवलेल्या चांदण्या रात्री, सूर्यास्ताच्या वेळी कड्यावरून दिसणारं खालचं हिरवं चमचमतं तळकोकण वाचताना मोह पडतो. सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, शिलाहार अशा या देशातल्या संपन्न राजवटींनी हे किल्ले बांधले, वापरले आहेत. मात्र जवळजवळ सर्वच किल्ल्यांचं आज दिसणारं रूप हे शिवकाळातलंच. या इतिहासाची आठवण करून देतात गोनीदा! त्यांनी जवळपास पन्नास वर्षे दुर्गभ्रमण केले. या काळात त्यांनी गडाकोटांची, त्यांवरील वास्तूंची असंख्य छायाचित्रे काढली. त्यांपैकी निवडक अशा ११५ कृष्णधवल छायाचित्रांचे एक पुस्तक ’गोनीदांची दुर्गचित्रे’ या नावाने प्रकाशित झाले आहे. 'दुर्गदर्शन', 'किल्ले', 'पवनाकाठचा धोंडी', 'जैत रे जैत', 'रानभुली', 'त्या तिथे रुखातळी', 'वाघरू', आणि 'माचीवरला बुधा' ह्या आपल्या पुस्तकांमधून त्यांनी दुर्गभ्रमंतीचे अनुभव शब्दबद्ध केले. आज जे ट्रेकिंगच्या नावाखाली सह्याद्री पिसणं सुरु आहे, ती आवड गोनीदांनी मराठी मांसल लावली. खऱ्या अर्थाने ऐतिहासिक वैभव उघड केलं. माणसे दुर्गभ्रमंतीकडे आकर्षित झाली. त्यांतल्या अनेकांना गोनीदांनी स्वतः प्रत्यक्ष दुर्गदर्शनही घडवले.
 
- आत्मचरित्र स्मरणगाथा आणि कुणा एकाची भ्रमणगाथा
स्मरणगाथा मध्ये त्यांनी त्यांच्या जीवनातील अनेक काळकोपरे उजेडात आणले. गाडगेबाबांचा सहवास, ज्ञानेश्वरीचे वाचन पठण, महाराष्ट्र भ्रमंती, परिक्रमा आणि पोटाचे हाल.. सगळंच. कुणा एकाची भ्रमणगाथा नर्मदा परिक्रमेवरच आहे. खरतर त्र्यांचं प्रत्येक पुस्तकं आत्मचरित्र असल्यासारखंच वाटतं. ह्यात त्यांना कोण एक यशोदा भेटते. आणि मग बस्स. पूर्ण परिक्रमेत तिचा उल्लेख नाही आला तरी ती असते. दीड पानात संपलेली ही कन्या आपल्याला पुस्तकभर पुरते. पुस्तकं जसं जसं पुढे सरकतं, तसं मुग्ध व्हायच्या वेळा अनेक येतात. वाचता वाचता पुस्तक आणि डोळे दोन्ही मिटून आपण काही क्षण मनन करतो.
 
- धार्मिक/पौराणिक साहित्य आणि दास डोंगरी राहतो
घरातून पलायन केल्यानंतर लाभलेली संत गाडगेबाबांची सांगत त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणं गेली. कीर्तनं निरूपणांचा चांद लागला, महाराष्ट्र भ्रमंतीमुळे ज्ञानेश्वरी, वेद अशा पौराणिक साहित्याशी जवळून संबंध आला. दुर्गभ्रमंती आणि अनेक गुण त्यांचे मिळते जुळते आहेत ते समर्थ रामदासांशी. त्यांचं चरित्र त्यांनी लिहिलं. रामदास आणि त्यायोगे शिवाजी महाराज, निसर्ग, वनस्पती, तत्कालीन समाजव्यवस्था, गावं वसायच्या पद्धती सगळं सगळं यात दिसत. रामदासांनी केलेलं कार्य आणि घडवून आणलेली निशस्त्र क्रांती यातून स्पष्ट होते. रामदासांचे संघटन, बलोउपासना आणि भक्ती हे गुण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी कसे साधर्म्य दाखवणारे आहेत हे त्यांचे चरित्र वाचताना जाणवतं. रा स्व संघाचे स्वयंसेवक म्हणून आणि एक कलंदर व्यक्तिमत्व अशा दोन्हीही नजरेतून त्यांनी रामदास चितारलेत.
 
- जैत रे जैत
चित्रपट लेखन देखील केलं. अत्यंत गाजलेला चित्रपट. जीत झाली, असाध्य ते साध्य झालं. भरभक्कम मोल मोजून. पण नफा किती आणि किती तोटा? आपली राणी गमावून राणीमाशीचा मृत्यू घडवून आणला. त्या पुरुषाच्या त्यावेळच्या बेधुंद ढोल बडवण्यामागच्या भावना काय हे आजही कोणीही छातीठोकपणे समजाऊ शकत नाही. या चित्रपटाला इतकं प्रेम मिळाल कि सांगता सोय नाही.
 
गो. नी. दांडेकर १९८१ साली अकोला येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते त्याप्रमाणे त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले. त्यांच्या आत्मचरित्रात्मक 'स्मरणगाथा'ला १९७७ मध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. तसेच पुणे विद्यापीठाने 30 डिसेंबर १९९२ रोजी सन्माननीय डी. लिट. पदवी त्यांना दिली. १९९१ मध्ये महाराष्ट्र शासनाचा 'महाराष्ट्र गौरव' पुरस्कार त्यांना मिळाला. तळेगाव नगरपरिषदेने 'नगरभूषण', तर द्वारकापीठाच्या शंकराचार्यांनी 'साहित्य वाचस्पती' म्हणून गोनीदांना गौरविले. शिवाय नगर जिल्हा ऐतिहासिक वस्तुसंग्रहालयाचा 'नानासाहेब नारळकर 'पुरस्कार, कोल्हापूरच्या गिर्यारोहण संस्थेचा 'दुर्गप्रेमी ' पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना लाभले.

मृगा वर्तक

मुंबई विदयापीठातून पत्रकारिता व संज्ञापण विषयात पदव्युत्तर शिक्षण. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. वसईतील विविध समाज व खाद्यसंस्कृतीचा अभ्यास. ललित व पर्यटन विषयावर लेखन करण्याची आवड. तसेच स्त्रीवादी विषयांवर लेखन करण्याची आवड.