संत एकनाथांच्या ‘भावार्थ रामायण’मधील ‘नित्यविजयी रघुनंदन।’ (उत्तरार्ध)

01 Jun 2024 22:25:49
Sant eknath bhavarth ramayan



संत एकनाथांचे ‘भावार्थ रामायण’ योद्धा रघुवीराचे दर्शन आहे. या ग्रंथाच्या सात कांडांतून श्रीरामांच्या अनेक पैलूंचे सूक्ष्मदर्शन एकनाथ घडवतात. श्रीरामाने लक्ष्मणास केलेला उपदेश देव, देश आणि धर्मरक्षकांना नित्य बोधप्रद ठरणारा आहे. धर्माने युद्ध करणार्‍या ‘मर्यादा पुरुषोत्तम’ रघुवीराचे चित्रण पौरुषत्वाचे चैतन्य जागरण आहे.

वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू ह.भ.प. धुंडामहाराज देगलूरकर यांची महाराष्ट्र शासनाद्वारे प्रकाशित ‘श्री भावार्थ रामायण’ ग्रंथास सुरेख साक्षेपी उद्बोधक प्रस्तावना लाभलेली आहे. त्या प्रस्तावनेत धुंंडामहाराज म्हणतात - ‘’श्री भावार्थ रामायण ही श्री एकनाथ महाराजांची तशी एक प्रकारे स्वतंत्र रचना आहे. रामचरित्र जरी प्रारंभी वाल्मिकीने गायिले असले तरी श्री एकनाथ महाराजांचे भावार्थ रामायण म्हणजे केवळ वाल्मिकी रामायणाचा अनुवाद नव्हे; रामकथेची बाह्य चौकट जरी वाल्मिकी रामायणाचीच असली तरी तिच्यात भरलेले रंग मात्र श्री एकनाथ महाराजांचे आहेत. त्यामुळेच मूळ रामचरित्राला विशेष गोडी प्राप्त झाली आहे. इतर अनेक पुराणग्रंथांचा, काव्यग्रंथांचा, विविध रामायणांचा, हनुमन्नाटकाचा व योगवासिष्ठाचा आधार श्री एकनाथांनी घेतला आहे.”

वाल्मिकी रामायणात नसलेले अनेक प्रसंग नाथांच्या भावार्थ रामायणात आहेत. केवळ सीतामुक्तीच नव्हे, तर ‘देवबंध विमोचन’ ही नवी संकल्पना हे एकनाथांचे रामायणाला अनोखे योगदान आहे. रावणांच्या बंदिवासातील देवदेवतांच्या दारुण अवस्थेचे विदारक चित्रण, मोठ्या प्रभावीपणे एकनाथ करतात. ते वर्णन हे एक रूपक असून त्याद्वारे एकनाथ महाराष्ट्रातील धर्मांध मुस्लीम अत्याचाराने गांजलेल्या समाजस्थितीचेच चित्रण करतात. एकनाथांच्या दृष्टीने रावण हा धर्मांध, उन्मत्त, बादशहाचे प्रतीक असून, त्याच्या बंदिवासातील असंख्य देवदेवता या अत्याचाराने गांजलेल्या हिंदू समाजातील समाजधुरिणींच्या हतबल अवस्थेचे प्रतीक आहे. नाथांच्या या दृष्टिकोनातून ‘भावार्थ रामायण’ वाचले की एकनाथांच्या ऐतिहासिक कामगिरीची खरी ओळख पटते आणि मोठ्या बिकट अवस्थेत मृतवत झालेल्या समाजात त्यांनी आपल्या वीररसपूर्ण रामकथेने कसे पुरुषार्थाचे जनजागरण केले, त्याचे सामाजिक मूल्य लक्षात येते.

संत एकनाथांच्या भावार्थ रामायणातील देवबंध विमोचन संकल्पनेबद्दल डॉ. शं. गो. तुळपुळे आपल्या ‘पाच संतकवी’ ग्रंथात म्हणतात - “देवांचे बंधविमोचन करून रामराज्याची गुढी उभारावी, स्वधर्माला आलेली ग्लानी दूर करून त्याचे पुनरूत्थान करावे, दुष्टांचे निर्दालन करून, सज्जनांचे आणि सत्त्वशीलांचे रक्षण करावे. देवद्रोही-विश्वद्रोही-ब्रह्मद्रोही अशा रावणाला निवडून रामराज्य स्थापावे, अशा अर्थाचे विचार आपल्या भावार्थ रामायणात एकनाथांनी कमीतकमी पन्नास वेळा व्यक्त केले आहेत.”

हतबल स्थितीचे विदारक वर्णन
रावणाने बंदिवासात टाकलेले सर्व देव हतबल, शक्तिहीन झाले असून ते रावणाच्या दरबारी रावण जे जे सांगेल ती कष्टाची कामे वेठबिगाराप्रमाणे निमूटपणे करताहेत. भावार्थ रामायणाच्या अयोध्याकांडातील या ओव्या आपण मुळातूनच वाचा. त्यापैकी काही ओव्या-

विघ्न राहू न शके जयापुढे। तो गणेश होवोनी बापुडे।
गाढवांचे कळप गाढे। चहूकडे वळीतसे॥
इंद्र बारी, चंद्र छत्रधरी। यम पाण वाहे घरी।
वायु सर्वदा पूजे वोसटी।
विधी (ब्रह्मदेव) तेथे करी दळणकांडा ॥
नवग्रहांची पीडा गाढी। रावणे घातले बांधवडी।
पायी घालोनिया बेडी। पायरीबुडी अडकविले॥
रावणाने विघ्नहर्त्या गणेशाला गाढवे सांभाळण्याचे, इंद्राला चौर्या ढाळण्याचे, चंद्राला छत्री धरण्याचे, यमाला पाणी भरण्याचे काम लावलेले आहे. एवढेच नव्हे तर ज्या शनी नवग्रहाच्या पीडेला सर्व घाबरतात, त्यांना रावणाने सिंहासनाच्या तळी पायर्‍या म्हणून झेपवलेले आहे. असेच अग्नी, वारा, बृहस्पती या बंदिवासातील सर्व देवांना त्यांनी वेठबिगारीला लावलेले आहे. हे चित्रण एक रूपक आहे. याविषयी डॉ. तुळपुळे म्हणतात - या सार्‍या वर्णनातून आपल्या डोळ्यांसमोर घडणारे यावनी सत्तेचे पाशवी अत्याचार कवीस रंगवायचे आहेत असे स्पष्ट दिसते. परिस्थितीमुळे कदाचित ते उघडपणे बोलता येत नसते ते येथे त्यांनी अप्रत्यक्षपणे सुचविले आहे. ‘प्रपंच व परमार्थी सावधान’ राहून लोकसंग्रहार्थ स्वधर्मानुसार वर्तन हेच मानवाचे एकमेव ध्येय आहे असा उपदेश केला आहे. सर्वांना प्रपंच-परमार्थी सावधान करणे हा, श्रीरामावताराचा हेतू असल्याचेही नाथ सांगतात. यादृष्टीने पाहता ‘भावार्थ रामायण’ म्हणजे तेव्हाच्या महाराष्ट्राचा प्रापंचिक व पारमार्थिक उषःकालच होय, असे म्हणतात.
 
भावार्थ रामायणाचे लेखन हे संत एकनाथांच्या जीवनकार्यातील अखेरचे लेखन आहे. भावार्थ रामायणाच्या सहाव्या युद्धकांडातील 45 अध्याय/सर्ग संत एकनाथांनी लिहिले आणि त्यांनी गोदावरी नदीत वयाच्या 66व्या वर्षी जलसमाधी घेऊन आपल्या इहलोकीच्या कार्याची समाप्ती केली. पुढील अध्याय हे शिष्य गावबाने पूर्ण केले आहेत. भावार्थ रामायणाचे प्रारूप थोडक्यात पुढीलप्रमाणे आहे - 1) बालकांड ः 27 अध्याय 2) अयोध्याकांड ः 18 अध्याय 3) अरण्यकांड ः 23 अध्याय 4) किष्किंधाकांड ः 18 अध्याय 5) सुंदरकांड ः 42 अध्याय 6) युद्धकांड ः 92 अध्याय 7) उत्तरकांड ः 78 अध्याय. एकूण अध्याय 297. एकूण ओवी संख्या 40000.

संत एकनाथांच्या याच ‘देवबंधमोचक’, योद्ध्या रघुवीराच्या संकल्पनेचा स्वीकार करून, पुढे एकनाथांशी जवळचे नाते असलेल्या संत समर्थ रामदास स्वामींनी रामभक्तीने हलकल्लोळ केला. संत एकनाथ, संत रामदास यांच्या अद्वैत दृष्टीने विठ्ठल आणि श्रीराम एकच आहेत. ‘राम तोचि विठ्ठल। विठ्ठल तोचि राम।’

संत एकनाथ इतके राममय झाले होते की त्यांनी ‘भावार्थ रामायणा’ शिवाय ‘श्रीनाथ भागवत’आणि अनेक अभंगातून रामस्तुतीचे स्वानंद गायन केलेले आहे. एकनाथांचे 4000 अभंग आहेत. त्यात श्रीरामावर 250 अभंग आहेत. (पुढील लेखात त्याचा विचार आहे.)‘भावार्थ रामायण’ ग्रंथाच्या सात कांडांमध्ये श्रीरामाच्या अनेक पैलूंचे विलोभनीय दर्शन एकनाथांनी घडवलेले आहे.

मृदुपणे नाही यश कीर्ति। मृदुपणे नाही विजयवृत्ती॥
मृदुत्वे संन्यासी धरावे शांती । तेणे त्यासी परमार्थ प्राप्ती॥
मृदुत्व आम्हा रायाप्रती। जाण अपकीर्ति सौमित्रा॥
श्रीरामाने बंधू सौमित्र लक्ष्मणास केलेला हा उपदेश स्वधर्म, स्वसंस्कृती, स्वराज्यरक्षणाचे दायित्व ज्याच्यावर आहे त्यांनी सदैव स्मरणात ठेवावे.
 
युद्धकांडात राम कसे धर्माने युद्ध करतो याचे वर्णन करीत ‘मर्यादा पुरुषोत्तम’ रामाचे दर्शन एकनाथ घडवतात. रावण वधानंतर ‘रणी भंगला रावण। नित्यविजयी रघुनंदन।’ म्हणत, नित्यविजयी रघुनंदनाचे दर्शन घडविणारे संत एकनाथ हे पहिले रामकथाकार आहेत.

विद्याधर ताठे
9881909775
(पुढील अंकात ः संत एकनाथांच्या अभंग गाथेतील रामदर्शन)
Powered By Sangraha 9.0