‘जिल्लेइलाही’ ‘शहेनशहा’ होणार

    09-May-2024   
Total Views |
uddhav
 
शेवटी देवेंद्र फडणवीसांना मला वाघ म्हणावे लागले की नाही? मी आहेच वाघ! काय म्हणता, खरा वाघ नाही, कागदी वाघ म्हणाले. असू देत. कोण आहे रे तिकडे खबर द्या, राज्यात ‘मशाली’चे काय सुरू आहे? काय? जिथे मराठी भाषिक जास्त, तिथे मराठी विरुद्ध गुजराती, विरुद्ध उत्तर भारतीय आणि जिथे गुजराती आहेत तिथे ‘केम छो वरली’ पॅटर्न. वाहवा वाहवा! हं, तर उगीच नाही आम्ही अडीच वर्षे कुठेही न जाता महाराष्ट्रावर सत्ता गाजवली. आमचं गणित सोपं आहे. मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार आहेत म्हणायचं की, मराठी भाषिक उठले पेटून! संविधान-आरक्षण भाजप काढून टाकेल, अशी अफवा रंगवली की, मग मागासवर्गीय समाज खडबडून उठतो. राम मंदिर अयोध्येच्या पूजेला गेलो नाही, हे पाहून आमचे नवीन मतदार खूश. आम्हाला आमच्या कामाची पोचपावती मिळाली बरं. आमचा अल्पसंख्याक भाऊ ओवेसी म्हणत होता की, पहिले मी बाबरी मशिदीच्या विध्वंसाबाबत काय मत आहे, हे सांगावे. याचाच अर्थ, भावाची व्होटबँक आमच्याकडे आली. हिंदूंना म्हणावं, त्यांना वाटायचं की त्यांनी एकगठ्ठा मते त्या मोदींना दिली, तर आमची ‘मशाल’ विझेल. पण, आता आमच्या ‘मशाली’ला तेल घालायला आणि राखायला आमचे नवीन मतदार आहेत म्हणावं. पुण्यात तर आमच्या लोकांना निवडून देण्यासाठी पवित्र फतवे पण निघालेत. बघा, मतदान केंद्रांवर तळतळत्या उन्हात कोण जास्त मतदान करायला बाहेर पडतो ते! अर्थात, आमचे नवमतदार! तेच मतदार जे ओवेसींना त्यांचे वाटतात, जे आमच्या पवार काकांनाही त्यांचे मतदार वाटतात. तेच मतदारा, जे आमच्या दिल्लीच्या मॅडमना, राहुल भावालाही त्यांचे वाटतात. तेच मतदार आज आमच्यासोबत आहेत. भले त्या भाजपवाल्यांनी उर्दू भवन, टिपू उद्यान उभारणीत अडथळा आणला. पण, ते व्हावे म्हणून आम्ही जंगजंग पछाडले, हे आमच्या नवीन मतदारांना माहीत आहे. काय म्हणता, यामुळे आमचे जुने मतदार नाराज होतील? पण, त्यांना वेडे बनवायला कितीसा वेळ लागतो? मुंबई महाराष्ट्रापासून तोडून गुजरातला जोडणार, उद्योगधंदे गुजरातला नेले, असे म्हटले की झाले. हे सगळे खोटे असते, पण आमच्या उरलेल्या जुन्या मतदारांना अजूनही ते खरे वाटते. त्यामुळे ‘आवाज कुणाचा’ म्हणणार्‍यांची मते आणि नवीन मतदारांची मते मलाच! मी जिल्लेइलाही शहेनशहा होणार!
 
सोनियांचे आवाहन
देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी पाठिंबा द्या, लोकशाहीच्या संरक्षणासाठी आम्ही वचनबद्ध आहोत,” असे काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी नुकतेच मतदारांना उद्देशून केलेल्या एका आवाहनात नुकतेच म्हणाल्या. सोनिया गांधी यांचे दुर्दैव म्हणावे की, भारतीय मतदारांचे सुदैव म्हणावे? काहीही असो, पण सध्या भारतीय मतदार जागा झाला आहे. काय चांगले, काय वाईट? प्रगती म्हणजे काय? हे धर्मसंस्कारांच्या आणि तितक्याच वास्तविकतेच्या कसोटीवर भारतीय नागरिक जाणून घेत आहेत. आडनाव ‘गांधी’ आहे म्हणून जीव ओवाळून टाकणारे नागरिक आता कोणत्याही आडनावापेक्षा ‘राष्ट्र प्रथम’ या भावनेला मानू लागले आहेत. दुसरीकडे ७० वर्षांत झालेला भ्रष्टाचार, ‘गरिबी हटाव’, ‘गरिबी हटाव’ म्हणत गडगंज श्रीमंत झालेले काँग्रेसचे नेते... ७० वर्षांत देशात तर सोडाच आपल्या महाराष्ट्रात कुणाचे साखर कारखाने उभे राहिले? कुणी शाळा-महाविद्यालयांचा धंदा सुरू केला? विकासाच्या नावाने निघणारी शासकीय कंत्राटे कुणाच्या घशात गेली? अक्साई चीन, पाकव्याप्त काश्मीर हे याच ७० वर्षांतले पाप. हा भूतकाळ भारतीय जनतेला माहिती झाला आहे. ७० वर्षांत आर्थिकदृष्ट्या स्थिरस्थावर होत सात पिढ्यांची सात जन्मांची सोय कुणाची झाली, हे सत्य भारतीय जनतेसमोर आले आहे. सोनिया गांधी ज्या पक्षाच्या नेत्या आहेत, त्या पक्षाची सत्ता गेली ७० वर्षे देशात होती. त्यावेळी देशाचे हे असले वास्तव, असले भवितव्य होते. २०१३ पूर्वी बॉम्बस्फोट, दहशतवाद यांनी देशाचे वातावरण बिघडले होते. आज तसे नाही. दहशतवादी, नक्षली यांचे धाबे दणाणले आहेत. ‘भारत तेरे तुकडे होंगे हजार’ची इच्छा असणार्‍यांना ‘भारतमाता की जय’ म्हणावे लागते. देशाचा आर्थिक विकास झाला, परराष्ट्रीय राजकारणात भारताची सरशी आणि चीन, पाकिस्तानची हार होताना दिसते. मुख्य म्हणजे, शेकडो वर्षे तंबूत राहणारा आमचा रामलला भव्य मंदिरात विराजमान झाला. या सगळ्यांबद्दल करोडो भारतीयांना अभिमान आहे. त्यामुळे देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी पाठिंबा द्या, असे सोनियांनी केलेल्या आवाहनाला भारतीय शून्य शून्य प्रतिसाद देतील, याबाबत शंका नाही.
९५९४९६९६३८

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.