आता पर्याय काय उरला?

    09-May-2024
Total Views |

maharshtra
 
स्वतंत्र पक्ष चालविणे ही गोष्ट वाटते तितकी सोपी नाही. काँग्रेसमधून फुटून नवा पक्ष काढणे आणि कालांतराने तो पुन्हा काँग्रेसमध्ये विलीन करणे, ही गोष्ट पवार यांच्यासाठी नवी नाही. पण, यावेळी पुतण्याने घातलेला घाव वर्मी लागलेला दिसतो. कारण, पक्षचिन्ह आणि कायदेशीर मान्यतेबरोबरच बहुसंख्य अनुयायी अजितदादांकडे आल्यानंतर उर्वरित राष्ट्रवादीची ‘तुतारी’ ही पिचलेली पिपाणी असल्याचे पवार यांच्या लक्षात असेल. पण, सर्वात बिकट अवस्था उद्धव ठाकरे यांची होणार आहे.
 
दोन ओंडक्यांची होते, सागरात भेट, एक लाट तोडी दोघा, पुन्हा नाही गाठ’ असे प्रभू राम यांनी म्हटले आहे. संसाराच्या भवसागरात अनेक लोकांची एकमेकांशी होणारी गाठभेट ही तात्पुरतीच असते. पण, राजकारणाच्या महासागरात असे ओंडके वारंवार एकमेकांना भेटतात आणि विभक्तही होत असतात. आता महाराष्ट्रात एका विलीनीकरणाच्या चर्चेला तोंड फुटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी पक्षाचे काँग्रेस पक्षात विलीनीकरण होऊ शकते, याचे सूतोवाच केले. त्यांनी इतक्या स्पष्ट शब्दांत ते म्हटले नसले, तरी त्यांना काय म्हणायचे आहे, तो अर्थ सर्वांनाच अचूक समजला. आपली आणि काँग्रेसची विचारधारा एकच आहे, असे विधान त्यांनी केल्यामुळे या विलीनीकरणाच्या चर्चेला तोंड फुटले. काँग्रेसने मात्र सावध भूमिका घेतली असून लोकसभा निवडणुकीचे निकाल काय लागतात, त्यावर विलीनीकरणाचा निर्णय अवलंबून राहील, असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले आहे.
 
लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील काही छोटे पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, असे पवार यांनी म्हटले असून एक प्रकारे आपला पक्ष हा एक छोटा पक्ष आहे, हे त्यांनी अप्रत्यक्षपणे कबूल केले. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या नव्या घडामोडीचे अचूक विश्लेषण केले आहे. राज्यातील महाविकास आघाडीकडे निश्चित अशी ‘व्हिजन’ असलेले नेतृत्त्वच नाही. विकास, दारिद्र्यनिर्मूलन यांसारख्या प्रश्नांवर राहुल गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे निश्चित धोरणाचा अभाव आहे. आता काँग्रेस-राष्ट्रवादी या पक्षांच्या विलीनीकरणाचे शिल्पकार शरद पवार हेच असतील, असे मत फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.
 
काँग्रेसपासून फुटून नवा पक्ष काढणे आणि कालांतराने त्याचे पुन्हा काँग्रेसमध्ये विसर्जन करणे, ही गोष्ट पवार यांच्यासाठी नवी नाही. त्याचा प्रयोग त्यांनी यापूर्वी दोनदा केला आहे. सोनिया गांधी यांच्या विदेशी मुळाचे निमित्त करून स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रूपाने त्यांनी हा प्रयोग तिसर्‍यांदा केला. पण, अवघ्या वर्षभरात त्याच विदेशी मुळाच्या सोनियाबाईंपुढे लोटांगण घालून त्यांना निवडणूक लढवावी लागली.
 
आता पवार यांच्या या निर्णयामुळे सर्वात बिकट अवस्था उद्धव ठाकरे यांची होणार आहे. ज्यांच्यावर विसंबून उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेने धरलेला भाजपचा हात हिसडून तो पवार यांच्या गळ्यात घालण्याचा प्रयत्न केला, ते पवारच आता आधारासाठी काँग्रेसचा हात पकडणार आहेत. उद्धव यांचे काँग्रेसशी असलेले संबंध हे पवार यांच्यासारखेच सुरळीत असतील असे नव्हे, कारण त्या पक्षाचे निर्णय राज्यात नव्हे, तर दिल्लीत घेतले जातात. २०१९ मध्ये उद्धव यांनी युती तोडल्यावरही दिल्लीने उद्धव ठाकरे यांच्याशी हातमिळवणी करण्यास हरकत घेतली होती. आपण पूर्णपणे सेक्युलर धर्मात बाटविले गेलो आहोत, याची खात्री उद्धव यांना पटवावी लागली, तेव्हा कुठे सोनियाबाईंनी महाविकास आघाडीला हिरवा कंदिल दर्शविला होता. आजही उद्धव आणि त्यांची उरलीसुरली सेना ही काँग्रेसच्या गणतीतच नाही. पवार हे मूळचे काँग्रेसजनच असल्याने त्यांना पक्षात सामावून घेण्यात काँग्रेसला अडचण येणार नाही. उलट राज्यातील काँग्रेसच्या मतांमध्ये होणारी फाटाफूट तरी आता टळणार असल्याने काँग्रेसचा लाभच होणार आहे. पण, उद्धव ठाकरे यांचा आधारस्तंभ अचानक कोसळला असून, त्यांनाही आता काँग्रेसच्या वृक्षाच्या सावलीखाली बसावे लागेल. पण, तेथे बसण्यास जागा आहे की नाही, ते ‘दिल्ली’ सांगेल. पवारांपेक्षाही उद्धव ठाकरे यांना हे विलीनीकरण अधिक जड जाईल, हे स्पष्ट आहे.
 
यावेळी काकांवर पुतण्याने घातलेला घाव मात्र वर्मी बसलेला दिसतो. अजितदादांनी आकस्मिक केलेल्या बंडामुळे पवार यांना सावरायला वेळच मिळाला नाही. अजितदादांनी बंड केल्याची कुणकुण कानावर येईपर्यंत, त्यांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधीही पार पडल्याचे काकांना पाहावे लागले. आधीचा अनुभव गाठीला असल्याने अजितदादांनीही यावेळी भावनिक ब्लॅकमेलिंगपुढे न झुकण्याचा निर्धार केला होता. पवार यांच्या बेभरवशाच्या निर्णयांमुळे आणि राजकीय स्वार्थापायी त्यांनी पक्षातीलच अनेकांना दुखावल्यामुळे यावेळी दादांभोवती पक्षाचे बहुसंख्य नेते आणि कार्यकर्ते गोळा झाले. मध्यंतरीच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर अजितदादा यांनी आपली भक्कम पकड बसविली होती. म्हणूनच त्यांचे स्थान अस्थिर करण्याचे डावपेच सुरू झाले. स्वत; पवार यांच्या आशीर्वादाने पहाटेचा शपथविधी पार पडला असला, तरी दादांना तोंडघशी पडण्यासाठी पवार यांनी खेळलेली ती एक चाल होती. कारण, लगेचच पवार यांनी माघार घेतली आणि दादांनाही त्या सरकारमधून बाहेर पडण्यास भाग पाडले. त्यावरून अनुभव घेऊन दादांनी यावेळी थेट शपथविधीच उरकून घेतला. त्यामुळे काकांनी ‘मला पुतण्यापासून वाचवा’ अशी आर्त हाक घातली, तरी वाचविण्यासाठी माणसेच उपलब्ध नव्हती.
 
या बंडानंतर पवार यांनी दादांविरोधात कायदेशीर लढाई लढली खरी, पण ती आपली अब्रू कायम राखण्यासाठी. त्यात ना जिंकण्याची इच्छा होती, ना पुतण्याला नमविण्याची ईर्ष्या! लोकसभा निवडणुकीत थेट बारामतीमधून अजितदादांनी आपल्या पत्नीलाच उभे केल्यापासून राष्ट्रवादी पक्ष हातचा गेल्याची जाणीव पवार यांना झाली. मतदानानंतर या मतदारसंघातील वाहणार्‍या वार्‍याची दिशा लक्षात आल्यामुळेच पवारांकडून विलीनीकरणाचे सूतोवाच केले गेले आहे. कारण, राजकारणात इमान नसते, हे काकांना पक्के ठाऊक आहे. आपल्यासारखेच नेते भोवती जमा केल्यामुळे पुढील काळात नव्याने पक्ष उभा करणे शक्य नसल्याचे वास्तव पवार यांनी स्वीकारले आहे. त्यासाठी लागणारी निष्ठा आणि कष्ट करण्याची तयारी त्यांच्याभोवती असलेल्या एकाही नेत्यात नाही, हे त्यांच्या लक्षात आले असेल. कोणताच पर्याय उरला नसल्याने पवार यांनी आपला जुनाच, काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा अखेरचा पर्याय अवलंबिला आहे.