ठाणे,कोकण पदवीधर निवडणुक - डावखरेचे पारडे जड

कोकण पदवीधर मतदार संघात १ लाख ७७ हजार ३२ मतदार; ठाणे जिल्हयात सर्वाधिक ७३ हजार ३०५ मतदार

    09-May-2024
Total Views |
whatapp web

ठाणे : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना निवडणूक आयोगाने राज्यातील कोकण व मुंबई पदवीधर आणि नाशिक व मुंबई शिक्षक मतदार संघातील रिक्त होणाऱ्या एकूण चार जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. यानुसार १० जूनला मतदान होणार असून १३ जूनला मतमोजणी होईल. लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर एका आठवड्यातच या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे.यंदा कोकण पदवीधर मतदार संघात एकुण १ लाख ७७ हजार ३२ मतदार असून ठाणे जिल्हयात सर्वाधिक ७३ हजार ३०५ मतदार आहेत. दरम्यान, पुरवणी यादी जाहीर झाल्यावर मतदारांची संख्या दोन लाखाच्या घरात जाण्याची शक्यता आहे.
 
कोकण पदवीधर मतदार संघ ठाणे ते थेट तळकोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यापर्यंत पोहचला आहे. १ जानेवारी २०२४ रोजीच्या अंतिम मतदार यादीनुसार या मतदार संघात १ लाख ७७ हजार ३२ मतदार आहेत. यात ठाणे जिल्ह्यात ७३ हजार ३०५ मतदार आहेत. रायगड जिल्ह्यात ४५ हजार ३३८,रत्नागिरी जिल्ह्यात २१ हजार ४२४ आणि पालघर जिल्ह्यात १९ हजार ४८१ मतदार आहेत. तर सर्वाधिक कमी १९ हजार ४८१ मतदार हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहेत. कोकण पदवीधर मतदार संघात १२ मे २०२४ पर्यंत पदवीधर मतदारांना मतदार नोंदणी करता येणार आहे. निवडणुकीच्या कार्यक्रमादरम्यान पुरवणी मतदार यादी जाहीर होणार असल्याने मतदारांची संख्या वाढणार असुन मागील पदवीधर मतदारांच्या तुलनेत यंदा दुपटीने मतदार वाढण्याची शक्यता आहे.
 
 कोकण पदवीधरमध्ये निरंजन डावखरेंचे पारडे जड
कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत विद्यमान आमदार निरंजन डावखरे भाजपकडून पुन्हा रिंगणात उतरणार, हे निश्चित मानले जात असुन मागील सन २०१८ मधील प्रतिस्पर्धी महायुतीमध्ये असल्याने यंदा डावखरेचे पारडे जड दिसत आहे.सन २०१८ मध्ये कोकण पदवीधर मतदारसंघात एकूण ७२.३५% मतदान झाले होते. तरीही डावखरे यांनीच बाजी मारली होती. यंदा महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असणार तसेच ही जागा राष्ट्रवादी (शरद पवार गट) लढविणार की शिवसेना उद्धव ठाकरे हे अद्याप ठरलेले नाही.