चोखा चोखाट निर्मळ

    09-May-2024
Total Views |
 
chokha mela
 
चोखा चोखाट निर्मळ। तया अंगी नाही मळ
चोखा सुखाचा सागरा चोखा भक्तीचा सागर
संत चोखामेळा अतिशय निर्मल होते हे त्यांना वारंवार सिद्ध करावे लागले. जन्माने महार. तत्कालीन समाजव्यवस्थेत महारांचे स्थान काय होते हे वेगळे सांगायला नको. गावाबाहेर कूस बांधणे सुरु होते. कूस म्हणजे गावाची सीमा अधोरेखित करणारी भिंत. सवर्णांचे रक्षण करणारी अस्पृशांनी बांधलेली भिंत. १३३८ साली मंगळवेढा गावात हे गावकूस बांधण्याची कामगिरी चालू होती. बांधता बांधता ते अवजड धूड कोसळलं आणि त्याखाली काही माणसे नाहक मारली गेली. त्यापैकी एक होत संत चोखामेळा.
त्यांची जन्मकथाही विलक्षण. वारीत असताना ते जन्माला आले. गावाच्या पाटीलने दिलेला आंबा चोखून त्यांचा जन्म झाला म्हणून त्याचे नाव चोखामेळा असेठेवल्याचे सांगण्यात येते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जगत असतानाही त्यांच्या मनात जागृत झालेले जीवनभान त्यांना संतापदी पोहचवून गेले. पण आज आपण या संतांचा जो जैजैकातर करतो तो त्या काळात कसा असावा? संतपद पोहोचूनही त्यांना गावकुसाखाली मरावं लागलं हेच किती विदीर्ण करणारे आहे. पण चोखोबा म्हणजे प्रेम. निस्सीम प्रेम. भक्ती. त्यांची पत्नी म्हणते,
चोखा प्रेमाची माऊली। चोखा कृपेची साऊली
चोखा मनाचें मोहन । बंका घाली लोटांगण
ही संत बँकांची रचना. आता पुढे त्यांची स्त्री लिहिते, ती संतपत्नी सोयराबाई आपल्या पतीचे गुण गात विनवणी करते,
घेतिलें पदरीं । आतां न टाकावें दुरी
अवधी माझी वासना। पुरवावी नारायणा
आतां नका धरूं दुरी। म्हणे चोखियाची महारी
चोखियाची माहेरी म्हणजे त्यांची पत्नी. सोयराबाई. स्वतःला माणूस म्हणवून घेण्यापेक्षा पतीचे नाव आणि पतीची जात सांगून ती स्वतःची ओळख सांगते. चोखोबांच्या आतयुष्यात त्यांच्या इच्छाशक्ती आणि परमेश्वराशी लिन होऊ शकणाऱ्या स्वभावामुळे बरेच आलं घेतले गेले. मंदिरात प्रवेश नसताना त्यांनी गाभाऱ्यात जाऊन विठ्ठलाची माळ आपल्या गळ्यात घालून भजन गायले हे त्यापैकीच एक. ती गोष्ट अशी आहे, कधी चोरीला न जाणारा देवाच्या गळ्यातला हार चोरीस गेला होता. आदल्यादिवशी संत चोखोबा नजर चुकवून देवळात गेले होते विठूला भेटायला. तेव्हा गावकऱ्यांनी त्यांना बाहेर काढून मारले. एवढ्यावर न थांबता नदीच्या पैलतीरी दीपमाळेजवळ राहायला त्यांना पाठवले. पण देवाच्या दर्शनाने चोखोबा इतके भावविव्हळ झाले होते की ते आनंद सागरात ग्लानीत पडून होते आंब्याच्या झाडाखाली. दुसऱ्या दिवशी देवाच्या गळ्यात हार नसलेला पाहून बडवे चोखोबांना शोधत आले. त्यांच्या गळ्यात हार पाहून त्यांनी चोरीची शिक्षा म्हणून त्यांना बैलांच्या पायदळी तुडविण्याचे ठरवले. हे ऐकताच ते म्हणू लागले,
धांव घालीं विठु आतां चालू नको मंद।
बडवे मज मारिती ऐसा कांही तरी अपराध ।।
विठोबाचा हार तुझे कंठीं कैसा आला ।
शिव्या देताति महारा म्हणती देव बाटविला ।।
अहोजी महाराज तुमच्या द्वारींचा कुतरा।
नकाजी मोकलू चक्रपाणी जिमेदारा ।।
जोडूनिया कर चोखा विनवितो देवा।
बोलिलों उत्तरें परि राग नसावा ।।
पण त्याने ते मेले नसावेत कारण त्यांच्या मृत्यूची नोंद कूस पडून झाली असे आहे. महार ज्ञातीतील जन्म घेण्याचे समर्थन करताना चोखोबा म्हणतात,
शुद्ध चोखामेळा। करी नामाचा सोहळा ।
मी यातीहीन महार। पूर्वी निळाचा अवतार ।।
कृष्ण निंदा घडली होती। म्हणोनि महार जन्म प्राप्ती ।।
चोखा म्हणे विटाळ । आम्हां पूर्वीचे हें फळ ।।
परमेश्वराची निंदा माझ्या हातून घडल्याने मला हा जन्म मिळाला असे ते म्हणतात. पण तरीही अत्यंत निर्मल मनाचे हे चोखोबा म्हणजे
चोखा चोखाट निर्मळ। तया अंगी नाही मळ ||