जागतिक आरोग्यमानाचा अंदाज

    09-May-2024   
Total Views |
 

WHO
 
कोरोना महामारीदरम्यान आरोग्य व्यवस्थेची लक्तरे अक्षरश: वेशीवर टांगली गेली. केवळ अविकसित आणि विकसनशील देशांतच नाही, तर विकसित देशांमधील आरोग्य व्यवस्थाही महामारीशी प्रारंभी दोन हात करण्यात सपशेल अपयशी ठरली. त्यानंतरही प्रतिबंधात्मक लसी, त्यांच्या चाचण्या, लस कंपन्यांचे राजकारण आणि अर्थकारण याचा फटकाही विकसनशील देशांना बसला. पण, एकूणच या महामारीने जागतिक आरोग्य व्यवस्थेला जोरदार हादरे दिले. विज्ञान-तंत्रज्ञानाच्या, अगदी अंतराळ क्षेत्रात आपण अफाट प्रगती केली असली, तरी प्राथमिक आरोग्याच्या सोयीसुविधा सामान्यांपर्यंत पोहोचविण्यात जगभरातील यंत्रणा कुचकामी ठरल्याचाच संदेश कोरोना महामारीने दिला. कोरोनानंतर आरोग्य क्षेत्राकडे बघण्याचा जगाचा आणि बहुतांशी देशांचा दृष्टिकोन गंभीर असला, तरी अजूनही सार्वजनिक आरोग्याच्या बाबतीत बराच लांबचा पल्ला गाठायचा आहे. जागतिक आरोग्य संघटनेचा वैश्विक आरोग्याची स्थिती मांडणारा अहवाल नुकताच जारी झाला असून, यामध्ये काही बाबतीत झालेली सुधारणा सकारात्मक म्हणावी लागेल. परंतु, तरीही वैश्विक आरोग्याशी संबंधित तीन प्रमुख उद्दिष्टांचे लक्ष्य कितपत साधले जाईल, याबाबत साशंकताही व्यक्त करण्यात आली आहे. तेव्हा, या अहवालातील काही ठळक निरीक्षणे आणि त्यावरून बांधलेला जागतिक आरोग्यमानाचा अंदाज यावर प्रकाशझोत टाकणे महत्त्वाचे ठरावे.
 
दि. २७ मे ते १ जून दरम्यान स्वित्झर्लंडमधील जिनेव्हामध्ये जागतिक आरोग्य संघटनेतर्फे ७७व्या ‘जागतिक आरोग्य परिषदे’चे आयोजन करण्यात आले आहे. यंदाची परिषदेची थीम आहे 'All for Health, Health for All’ त्या पार्श्वभूमीवर नुकत्याच गेल्या वर्षीचे जगाचे आरोग्यमान दर्शविणारा एक अहवाल जागतिक आरोग्य संघटनेतर्फे जारी करण्यात आला. या अहवालामध्ये जागतिक आरोग्याशी निगडित तीन प्रमुख उद्दिष्टांचा विचार करण्यात आला आहे. या तीन उद्दिष्टांना ‘ट्रिपल बिलियन टार्गेट्स’ असे संबोधले जाते. त्यानुसार १) एक अब्जपेक्षा अधिक लोकसंख्येला वैश्विक आरोग्य सुरक्षा, २) एक अब्जपेक्षा अधिक लोकसंख्येची आरोग्यासंबंधी आपत्कालीन स्थितीपासून सुरक्षा, ३) एक अब्जपेक्षा अधिक लोकसंख्येकडून पूर्वीपेक्षा अधिक आरोग्यदायी जीवनशैलीचा अवलंब, असे हे प्रत्येकी एक अब्ज लाभार्थींच्या तीन लक्ष्यांना एकत्रितपणे ‘ट्रिपल बिलियन टार्गेट्स’ म्हटले जाते. या तिन्ही उद्दिष्टांची जगभरातील देशांनी खरं तर २०२५ पर्यंत पूर्तता करणे जागतिक आरोग्य संघटनेला अपेक्षित होते. परंतु, या अहवालानुसार, केवळ एक अब्जपेक्षा अधिक लोकसंख्येकडून पूर्वीपेक्षा अधिक आरोग्यदायी जीवनशैलीचा अवलंब होत असल्याच्या तिसर्‍या उद्दिष्टामध्ये २०२५ पर्यंत जागतिक यश नोंदवले जाऊ शकते.
 
याचे कारण म्हणजे, वाढलेला पाणीपुरवठा, स्वच्छतेच्या सोयी आणि हवेच्या दर्जात झालेली जागतिक सुधारणा. परंतु, आरोग्यासंबंधी सर्वच शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांची पूर्तता २०३० पर्यंत होणे आव्हानात्मकच. पण, यामधील सकारात्मक बाब म्हणजे, जगभरातील १५० देशांमध्ये तंबाखूच्या वापराचे प्रमाण घटले असून, त्यापैकी ५६ देश हे २०२५ पर्यंत तंबाखूसेवनाचे प्रमाण कमी करण्याच्या मार्गावर आहेत. तसेच गेल्या दोन वर्षांपेक्षा तंबाखू सेवनकर्त्यांच्या प्रमाणात १९ दशलक्ष इतकी घट नोंदवण्यात आल्याचेही हा अहवाल सांगतो. तसेच जगातील ४५ देशांना रस्ते अपघातांमुळे होणारे मृत्यू कमी करण्यात ३० टक्क्यांहून जास्त यश आले आहे. एक अब्जपेक्षा अधिक लोकसंख्येला वैश्विक आरोग्य सुरक्षाकवच पुरवण्याचे उद्दिष्ट २०२५ पर्यंत पूर्ण होणे दृष्टिपथात नाही. पण, जगातील ३० टक्के देशांनी अत्यावश्यक आरोग्याच्या सुविधा आणि आर्थिक सुरक्षेची तरतूद याबाबतीत प्रगती केल्याचेही हा अहवाल अधोरेखित करतो. तसेच एक अब्जपेक्षा अधिक लोकसंख्येला आरोग्यासंबंधी आपत्कालीन स्थितीपासून सुरक्षेचे उद्दिष्टही २०२५ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता धूसरच. तरीही, ‘सार्स-कोव्ही-२’ व्हायरसच्या लसीच्या ‘जिनोम सिक्वेन्सिंग’बाबतीत ६२ टक्के वाढ झाल्याचेही हा अहवाल सांगतो. एकूणच काय तर जागतिक आरोेग्यमान सुधारले असले, तरी अजूनही उद्दिष्टपूर्तीसाठी काही वर्षांचा कालावधी जावा लागेल. तेव्हा, वैद्यकीय क्षेत्रातील संशोधन, संसाधने आणि सहकार्य यांच्या परस्पर समन्वयातूनच वैश्विक आरोग्य सुधारेल, हे निश्चित!

विजय कुलकर्णी

 एम.सी.जे पर्यंत शिक्षण. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (फीचर्स) या पदावर कार्यरत. मुंबईतील बीएमएम महाविद्यालयांमध्ये पत्रकारितेतील विषयांसाठी व्हिजिटिंग फॅक्लटी म्हणून कार्यरत. चालू घडामोडी, सामाजिक विषय, युवा पिढीला आवडेल असे लेखन आणि वृत्तपत्रातील मांडणी आणि सजावटीमध्ये विशेष रुची