अमेरिकेत 'स्वरगंधर्व सुधीर फडके'चे १०० शो 'हाऊसफुल्ल'

    09-May-2024
Total Views |
योगेश देशपांडे दिग्दर्शित 'स्वरगंधर्व सुधीर फडके' या चित्रपटाने अमेरिकेतली प्रेक्षकांनाही भूरळ घातली आहे.
 

babuji 
 
मुंबई : ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ (Swargandharva Sudhir Phadke) हा 'गीतरामायणा'ला स्वरसाज देणारे संगीतकार, गायक सुधीर फडके यांच्या जीवनावर आधारित बायोपिक सध्या प्रेक्षकांच्या मनाचा ठाव नक्कीच घेत आहे. १ मे महाराष्ट्र दिनी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला महाराष्ट्रातून उत्तम प्रतिसाद मिळाला. केवळ प्रेक्षकच नाही तर संगीतकार श्रीधर फडके, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी देखील या संगीतमय चित्रपटाचे कौतुक केले होते. चहुबाजूंनी वाहवा मिळवणाऱ्या ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ (Swargandharva Sudhir Phadke) या चित्रपटाने साता समुद्रापार थेट अमेरिकेतही आपला यशाचा झेंडा रोवला आहे. बाबूजींचे चाहते जगभरात आहेत याचीच पोचपावती मिळाली असून अमेरिकेत या चित्रपटाचे १०० शोज 'हाऊसफुल'च्या दिशेने वाटचाल करत आहे. आनंदाची बाब म्हणजे हा चित्रपट लवकरच दुबई, लंडन आणि जर्मनीमध्येही प्रदर्शित होणार आहे.
 
‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ या चित्रपटाचे दिग्दर्शक योगेश देशपांडे यांनी या यशाबद्दल आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले की, “परदेशात चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच काही शोज हाऊसफुल्ल झाले होते. महाराष्ट्रात उत्तम प्रतिसाद मिळत असतानाच परदेशातील प्रेक्षकही इतके प्रेम या चित्रपटावर करत आहेत, हे खरंच भारावणारे आहे. बाबूजी हे नावच इतके मोठे आहे की, त्यांची ख्याती जगभरात आहे. आजही त्यांची गाणी अजरामर आहेत. तरुणाईही त्यांची गाणी तितक्याच आत्मीयतेने ऐकते. चित्रपटाबद्दल अनेकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. सगळ्याच कलाकारांचे कौतुक होत आहे. एका टीमला यापेक्षा जास्त काय हवे. मी सगळ्याच प्रेक्षकांचा मनापासून आभारी आहे.''
 
सौरभ गाडगीळ प्रस्तुत रिडिफाईन प्रॉडक्शन्स निर्मित या चित्रपटाचे सौरभ गाडगीळ आणि योगेश देशपांडे निर्माते आहेत. तर चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन योगेश देशपांडे यांचे आहे. 'स्वरगंधर्व सुधीर फडके' या चित्रपटात सुनील बर्वे, मृण्मयी देशपांडे, सागर तळाशीकर, मिलिंद फाटक, आदिश वैद्य, सुखदा खांडकेकर, अपूर्वा मोडक, अविनाश नारकर, शरद पोंक्षे, उदय सबनीस, चिन्मय पटवर्धन, निखिल राऊत, विभावरी देशपांडे, धीरेश जोशी, परितोष प्रधान यांच्या प्रमुख भूमिका आहेत.